22 August 2014

उकडीचे मोदक(Ukadiche Modak)

2 comments :
उकडीचे मोदक गणपती बाप्पाचे आवडते पक्वान्न. गणपतीचा नैवेद्य उकडीच्या मोदकाशिवाय पुर्ण नाहीच होत अशी आपली श्रध्दा. परंतु उकडीचे मोदक करणे तसे थोडे कौशल्याचे काम आहे. मग बरेचजण त्यातून मार्ग काढतात, तो म्हणजे कणिकेचे तळून किंवा उकडून मोदक केले जातात. पण उकडीच्या मोदकाची चव व रूबाब कांही वेगळाच! तसे थोडे लक्षपूर्वक केले, म्हणजे उकड काढणे, मळणे, पारी तयार करणे या गोष्टी जमल्या की, उकडीचे मोदक अजिबात अवघड नाही. तर कसे करायचे साहीत्य व कृती,

साहित्य:-
* खवलेला एक मोठा नारळ (अंदाजे ४ वाट्या)
* चिरलेला गूळ २ वाट्या
* बासमती तांदूळाचे पिठ ४ वाट्या
* वेलचीपूङ ,भाजलेली खसखस पूड
* मीठ चिमूटभर
* तेल, तूप
* पाणी

कृती:-
प्रथम सारण बनवण्यासाठी,नारळाच्या खवामधील दुध हाताने दाबून काढून घ्यावे.(ते आपरस बनविणेसाठी ठेवा) नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ठेउन सतत हलवत राहावे. गूळ वितळून मिश्रण थोडे चटचटले कि वेलची पूड ,खसखस पूड घालावी.परत एकदा मिश्रण एकत्र ढवळून गँस बंद करून बाजूला ठेवून द्यावे.

आता वरच्या पारीसाठी एका पातेल्यात जितके पिठ तितके पाणी अशा प्रमाणात पाणी घेऊन, म्हणजे ४ वाटी पीठाला ४ वाट्याच पाणी घेऊन उकळत ठेवावे. त्यामधे १ चमचा तूप व चवीसाठी  चिमूटभर मिठ घालावे.

आता पाणी उकळू लागले की,गँस बारीक करा व पीठ, रवीच्या दांड्याने ढवळत हळू-हळू घाला. व्यवस्थित ढवळा गुठ्यळ्या होऊ देऊ नका. ताटली झाकून ५ मिनिट राहू द्या. वाफ आली की,गँस बंद करा. तसेच झाकून १० मिनिट राहू द्या.

आता १० मिनिटानंतर परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड गरम असतानाच, हाताला तेल लावून पाण्यात हात बुडवावा व  व्यवस्थित मळून घ्यावी. त्यासाठी बाजूला भांड्यात  पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. तेल,पाणी लावून मऊसर मळून घ्यावी. जितकी जास्त मळाल तेवढी पारी बनविणे सोपे जाते, न चिरड्या जाता छान बनते व मोदकही फुटत नाहीत.

आता मळलेल्या उकडीचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचा तयार सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा. नवशिक्या मुलींना हाताने करणे तितकेसे जमत नाही. त्यानी साच्यातून मोदक करावेत.

 मोदक पात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीला तेलाचा हात लावावा किंवा  केळीचे/ कर्दळीचे पान तेलाचा हात लावून ठेवून त्यावर मोदक ठेवावेत.वरून गार पाण्याचा हबका मारावा व झाकण लावून आठ  ते दहा  मिनिटे वाफ आणावी.

गरमा-गरम तयार मोदक साजूक तूप व आपरसाबरोबर खायला  द्या.


आपरस:-
नारळाचा खव पिळून आपण जे दूध काढले होते त्यामधे वेलचीपूड ,साखर, भाजलेली खसखस घालावी आणी मोदका बरोबर खावे.

टीप :-  दिलेल्या साहित्यात अंदाजे, मोठे २१-२२ मोदक होतात.


आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.


2 comments :

  1. Madam;

    Good Initiative .

    Now Marathi foods @ international level.

    Nice.
    Regards
    Vijay Patil

    ReplyDelete
  2. Thanks !
    Pls post your valuable suggestions.
    And also feel free to ask any Veg recipe.
    i will try my best.

    ReplyDelete