24 September 2016

कच्च्या टाोमेटोची चटणी (Tomato Chutney)

No comments :

चटणी हा पदार्थ ताटामधे डाव्या बाजूला वाढतात. रोजच्या जेवणात आंबट, खारट, तिखट, गोड, तुरट असे सर्व रस असावे. चटणी, कोशिंबिर, भाजी, डाळ, उसळ, भात, पोळी असा चौरस आहार घ्यावा असे आहारातज्ञ सांगतात. तर या कच्च्या टोमँटो चटणी मधून आपल्याला आंबट, तुरट, तिखट असे रस मिळतात. ही चटणी जेवणात तर चांगली लागतेच, शिवाय ब्रेड,पराठ्याला लावून खाण्यास पण चांगली लागते. कशी करायची साहित्य व कृती,

साहित्य :-
* कच्चे हिरवे टोमँटो ४
* मुठभर शेंगदाणे
* हिरव्या मिरच्या ४-५
* कोथिंबिर
* मीठ चविनूसार
* साखर चविनुसार
* तिळ २ लहान चमचे
* हिंग,मोहरी,जीरे फोडणी साठी
* तेल १ टेस्पून

कृती :-

प्रथम टोमँटो बारीक चिरून घ्यावे. नंतर कढईत तेल गरम करून हिंग, जीरे -मोहरीची फोडणी करावी. फोडणीमधे अनुक्रमे आधि तिळ,हिरवी मिरची, शेंगदाणे घालावेत व चांगले परतावे. परतताना मध्यावर चिरलेला टोमँटो घालावा व सर्व साहीत्य खमंग परतावे. परतून झाल्यावर थंड होऊ द्यावे.

आता थंड झालेल्या साहीत्यामधे मीठ, साखर व कोथंबिर घालावे व मिक्सरमधे भरड वाटावे. तयार चटणी बाऊलमधे काढावी.

आंबट -गोड तिखट चविची ही चटणी अतिशय रूचकर लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

टोमँटोे सार (Tomato Saar)

No comments :

टोमँटोचे सार म्हणजे सुप सारखाच परंतु थोडा जास्त पातळ प्रकार आहे. नुसते प्यायला तर छान लागतेच परंतु गरम खिचडी किंवा भातासोबतही खाता येते. असे हे सुप कसे करायचे साहित्य व कृती,

साहित्य :-
* लाल पिकलेले टोमँटो - ४
* बीटरूट कापून ४-५ तुकडे (रंग लाल येतो)
* तमालपत्रं १ पान
* तूप २ टीस्पून
* हींग चिमूटभर
* जिरे अर्धा टीस्पून
* मीठ, चविनुसार
* साखर किंवा गुळ चविला
* मिरपूड अर्धा टीस्पून
* लाल मिरचीपूड अर्धा टीस्पून
* काॅर्नफ्लोअर १ टेस्पून
* पाणी गरजेनुसार

कृती :-

प्रथम टोमँटो व बीटरूट कुकरमधे तीन शिट्या काढून मऊ शिजवून घ्यावे.

थोडे थंड झाल्यावर टोमँटोचे साल काढून मिक्सरमधे टोमँटो व बीट थोडे पाणी घालून पेस्ट करावी.

नंतर पातेल्यामधे तूप गरम करून हिंग व जिर्याची फोडणी करावी. त्यामधे तयार पेस्ट घालावी. गरजेनुसार पाणी घालावे.नंतर वाटीमधे काँर्नफ्लोअर घेऊन, थोड्या पाण्यात पेस्ट करून घालावे. आता बाकीचे साहित्य मीठ, साखर, तमालपत्रं, मिरपूड व मिरची पूड घालावी व पाच मिनिट चांगले उकळू द्यावे.

तयार गरमा-गरम सार नुसतेच प्या किंवा भातासोबत खा.

टिप :- काँर्नफ्लोअर ऐवजी नारळाचे दूध वापरले तरी एक छान वेगळी चव येते.

तमालपत्रा ऐवजी कढीपत्ता पण वापरता येतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

शेजवान फ्राइड राईस (Schezwan Fried Rice)

No comments :

भाताचे विविध प्रकार आहेत.आताच्या नविन पिढीला चायनीज पदार्थ आवडतात. त्यापैकीच "शेजवान  फ्राइड राईस " हा एक भाताचा प्रकार आहे. संध्याकाळ झाली की रस्त्यावर विविध चायनीज पदार्थाचे गाडे लागतात. खूप गर्दी असते. वन डिश मिल म्हणून उत्तम प्रकार आहे. मग असा मुलांच्या आवडीचा पदार्थ आपण घरातच बनवला तर? अतिशय सोप्पा आहे. कसा करायचा साहीत्य व कृती,

साहित्य :-

* बासमती तांदुळ २ वाट्या
* गाजर १
* शिमला मिरची १-२
* बीन्स ८-१०
* कांदापात कांद्यासह ४
* शेजवान साँस २-३ टेस्पून
* सोया साँस १ टेस्पून
* व्हिनेगार १ टेस्पून
* मीठ चविनुसार
* मिरपूड १/४ टीस्पून
* साखर चिमूटभर
* तेल २ टीस्पून

कृती :-

प्रथम  मोकळा भात शिजवून घ्यावा व  ताटात पसरून गार होण्यासाठी ठेवावा.

नंतर गाजर, शिमला, बीन्स बारीक चिरून घ्यावे.  कांदापातीचा खालचा पांढरा कांदा व हिरवी पात वेगवेगळे बारीक चिरून घ्यावे.

आता पॅनमधे तेल गरम करावे व  आधि पांढरा कांदा घालावा नंतर गाजर, बिन्स व शिमला मिरची टाकून २-३ मिनिट परतावे. गँस मोठाच ठेवावा.

नंतर त्यामधे शेजवान साँस, सोया साँस, मीठ,साखर, मिरपूड घालून परतावे व शिजवलेला भात, व्हिनेगार व शेवटी हिरवी कांदापात घालून  परत व्यवस्थित परतावे.

गरमा-गरम "शेजवान फ्राइड राईस" वरून हिरव्या कांदापातीची सजावट करून सर्व्ह करा.

टिप्स :-

* भाज्या जास्त परतू नयेत. थोड्या क्रंचीच (कचवट)  ठेवाव्यात.
* शेजवान साँस झणझणीत असते, आवडीनुसार कमी-जास्त करावे.
* भाज्या आवडीनुसार घ्याव्यात.कोबी,फ्लाॅवर पण घेऊ शकता. मात्र शिमला मिरची व कांदापात आवश्यक आहे. विशिष्ट चव येते.
* शेजवान साँस मधे आलं-लसूण असतेच परंतु अधिक स्ट्राँग स्वाद पाहिजे असेल तर बारीक चिरून तेलात सर्वात आधि टाकून नंतर कांदा,भाज्या घालावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

पनीर चिली मसाला (Paneer Chilli Masala)

No comments :

"पनीर चिली मसाला "ही डिश स्टार्टर या प्रकारातील आहे.चटपटीत आहे. करायला सोपी व पनीर,भाज्या त्यामधे असल्याने पौष्टीकही. तर कसे करायचे साहित्य व कृती,

साहित्य :-

* पनीर २०० ग्रँम
* शिमला मिरची ३-४
* टोमँटो १
* मोठा कांदा १
* कांदा पात कापून १ वाटी
* लसूण ८-१0 पाकळ्या
* आलं १ इंच
* हिरवी मिरची २-४ मधून उभी चिरून
* सोया साँस १ टेस्पून
* रेड चिली साँस १ टेस्पून
* शेजवान साँस १/२ टेस्पून
* मीठ चविनूसार
* साखर १/२ टीस्पून
* मिरपूड १/२ टीस्पून
* काॅर्नफ्लोअर २ टेस्पून
* तेल २ टेस्पून

कृती :-

प्रथम कांदा, शिमला मिरची व टोमँटो मोठा चौकोनी आकारात चिरून घ्यावे. पनीरचेही चौकोनी मोठे क्यूब करावेत. आलं-लसूण बारीक चिरून घ्यावे.

नंतर पनीरला १ टेस्पून काॅर्नफ्लोअर, चिमूटभर मीठ थोडी मिरपूड चोळून घ्यावे व दहा मिनिट ठेवावे.

आता पॅनमधे तेल गरम करावे व पनीर क्यूब तांबूस रंगावर शॅलो फ्राय करून टिश्यू पेपरवर काढा.

आता राहीलेल्या तेलात आलं-लसूण व उभी चिरलेली तिखट मिरची घालून परतावे. नंतर कांदा,शिमला, टोमँटो व शेवटी चिरलेली कांदापात घालून थोडे परता. फार शिजवून मऊ नको. साधारण कचवट असावे.शँलोफ्राय करून ठेवलेले पनीर क्यूबही आताच घाला.

नंतर सोया साँस,चिली साँस व शेजवान साँस घालून थोडे परता. चविला मीठ साखर,मिरपूड घालावे. १ टेस्पून काॅर्नफ्लोअर मधे थोडे पाणी घालून पातळ पेस्ट करून घालावी. थोडे परतावे.

शेवटी तयार पनीर चिली डिशमधे काढावे व वरून चिरलेली थोडी कांदापात घालून गरम सर्व्ह करा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

दहीकाला/ गोपाळकाला ( Dahikala / Gopalkala)

No comments :

दहीकाला किंवा गोपाळकाला जन्माष्टमी ला केला जातो. एक पारंपरिक पदार्थ आहे. एरव्ही पण नाष्ट्याला पौष्टीक व झटपट होणारा पदार्थ म्हणून उत्तम आहे. कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* जाड पोहे १ वाटी
* लाह्या मूठभर
* चिरुमुरे मूठभर
* पिकलेले पेरूचे बारीक तुकडे
* सफरचंदाचे तुकडे
* केळाचे काप
* डाळींबाचे दाणे
* ओल्या खोबर्याचे काप किंवा किसून
* घट्ट ताजे दही १ वाटी
* मीठ चविनुसार
* मेतकूट
* आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे चमचाभर
* जीरे, तूप फोडणीसाठी
* सांडगी मिरची किंवा हिरवी मिरची

कृती :-
प्रथम पोहे चाळून, निवडून स्वच्छ धुवून निथळावेत.

आता धुतलेल्या पोह्यामधे वरील सर्व साहित्य एकत्र मिसळावे.

शेवटी कालवलेल्या काल्यावर तूप गरम करून हिंग, जीरे व मिरची घालून फोडणी करावी व थंड करून काल्यावर ओतावी.

मस्त पौष्टीक गोपाळकाला कान्हाला नैवेद्य दाखवून खा.

टिप :
यामधे फळे आपल्या आवडीची कोणतीही वापरावीत. सर्व पदार्थ आपल्या गरजेनुसार, प्रमाणानुसार वापरावेत.

यामधे शिजवलेला भातही घालतात. मी नाही घातला.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

नवरतन कोरमा (Navratan Korma)

No comments :

नवरतन कोरमा एक मस्त, हलकेसे मसाल्याचे वास व गोडसर चवीची भाजी आहे. यामधे नऊ भाज्या घातल्या जातात. म्हणून नवरतन कोरमा नांव पडले. असे असले तरी आपल्या आवडी नुसार व उपलब्धते नुसार भाज्या घेतल्या तरी चालते. साहित्य व कृती,

साहित्य :-
* पनीर १०० ग्रँम
* फ्लाॅवर तुरे १/२ वाटी
* बीन्स ७-८
* गाजर १
* मटार १/२ वाटी
* शिमला मिरची लहान १
* बटाटा लहान १
* कांदा १ मोठा
* टोमँटो १ मोठा
* आलं-लसूण पेस्ट १ टीस्पून
* काजू १०-१५
* दूध १/२ कप
* फ्रेश क्रिम २ टेस्पून
* मीठ चविनूसार
* हळद
* लाल मिरचीपूड १/२ टीस्पून (ऐच्छिक)
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* लवंगा ४
* दालचिनी २ तुकडे
* तमालपत्रं लहान १
* तेल  २ टेस्पून
* पाणी गरजेनुसार

कृती :-

प्रथम सर्व भाज्या मोठ्या चौकोनी तुकड्यामधे कापून घ्याव्यात व गरम पाण्यात टाकून थोड्या मऊ करून घ्याव्यात. पनीर पण लहान क्यूब करून तेलावर किंचित तांबूस परतावे.

नंतर कांदा चिरून पेस्ट करावी. टोमँटो व काजूची पण पेस्ट करावी. २-३ काजू तुकडे करून घालण्यासाठी बाजूला ठेवा.

आता पँनमधे तेल घालावे. गरम झाले की, त्यामधे लवंग,दालचिनी व तमालपत्र घालून त्यावर कांदा पेस्ट घालावी. ती गुलाबी रंगावर परतली की,आलं-लसूण पेस्ट घालून परतावे. आताच हळदही घालावी. लगेच त्यावर टोमँटो व काजूपेस्ट घालावी. नंतर धना-जिरा पावडर, मीठ, मिरची पूड घालावे.

आता सर्व भाज्या व पनीर घालून परतावे.काजू तुकडे घालावेत. नंतर त्यामधे दूध व थोडे पाणी घालून एक उकळी काढावी. भाज्या आधि हाफ बाँइल केलेल्या असल्याने एका उकळीत शिजतात.फार जास्त गिरगिरीत नको.

आता तयार कुर्मा बाउलमधे काढून, वरून फ्रेश क्रिम घालावे व गरम फुलके, पोळीसोबत खावे.

टिप :-
* आवडीनुसार अननसाचे चार-पाच तुकडे किंवा डाळींबाचे दाणेही वरून घालावे. गोडसर छान चव येते.

* थोडा खवा किवा एखादा पेढाही घातला तरी चालते.

* थोडी आंबट -गोड चव हवी असेल तर, एक चमचा दही घातले तरी चालते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

साबुदाणा खिचडी (Sago Khichadi)

No comments :

'साबुदाणा खिचडी ' हा उपवासाचा पदार्थ सर्वपरिचित आहेच. कांही घरात तर खूपच आवडती डिश असते. घरात जर एका कोणाचा उपवास असेल तर खिचडी मात्र सर्वासाठी असते. मात्र खिचडी मोकळी व लुसलू़शित असेल तरच मस्त लागते. अशी खिचडी कशी करायची साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* साबुदाणा २ वाट्या
* भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट १/४ वाटी
* हिरवी मिरची भरड वाटून १ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* साखर चिमूटभर
* बटाटा साल काढून चौकोनी चिरून १
* आंबट ताक अर्धी वाटी
* जीरे १ टीस्पून
* तूप किंवा शेंगदाणा तेल २ टेस्पून
* ओलं खोबरं
* लिंबू
* कोथिंबीर ( उपवासाला चालत असेल तर)

कृती :-
प्रथम साबुदाणा दोन-तीन वेळा स्वच्छ धुवून त्यातील पाणी पुर्ण काढून टाकावे. आता त्यात आंबट ताक घालावे व गरज वाटली तर थोडेसे पाणी , साबुदाणा पुर्णपणे बुडेल इतके घालावे व २ -३ तास झाकून ठेवावा.

तीन तासानंतर साबुदाणा बोटाने दाबून बघावा दबला जात असेल तर भिजला समजावे अन्यथा पाणी शिंपङून अजून १५ मिनिट ठेवावा.

आता भिजून तयार झालेला साबुदाणा हाताने मोकळा करावा व त्यामधे शेंगदाण्यांचे कूट, मीठ, साखर व्यवस्थित मिसळून घ्यावे.

नंतर कढई अथवा जाड बुडाच्या पातेल्यात तूप/तेल गरम करून जीरे तडतडवून घ्यावेत. व फोडणीमधे हिरवी मिरचीची भरड, बटाट्याच्या फोडी टाकून परतावे.  फोडी मऊ करून ध्याव्यात.

शेवटी तयार केलेला साबुदाणा  घालून व्यवस्थित परतावे.  साबुदाणा पारदर्शक झाला की खिचडी तयार झाली समजा व गरमा-गरम खिचडी वरून खोबरे व घालून, लिंबूची फोड ठेऊन खायला द्यावी.

टिप्स :
*  या खिचडीला हिरवी मिरचीच वापरावी. खिचडीचा रंग स्वच्छ दिसतो.
*  खिचडी झाकून वाफवू नये चिकट होते.
*  भिजवताना ताक घातल्याने साबुदाणा फुलतो व खिचडी मोकळी व्हायला मदत होते व चवही चांगली येते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.


पडवळाची कोशिंबिर

No comments :

सर्वसामान्यपणे पडवळ म्हणजे नावडीची भाजी. परंतु पडवळ हे गुणाने थंड. त्यामुळे सिझनला पोटात गेलेच पाहीजे. तर पडवळाची भाजी खाण्यापेक्षा थोडे वेगळ्या चवीचे भरीत, कोशिंबिर केले तर आवडीने खाल्ले जाते. म्हणून मी कोशिंबिर केली. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* पडवळ पाव किलो
* घट्ट ताजे दही १ वाटी
* मीठ चविनुसार
* साखर चिमुटभर
* मोहरी १ टीस्पून
* फोडणीसाठी हिंग, जीरे, सांडगी मिरच्या २
* तेल फोडणीसाठी १ टेस्पून
* कोथिंबिर

कृती :-
प्रथम पडवळ स्वच्छ धुवून, आतील बीया काढून किसून घ्यावे.

किसलेल्या पडवळामधे मीठ, साखर व दही घालून चांगले ढवळून एकत्र करावे.

नंतर एका लहान कढल्यात हिंग जीरे व सांडगी मिरची घालून फोडणी करावी. ती थंड होईपर्यंत चमचाभर मोहरी कुटून अगदी थोड्या पाण्यात फेटून घ्यावी.

आता थंड झालेली फोडणी, फेटलेली मोहरी व कोथंबिर चिरून दही घालून तयार केलेल्या पडवळाच्या किसावर घालावे व परत नीट एकत्र करावे. कोशिंबिर तयार.

टिप :- फोडणी ऐच्छिक आहे. नाही दिली तरी कोशिंबिर छान लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

17 September 2016

अंगूर बासुंदी (Angoor Basundi)

No comments :

अंगूर बासुंदी हा पदार्थ जेवणात पुरी, पोळीला लावून खाण्यापेक्षा जेवण झाल्यावर खायला मला खूप आवडतो. माफक गोड व थंड असावा खूपच मस्त लागतो.कसा केला साहित्य व कृती,

साहित्य :-
* दूध १/२ लिटर
* साखर २ वाट्या
* पाणी ४ वाट्या
* लिंबू अर्धा
बासुंदी साठी
* दूध १लिटर
* साखर १/२ वाटी ( आवडीनुसार कमी-जास्त)
* वेलची पावङर
* ड्रायफ्रूट्स
* केशर

कृती :-

प्रथम दूध गरम करायला ठेवावे. तापून उकळी आली की, त्यामध्ये लिंबू रस घालावा व सतत ढवळत रहावे. दूध फाटून पाणी वेगळे होईल. आता गँस बंद करा.

आता गाळणीवर स्वच्छ तलम कपडा पसरवा व त्यावर फाटलेले दूध ओतावे. वरून गार पाणी घालावे, म्हणजे थंडही होईल व लिंबाचा आंबटपणाही पनीरला येणार नाही. आता पनीर पूर्ण पाणी निघून जाण्याकरता पुरचुंडी करून कपडा घट्ट पिळावा व टांगून अथवा वजनाखाली ठेवावा.

आता दुसरे एक लिटर दूध बारीक गँसवर उकळत ठेवा. सतत ढवळत रहावे.म्हणजे खाली करपणार नाही. किमान २५ टक्के आटवून घ्षावे.

नंतर त्यामधे साखर, वेलचीपूङ, केशर घालावे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे.

आता कपड्यातून पनीर काढून घ्यावे व भरपूर मळावे. किमान १५-२० मिनिट मळावे. हाताला तूप सुटून लागले पाहीजे.

मळून होईपर्यंत साखरेत पाणी घालून गँसवर ठेवावे. साखर विरघळून उकळू लागले की, नंतर मळलेल्या पनीरचे लहान -लहान द्राक्षाइतक्या आकाराच्या गोळ्या करून त्यामधे सोडा. २० मिनिट मोठ्या आचेवर गोळ्या शिजू द्या. शिजून, फुलून आकार वाटलेला दिसेल.गँस बंद करावा.

आता आधि तयार करून ठेवलेल्या बासुंदी मधे तयार पनीरचे गोळ्या पाकातून काढून सोडा वरून ड्रायफ्रूट्स घाला. अंगूर बासुंदी तयार.

आवडीनुसार तयार अंगूर बासुंदी फ्रिजमधे थंड होण्यासाठी ठेवून द्यावी व जेवणाच्या वेळी थंडगार "अंगूर बासुंदी" वाढावी.

टिप :- 

* दूध होल मिल्क वापरावे. पनीर छान मलईयुक्त व मऊ होते.

* पनीर मळण्यामधे तडजोड नको. जितके जास्त मळाल तितके अंगूर (गोळे)  मऊ व स्पाँजी बनतात अथवा टणक रहातात.

* दूधाला घट्टपणाा येण्यासाठी दोन टेस्पून मिल्कपावङर पाण्यात अथवा दूधात कालवून मिसळली तरी चालते.

* बासुंदी तयार करण्याचा वेळ वाचण्यासाठी दूधाऐवजी मिल्कमेड वापरले तरी चालते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

03 September 2016

हिरव्या मिरचीचे लोणचे (Green Chilly Pickle)

2 comments :

जेवणात तिखट,गोड,कडू,आंबट, खारट,तूरट असे सगळे स्वाद असावेत. एकतर आपल्या शरिराला या सर्व रसांची आवश्यकता असते व दुसरे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात. जसे की,कोशिंबिर, लोणचे, चटणी, रायता, भाजी, उसळ इत्यादी. तसेच ऐनवेळी भाजी कमी असेल तर लोणच्याची मदत होते. तर आपण मिरचीचे लोणचे कसे करायचे पाहू. साहित्य व कृती,

साहित्य :-

* हिरव्या ताज्या मिरच्या १/२ किलो
* मोहरी डाळ १/२ वाटी
* मीठ १/२ वाटी
* मेथी १/२ टीस्पून
* हळदपूड १ टीस्पून
* हींग १/२ टीस्पून
* लिंबूरस पाव ते अर्धी वाटी (अंदाजे ४ लिंबू)
* तेल पाव वाटी
* मोहरी फोडणी साठी

कृती :-

प्रथम मिरची धुवून,पुसून कोरडी करा व आपल्या आवडीच्या आकाराचे लहान तुकडे करा.

नंतर त्यामधे आधी मीठ, हळद, हिंग, लिंबूरस घालून हलवून ठेवा. आपण घाईत असू तर एखाद दुसरा दिवस तसेच ठेउन गेला तरी चालतो.  रस सुटतो.

आता मोहरीडाळ स्वच्छ करून कुटून घालावी. मेथीदाणे पण किंचित तेलावर तांबूस भाजून घेऊन बारीक पूड करावी व मिरची मधे मिसळावी.

शेवटी तेलामधे मोहरी व थोडा हिंग घालून फोडणी करावी व थंड झाल्यावर तयार लोणच्यावर घालावी. एकत्रित सर्व लोणचे परत
एकदा व्यवस्थित कालवावे.

साधारण आठ दिवसानी हे लोणचे बर्यापैकी मुरते व चवीला अजिबात तिखट लागत नाही. तसेच ज्यांना तिखट आवडते त्यांनी लगेच खाल्ले तरी छानच लागते.

हे लोणचे जेवणाची रंगत तर वाढवतेच पण दहीपोहे, दहीभात, उपमा, पराठे यासोबत ही अत्यंत रूचकर लागते.

टिप :- लोणचे बर्षभराचे एकदम करून ठेवण्यापेक्षा आपल्या गरजेनुसार थोडे -थोडेच करावे. ताजेपणाचा स्वाद छान असतो. मिरच्या तर बाराही महीने मिळतात.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.