07 September 2024
http://swadanna.blogspot.in/2014/08/blog-post.html?m=1
25 August 2022
प्रोटीन बार (Protine Bar)
04 July 2020
आम्रखंड (Mango Shrikhand)
श्रीखंड हा पदार्थ गुजरात मधून आला. आता मात्र जगभरात स्वीटडीश म्हणून खाल्ला जातो. श्रीखंड श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ असल्याने त्याच्या नैवेद्यासाठी सुध्दा वापरतात. थंडगार, मलईदार गोड श्रीखंड जेवणात पक्वान्न म्हणून पण केले जाते. तसे तर एरव्ही विकतचे निरनिराळ्या कंपन्यांचे तयार श्रीखंड आणून खाल्ले जातेच. परंतु खास मराठी नववर्षाच्या सुरवातीला म्हणजे गुढीपाडव्याला आमच्याकडे हमखास धरी चक्का बांधून. श्रीखंड केले जाते. अगदी चक्यासाठीचे दहीपण घरीच केले जाते. तसेच आंब्याच्या सिझन मधे 'आम्रखंडही' केले जाते.मी आंब्याचा सिझन संपता संपता थोडा आमरस फ्रिजरला साठवला होता. तर मी आम्रखंड केले.मलईदार,मधुर चवीचे 'आम्रखंड' कसे करायचे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
• फुल क्रीम दूध ३ लिटर
• दही पाव कप
• साखर १ किलो
• पिकलेल्या आंब्याचा रस - १कप
• वेलची पावडर १०-१२ वेलचीची
• मीठ पाव टीस्पून
कृती :-
प्रथम दूध एका मोठ्या पातेल्यात ओतून फक्त कोमट करून घ्यावे. ( पुर्ण तापवून, त्यावरची साय काढून नंतर कोमट करून घेऊ नये)
आता कोमट केलेल्या दुधामध्ये पाव कप दही ( फार आंबट ,शिळे नसावे) घालावे व डावाने हलवून घ्यावे व साधारण ६-८ तास ताटली झाकून कडेला ठेऊन द्यावे. विरजण लागते.
आता ६ तासांनी भांडे थोडेसेच हलवून पहावे, घट्ट दही लागलेले असेल. किंवा छोटा चमचा दह्यात एका बाजूला घालून चमच्याने दही काढून बघावे. त्याजागी लगेच पाणी दिसते. दही तयार झाले.
आता दही एका मलमलच्या स्वच्छ सुती कापडावर मोठ्या डावाने काढावे.त्याआधी एका भांड्यावर पीठाची चाळणी ठेवावी व त्यावर कापड पसरावे आणी त्यावर दही काढावे व कापडाची गाठ मारून त्यावर वजन ठेवावे. म्हणजे दह्यातील पाणी गळण्यास सोपे होते.
आता साधारण ६-१०तासांनी दह्यातील पाणी पुर्णपणे निथळते व घट्ट चक्का तयार होतो. ३ लिटर दुधाचा १ ते १.२५० किलो चक्का होतो. दुधाच्या घट्टपणावर चक्क्याचे प्रमाण अवलंबून असते. दूध जितके चांगले घट्ट, तेवढा चक्का अधिक होतो. जेवढा चक्का तेवढीच साखर घ्यावी.
आता चक्का कापडातून काढून चाळणीवर घासून घ्यावा. किंवा पुरण यंत्रातून फिरवून घ्यावा. म्हणजे गुठळ्या रहात नाहीत व एकसंध चक्का तयार होतो. आत्ताच आंब्याचा रस सुध्दा चाळणीवर चमच्याने घासून गाळून घ्यावा.
नंतर तयार चक्क्यामधे ,साखर मिक्सरमधून फिरवून मग मिसळावी.( साखर थोडी बारीक केली की लवकर विरघळते) मीठ, वेलची पावडर घालावे व चक्का चांगला डावाने घोटावा .म्हणजे साखर, मीठ व्यवस्थित मिसळून विरघळते .अर्धा तास चक्का तसाच झाकून ठेवावा.
अर्ध्या तासानंतर आपले मस्त मलाईदार तयार 'आम्रखंड' लहान -लहान दोन तीन डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे.
गरजेनुसार एक एक आम्रखंडाचा डबा फ्रिजमधून काढून पोळी /पुरी सोबत फस्त करावा. किंवा आईस्क्रीम सारखे नुसतेच स्वीटडीश म्हणूनही खाता येते. पाहुणे मंडळी येणार असतील किंवा सणवार असेल तर त्या हिशेबाने आधीच तयार करून ठेवले तरी चालते.
घरचे अवीट गोडीचे 'आम्रखंड' तुम्हीही लगेच करून बघा. एकदा घरच्या मलईदार श्रीखंड किंवा आम्रखंडाची चव जिभेला लागली तर विकतचे कोणत्याही कंपनीचे आवडणार नाही. याची खात्री देते तुम्हाला.
टिप्स :
• एकदा चक्का तयार झाला की आवडीनुसार केशर, ड्रायफ्रूट्स किंवा निरनिराळ्या फळांचे गर/ क्रश इसेन्स मिसळून कोणत्याही स्वादाचे श्रीखंड तुम्ही घरी बनवू शकता.
• दूध फुल फँटचेच घ्यावे.
• हवामानानुसार दही लागण्याला कमी-अधिक वेळ लागतो.
• साखर आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावी. अथवा शुगरफ्री पावडर वापरावी.मधुमेही पेशंटना खाता येते.
• दह्यातून निथळलेले पाणी अतिशय पौष्टिक असते. (व्हे प्रोटीन असते) ते टाकून न देता फ्रिजमधे ठेऊन रोजच्या स्वयंपाकात कणिक मळताना, भाजी,डाळ शिजवताना वापर करावा. किंवा ताकात मिसळून प्यावे. कढी करावी.
आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
29 June 2020
कढाई पनीर ( Kadhai Paneer)
कधी कधी घरच्या रोजच्या,घरगुती पध्दतीच्या पारंपरिक भाज्या खाऊन कंटाळा येतो. हाँटेल चवीची भाजी खावी वाटते. तेव्हा असे घरच्या घरीच हाँटेल स्टाईलची भाजी करायची. करायला अगदी सोपी आहे. कशी करायची साहित्य व कृती 👇👇
साहित्य :-
• पनीर २०० ग्रॅम
• सिमला मिरची २नग चौकोनी चिरून
• कांदा मोठा १ चौकोनी तुकडे करून
• लाल टोमॅटो मध्यम आकाराचे ३ नग
• कांदे मध्यम आकाराचे २ नग
• आले १ इंच
• लसूण ४-५ पाकळ्या
• हिरव्या मिरच्या २-३
• मीठ चवीनुसार
• कश्मिरी लाल मिरची पावडर २ टीस्पून
• कसूरी मेथी १ टीस्पून
• तेल ३ टेस्पून
• जीरे १ टीस्पून
• पाणी गरजेनुसार
कोरडे मसाले
• धणे १ टेस्पून
• जीरे १ टीस्पून
• मोठी वेलची १
• लहान वेलची ३-४
• दालचीनी १ इंच
कृती :-
प्रथम साहित्यामधे दिलेले कोरडे मसाले भाजून घ्यावेत. नंतर त्याच कढईत १टेस्पून तेल घालून त्यावर कांदा मऊ होईपर्यंत भाजून घ्यावा. कांदा भाजत आला की त्यावरच आले,लसूण व चिरलेला टोमॅटो ,लाला मिरची पूड घालून सर्व चांगले मऊ होईपर्यंत परतून,भाजून घ्यावे. टोमॅटो पुर्णपणे विरघळून लगदा झाला पाहिजे.भाजलेले सर्व साहित्य थंड होऊ द्या.
मसाला थंड होईपर्यंत मोठ्या चौकोनी चिरलेल्या सिमला मिरची, तसाच चौकोनी कांदा व पनीर क्यूब शँलो फ्राय करून घ्यावे.
आता मिक्सरमधे आधी भाजलेल्या कोरड्या मसाल्याची भरड पूड करून घ्यावी. नंतर थंड झालेले कांदा,टोमँटो वाटून पेस्ट करून घ्यावी.
आता कढाईत २ टेस्पून तेल गरम करून जीरे तडतडून घ्यावेत व त्यामध्ये वाटलेली पेस्ट घालून थोडे परतावे . त्यामधे शँलो फ्राय करून घेतलेली सिमला मिरची, कांदा, पनीर सर्व घालावे.आताच तयार केलेला भरड मसाला, कसूरी मेथी, मीठ,साखर घालावे व सर्व भाजी अलगद हाताने, पनीर चुरडणार नाही अशा बेताने हलवावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे व एक उकळी आणावी.
मस्त चमचमीत हॉटेलसारखे 'कढाई पनीर' तयार! रोटी, चपाती सोबत खा.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
19 June 2020
पँनकेक(Pancake)
साहित्य:-
• मैदा १ कप
• साखर २ टेस्पून
• बेकींग पावडर १ टीस्पून
• सोडा १/२ टीस्पून
• मीठ चिमुटभर
• बटर २ टेस्पून
• वँनिला इसेन्स १टीस्पून
• दूध १ कप
• पिकलेले केळे २ नग
• मध १ टेस्पून
कृती :-
प्रथम एका बाऊलमधे बटर घ्यावे व त्यामध्ये साखर, मीठ घालून फेटून घ्यावे. नंतर पिकलेली केळी दुधामध्ये मँश करून घालावीत व सर्व मिश्रण एकसंध घुसळून घ्यावे.
आता शेवटी तयार बँटरमधे इसेन्स,बेकींग पावडर, सोडा घालावे. शेवटी मैदा घालून गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेऊन सर्व मिश्रण एकसारखे हलवावे.आवश्यकता वाटली तर बँटर मधे दुध घालावे.डावाने ओतले तर पडण्यासारखे असावे.
आता सपाट नाँनस्टीक किंवा बीडाचा जाड तवा गँसवर मध्यम आचेवर तापवून लहान लहान आकाराचे पँनकेक घालावेत. पँनवर केकचे बँटर घालताना, बँटर पळीने फक्त ओतावे. ते आपोआप पसरेल इतपतच पातळ असूद्या. डोस्या सारखे पळीने अजिबात पसरायचे नाही .
एक बाजू झााली की दुसरीही भाजून घ्यावी.
तयार पँनकेक वरून मध घालून खायला द्यावे.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
15 June 2020
पोह्याची भजी(Poha Bhaji)
साहित्य:
* भिजवलेले पोहे २ वाट्या
* चणा डाळ अर्धी वाटी
* डाळीचे पीठ दोन चमचे
* तांदुळचे पीठ १ चमचा
* मीठ,हिंग आवडीनुसार
* हिरवी मिरची,आले ,लसूण पेस्ट
* कोथिबीर
* तेल तळणीसाठी
कृती:-
प्रथम भिजवलेली चणा डाळ भरड वाटून घ्यावी नंतर ती एका बाउल मध्ये काढून त्यामध्ये भिजवलेले पोहे व तांदुळचे पीठ,डाळीचे पीठ आणि वरील सर्व मसाला घालावा .कोथिंबीर घालून चागले एकजीव करावे.गरज वाटली तर थोडे पाणी घ्यावे.लहान-लहान भजी तेलात सोडून खरपूस तळवीत .
चटणी अथवा सॉस बरोबर खाण्यास द्यावे.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
उकडपेंडी (Ukadpendi)
उकडपेंडी हा जुनाच, पारंपरिक न्याहरीचा पदार्थ आहे. काळाच्या ओघात मागे पडलाय. परंतु आमच्या कडे वरचेवर होतो व सर्व आवडीने खातातही. आजकाल पोहे, इडली, डोसे, वडा अशा पदार्थांची चलती असल्याने बर्याचजणाना माहीतही नाही. तर उकडपेंडी गव्हाच्या पीठाची, ज्वारी, नाचणी, तांदूळ, भाजणीच्या पीठाची केली जाते. आवडीनुसार व उपलब्धतेनुसार कोणतेही पीठ घ्यावे. मी ज्वारीचे घेतले. आता कशी करायची ते पाहू.
साहित्य :-
• ज्वारीचे पीठ २ वाट्या
• आंबट दही/ताक १ वाटी
• पाणी १ वाटी
• कांदा बारीक चिरुन १
• हिरवी मिरची, आलं पेस्ट १ टीस्पून
• कढीपत्ता
• मीठ चवीनुसार
• तेल पाव वाटी
• हिंग, जीरे, मोहरी
• हळद, लाल तिखट
• कोथंबीर
कृती :-
प्रथम ज्वारीचे पीठ मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे व एका थाळीत काढून ठेवावे.
आता त्याच कढईत तेल तापवून मोहरी,जीरे, हिंग घालून मस्त खमंग फोडणी करावी. फोडणीत कांदा, कढीपत्ता, आलं, मिरची पेस्ट घालून परतावे.
आता फोडणीमधे भाजून ठेललेले पीठ घालावे. तिखट, मीठ, हळद ही घालून, घ्यावे. ऩंतर हळू हळू हलवत दही व गरम पाणी घालावे. गुठळ्या होणार नाहीत अशा बेताने सर्व जिन्नस एकत्र करावे . पांच मिनीटे मंद आचेवर वाफ येण्यास ठेवा.
पाच मिनीटात वाफ आल्यावर गरमागरम 'उकडपेंडी' डिशमधे खायला घ्यावी. वरून कोथंबीर घालावी. बरेचवेळा आवडीने वरून कच्चे तेलही घातले जाते.
सकाळच्या नाष्ट्याला अशी मस्त, खमंग गरमागरम उकडपेंडी खाल्ली की आत्मा तृप्त होतो. अन् वरून पौष्टिक हं! तर चला उद्या नाष्ट्याला तुम्हीही आवडीच्या पीठाची उकडपेंडीच करा. व कशी झाली ते सांगायला विसरू नका.
टीप: उकडपेंडी ला तेल मात्र जरा सढळ हातानेच लागते बरं का! कंजूषी नको. नाहीतर उकडपेंडी चिकट होते व खाण्यातली मजाच जाते.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
22 April 2020
गार्लिक नान (Garlic Naan)
रोज तीच तीच पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो.म्हणून पोळी भाजीसारखेच पण थोडी वेगळी म्हणजे कधी पराठे तर कधी पुरी भाजी असे पदार्थ केले जातात.आज विचार केला 'गार्लिक नान' करावेत. तेवढाच जेवणात बदल म्हणून केले.पुढे साहित्य व कृती पहा.
साहित्य :-
• गव्हाचे पीठ २ कप
• दही १/२ कप
• पाणी १/२ कप
• बेकींग पावडर १/२ टीस्पून
• सोडा १/४ टीस्पून
• मीठ १/२ टीस्पून
• साखर १ टीस्पून
• तेल २ टीस्पून
• बारीक चिरून कोथिंबीर
• कलौजी १ टेस्पून
• बारीक चिरून किंवा खिसून लसूण ८-१० पाकळ्या
• बटर ऐच्छिक
कृती:-
प्रथम गव्हाचे पीठ चाळून एका बाऊलमधे घेऊन त्यामधे दही, मीठ, साखर, बेकींग पावडर, सोडा व एक चमचा तेल घालून एकत्र करावे.
नंतर त्यामधे अर्धा कप कोमट पाणी घालून कणिक सैलसर अशी चांगली मळून घ्यावी. मळलेल्या गोळ्याला तेलाचा हात लावून किमान १५- २० मिनीटे झाकून ठेवावे. ( रात्री भिजवले व दुसरे दिवशी सकाळी नान केले तर अधिकच चांगले)
एव्हाना आता कणिक चांगली फुलली असेल .परत थोडी मळा व लहान लहान गोळे करावेत. इतक्या साहित्यात सहा गोळे म्हणजे सहा नान होतात.
आता एक गोळा घेऊन, पोलपाटावर थोडे सुके पीठ पसरून लंबगोल आकाराचे किंवा गोल आकाराची थोडी जाडसर पोळी लाटून किंवा हाताने पसरून त्यावर थोडी कलाौजी , लसूण व कोथिंबीर पसरावी व हाताने अलगद दाबावी किंवा अलगद लाटणे फिरवावे .
नंतर पोळीची मसाला लावलेली बाजू पोलपाटावरच उलटी करून टाकावी व वर आलेल्या बाजूवर ब्रशने किंवा हातानेच पाणी लावावे .
आता मध्यम आचेवर तापलेल्या तव्यावर पाण्याची बाजू तव्याला चिकटेल अशा बेताने पोळी तव्यावर टाकावी.
दोन मिनीटांनी लहान लहान फुगे येऊ लागतात तर आता तवा हँंडलला धरून अथवा चिमट्यात धरून गँसच्या ज्वाळेवर उलटा धरून पोळी खरपूस भाजून घ्यावी.
आता तवा सरळ करून भाजलेल्या पोळीवर बटर लावावे व गरमा गरम खुसखूशीत 'गार्लिक नान' छोले मसाला किंवा आपल्या आवडीच्या कोणत्याही ग्रेव्ही सब्जी सोबत खावा.
टीप:
• लसूण कणिक मळतानाच पीठामधे घातला तरी चालतो. परंतु काही वेळा कोणाला प्लेन म्हणजे लसूण नको असतो तर कोणाला पाहीजे असतो तर एकाच पीठात दोन्ही देता यावे म्हणून मी वरून लावले.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
11 April 2020
प्रेशर कुकरमध्ये सुरळीच्या वड्या /खांडवी ( Surali vadi /Khandavi in Pressure Cooker)
सुरळीच्या वडीला गुजराती बांधव खांडवी म्हणतात. करायला सोपा व खमंग चवीचा पदार्थ असल्याने सर्वजण करतात. बाहेर दुकानातून पण खांडवी, पात्रा ( अळूवडी) असे पदार्थ विक्रीलाही असतात. परंतु आपल्या चवीचे,शुध्द ,कमी खर्चात व जास्त होणारे पदार्थ आपण घरीच केले तर? तर अशीच 'सुरळीची वडी' घरी कशी करायची साहित्य व कृती पहा 👇👇
साहित्य :-
• चणा डाळीचे मऊ पीठ - १ कप
• आंबट ताक/ पातळसर दही - १ कप
• पाणी - २ कप
• हळद- पाव टीस्पून
• मीठ चवीनुसार
• आल-हिरवी मिरची पेस्ट - १ टीस्पून
• ओलं खोबरं, कोथिंबीर
• हिंग, मोहरीची दोन टेस्पून फोडणी
कृती :-
प्रथम मऊ दळलेले बेसन पीठ एका बाऊलमधे घ्यावे, त्यामधे हळद, मीठ, आलं-मिरची पेस्ट घालून एकत्र करावे.
अाता त्यामधे दही व पाणी थोडे -थोडे घालत गुठळ्या न होऊ देता पातळ मिश्रण तयार करावे.
नंतर तयार मिश्रण गाळणीतून गाळून घ्यावे, म्हणजे आलं- मिरची पेस्टचे धागे रहात नाहीत व मिश्रण एकसंध होते.
आता गाळलेले मिश्रण कुकरच्या मोठ्या डब्यात किंवा पातेलीत घालून कुकरमध्ये ठेवून शिजायला ठेवावे. आपल्या घरच्या कुकरमध्ये रोजचा डाळ-भात शिजवताना जितका वेळ लागतो किंवा शिट्ट्या काढतो, तितक्याच शिट्ट्या काढाव्यात. प्रत्येक कुकरचा आकार, गँस वेग वेगळे असते म्हणून शिट्ट्या किंवा वेळ लिहीले नाही.
कुकर झाल्यानंतर ,वाफ गेल्यावर मिश्रण कुकरमधून बाहेर काढावे व परत एकदा चांगले घोटावे व कलथ्याने पटापट स्टीलच्या ताटाला आतल्या व बाहेरच्या दोन्ही बाजूने पसरवून घ्यावे. ही कृती थोडी फास्ट करावी लागते कारण शिजवलेले मिश्रण जसे गार होईल तसे घट्ट व्हायला लागते व घट्ट मिश्रण पसरवता येत नाही.
आता सर्वात शेवटी ताटाला पसरवलेल्या मिश्रणावर आवडीनुसार खोबरे,कोथिंबीर व थोडीशी फोडणीही घालावी .सुरीने उभ्या रेषा माराव्यात व अलगद हाताने एक -एक पट्टीची सुरळी करून एका प्लेटमध्ये ठेवावी.
नंतर सजावटीसाठी वरूनही थोडी फोडणी व खोबरे कोथिंबीर घालून खायला द्यावे.
टिप्स :
• डाळीचे पीठ एकदम बारीक दळलेले असावे.
• दही किंवा ताक किंचित आंबटसर असावे परंतु जुने,वास येणारे नसावे.वडीची चव बिघडू शकते.
• सुरळीच्या आतल्या बाजूला फोडणी पसरवताना अगदी कमी घालावी किंवा त्यातली मोहरी मोहरीच जास्त घालावी. तेलामुळे सुरळी सुटते.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
04 February 2020
पाईनँपल हलवा ( Pineapple Halawa)
साहित्य :
• रवा - १ कप
• साखर - १ १/२ कप
• अननसाचे बारीक तुकडे - १ कप
• अननसाचा गर - १ कप
• साजुक तूप - १ कप
• गरम पाणी - २ कप
• चिमुटभर मीठ
• वेलची पावडर - १टीस्पून
• काजू,बेदाणे
कृती :-
प्रथम रवा साजुक तुपावर खमंग भाजून घ्यावा.
ऩंतर त्यामधे सावकाशपणे गरम पाणी घालून दोन मिनीट वाफवावा म्हणजे रवा फुलतो.
नंतर त्यामधे साखर,मीठ,अननसाचा गर व तुकडे घालून साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत रहावे. साखर विरघळली की,कडेने थोडे तूप सोडून परत दोन मिनिटे वाफ काढावी.
अननसाचा गर व लहान तुकडे
शेवटी वेलचीपूड व काजू, बेदाणे घालून गरमा-गरम लुसलुशीत 'पाईनँपल हलवा' डीशमधून खायला द्यावा व प्रतिसादाची वाट पहावी. 'व्वा मस्तच!' असे उद्गगार नक्कीच कानी पडतील. तुम्हीही नक्की करून बघा व प्रतिक्रिया द्यायला विसरु नका.
टिप्स :
• अननस छान पिकलेला मधूर वासाचा आणावा.
• हलव्यामधे पाण्याच्या जागी दुधाचा वापर अजिबात करू नये.
• तूप दिलेल्या प्रमाणातच वापरावे. नाहीतर हलवा मोकळा, लुसलुशीत होण्याऐवजी चिकट होतो.
• हलव्याचा गडद पिवळा रंग हवे असल्यास केशर किंवा खाद्यरंग वापरावा. मी नाही वापरला. ऐच्छिक आहे.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
08 January 2020
नायलाँन ढोकळा (Dhokala)
ढोकळा हा एक गुजराथी नाष्ट्याचा पदार्थ आहे. सर्वानाच खूप आवडतो. तसे पाहिले तर करायला एकदम सोपा... पण परफेक्ट मार्केट सारखा मुलायम,जाळीदार स्पाँंजी ढोकळा बनवायचा तर अचूक प्रमाणात साहित्य व योग्य कृती हवी.नाहीतर कधी मोकळे पिठले तर कधी बेसनाचे गोटे बनतात. म्हणून पुढील पध्दतीने ढोकळा करून बघा. अतिशय मऊ लुसलुशीत, जाळीदार ढोकळा होतो.
साहित्य :-
• बेसन पीठ - २०० ग्रँम(२कप)
•पाणी - १ १/४ कप
•तेल- ३ टे स्पून
•साखर - ३ टेबल स्पून
•सायट्रीक एसिड - १ टीस्पून
•सोडा -१/२ टीस्पून
•इनो फ्रूटसाँल्ट (निळे रेग्यूलर पॅकेट)-१/२ टीस्पून
•आलं- हिरवी मिरची पेस्ट १टेस्पून
•पिवळा खाद्यरंग /हळद पाव
फोडणीसाठी साहित्य :-
• मोहरी - २ टीस्पून
• तिळ - १ टीस्पून
• कढीपत्ता पाने - १०ते१५
• हिरवी मिरची (उभे काप करून)- २-३
• हिंग पाव टीस्पून
• खोबरे ,कोथंबीर सजावटीसाठी
• साखर -३ टीस्पून
• पाणी -पाउण ते एक कप
कृती :-
प्रथम एका मोठ्या बाऊलमधे पाणी घ्यावे. त्यामध्ये सायट्रीक एसिड,साखर, आलं-मिरची पेस्ट व तेल घालून साखर विरघळेपर्यंत ढवळावे.
आता दुसर्या बाऊलमधे चाळलेले बेसनपीठ घेऊन त्यामधे मीठ,पिवळा रंग घालून एकत्र करून घ्यावे.
आता आधी तयार केलेल्या पाण्यामधे हे पीठ थोडे थोडे मिसळावे. गुठळ्या होणार नाहीत याची दक्षता घेऊन बँटर तयार करावे.
नंतर गॅसवर जड पातेल्यात पाणी उकळण्यास ठेवून, तयार बँटरमधे सोडा व इनो मिसळावे. पट्कन एकत्र करून तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यात घालून १५-२० मिनिट वाफवून घ्यावे.
शेवटी फोडणी तयार करावी व त्यामध्ये पाणी व साखर घालून साखर विरघळवून घ्यावी. फोडणी थोडी कोमट असतानाच गार झालेल्या ढोकळ्यावर घालावी व खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
टिप :
• बेसन पीठ एकदम मऊ, मार्केटमध्ये मिळणारे तयार वापरावे.
• ढोकळा वाफण्यासाठी गॅसवर ठेवलेले पाणी उकळायला लागल्यावरच बँटरमधे सोडा व इनो मिसळावे व लगेच वाफण्यासाठी ठेवावे. फक्त सोडा घेणार असाल तर एक टी स्पून घ्यावा.
• ढोकळा तास ते दोन तास पूर्णपणे गार झाल्यावरच कापावा.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
17 December 2019
कोबी मन्चूरीअन ( Gobi Manchurian)
कोबी मन्चूरीअन हा स्टार्टरचा चायनीज पदार्थ आहे तरूण वर्गाला तर खूप आवडतो. तसा मन्चूरीअन हा पदार्थ पौष्टिकच!बर्याच भाज्या यांत असतात. पण बाहेरचे खायचे म्हणजे ऩक्की त्यात भाज्या आहेत का मैद्याचे गोळे असतील.. ? भाज्या स्वच्छ धुतल्या असतील का? अशा बर्याच शंका मनात येतात.अन् खरच एके ठिकाणी भिजवलेले सोया चंक चक्क कोबी मन्चूरीअन म्हणून दिले होते. म्हणून आज विचार केला की आपल्या हाताने सर्व भाज्या स्वच्छ धुवून,भरपूर भाजी घालून आपणच घरी करावे.. व घरी केलेले असल्याने मनसोक्त खाता येते. तर चला कसे केले ती कृती व साहित्य पहा -
साहित्य :-
मन्चूरीअन बाँलसाठी
• बारीक चिरलेला कोबी २ कप
• कांदापात १ कप
• बारीक चिरून सिमला मिरची अर्धा कप
• बारीक चिरून गाजर अर्धा कप
• आलं-लसूण पेस्ट १ टीस्पून
• हिरवी मिरची पेस्ट १टीस्पून
• लाल तिखट २ टीस्पून
• हळद
• मीठ चवीनुसार
• कोथंबीर
• मैदा पाव कप
• काँर्नफ्लोर पाव कप
• तांदूळ पीठी पाव कप
• तेल तळण्यासाठी
ग्रेव्हीसाठी साहित्य -
• तेल २ टेस्पून
• बारीक चिरलेला कांदा १
• कांदापातीचा मागचा पांढरा कांदा चिरून
• कांदापात बारीक चिरून अर्धी वाटी
• चिरलेला कोबी, गाजर, सिमला प्रत्येकी एक मूठ
• आलं- लसूण बारीक चिरून २ टीस्पून
• सोया सॉस १ टेस्पून
• टोमँटो सॉस १टीस्पून
• व्हीनेगर १/२ टीस्पून
• शेजवान सॉस/चटणी १ टीस्पून
• काँर्नफ्लोर पेस्ट २ टेस्पून
• मीठ चवीनुसार
• वरून सजावटीसाठी मुठभर चिरलेली कांदापात
कृती :-
प्रथम मन्चूरीअन व ग्रेव्हीसाठी लागणाऱ्या भाज्या, कांदा सर्व बारीक चिरून घ्यावे.
आता मन्चूरीअन बाँलसाठी लागणार्या सर्व भाज्या एका बाऊलमधे घ्याव्यात व त्यामध्ये वर दिलेले सर्व साहित्य घालून हाताने एकजीव करावे. पाणी अजिबात घालू नये. मिश्रण सैल वाटले तर थोडी तांदूळ पीठी, कॉर्नफ्लोअर अाणखी घालावे. नंतर तयार मिश्रणाचे लहान लहान बॉल सैल हाताने करून भजी प्रमाणे तेलात सोडावेत व खमंग तळून घ्यावे. तळलेले मन्चूरीअन बॉल एका बाजूला ठेवून द्या.
आता ग्रेव्ही करायला घ्यावी. त्यासाठी पँनमध्ये तेल घालावे व गरम झाले की, त्यामध्ये कांदा, चिरलेले आलं- लसूण घालून परतावे. नंतर त्यात भाज्या घालाव्यात व थोड्या परताव्यात. फार मऊ करू नये. आता त्यामध्ये मीठ,सॉस,चटणी, व्हिनेगर घालावे. शेवटी कॉर्नफ्लोअर पेस्ट घालून थोडे पाणी घालून शिजवावे. जास्त पाणी, घालून पातळ करू नये. ग्रेव्ही दाटसरच ठेवावी.
शेवटी तयार ग्रेव्हीमधे आधी तयार केलेले मन्चूरीअन बॉल सोडावेत व व्यवस्थित मिसळून घ्यावेत .
आता तयार कोबी मन्चूरीअन एका सर्व्हिंग डिशमध्ये घालून वरून थोडी चिरलेली कांदापात घालावी व सर्व्ह करावे.
टीप्स :-
* यामध्ये भाज्या आपल्या आवडीने घ्याव्यात.
• शेजवान चटणी आँप्शनल आहे. मी झणझणीतपणासाठी व चटपटीत लागावे यासाठी वापरली आहे.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
16 November 2019
राजमा मसाला (Rajama Masala)
-----------------
साहित्य :-
• भिजवून उकडलेला राजमा २ वाट्या
• बारीक चिरून कांदा मोठा १
• टोमँटो प्यूूरी १ वाटी
• आलं,लसुण,हिरवी मिरची पेस्ट २ टीस्पून
• खडा गरम मसाला ( एक तमालपत्र, दोन लवंगा, दोन दालचिनी काड्या, मसाला वेलची एक)
• पावडर गरम मसाला १ टीस्पून
• कसूरी मेथी अर्धा टीस्पून
• धना-जीरा पावडर २ टीस्पून
• लाल मिरची पावडर १ टीस्पून
• आमचूर पावडर अर्धा टीस्पून (ऐच्छिक)
• मीठ चवीनुसार
• तेल व फोडणी साहित्य
• वरून सजावटीसाठी क्रीम व कोथिंबीर (ऐच्छिक)
कृती :-
प्रथम राजमा आदले दिवशी रात्री स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात भिजत घालून ठेवावेत. दुसरे दिवशी मीठ घालून कुकरला मऊ शिजवून घ्यावेत.
आता प्रथम कढईत तेल घालून हिंग, जीरे, मोहरीची फोडणी करावी व फोडणीमधे हळद, खडा मसाला घालावा. थोडे परतून आता कांदा घालून परतावे. पाठोपाठ आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी घालून तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर त्यात मसाला,तिखट,मीठ, कसूरीमेथी वगैरे राहीलेले सर्व साहित्य घालावे गरजेनुसार पाणी घालून ,झाकून ठेवून एक उकळी काढावी.
तयार राजम्यामधे वरुन क्रिम व कोथिंबीर घालून गरमा गरम सर्व्ह करावे .
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
04 October 2019
उपवासाची कचोरी ( Upvas Kachori)
साहित्य :-
• उकडलेले मोठे बटाटे - ४ नग
• उपवासाची भाजाणी - २ टेस्पून
• ओले खोबरे किस - १ -१ १/२ वाटी
• काजू ७-८
• बेदाणे १० -१५
• हिरवी मिरची बारीक चिरून २
• लिंबू अर्धा
• भाजलेल्या जिर्याची पावडर १ टीस्पून
• मीठ चवीनुसार
• तेल तळण्यासाठी
कृती :-
प्रथम वरच्या पारीसाठी उकडलेले बटाटे साल काढून मोठ्या किसणीने किसून घ्यावेत. त्यामधे उपवास भाजणी व चवीनुसार मीठ घालून मळून एकजीव करावे व गोळा तयार करावा.
आता आतील सारणासाठी ओले खोबरे एका बाऊलमधे घेऊन त्यामधे मीठ, जिरेपूड,मिरचीचे तुकडे, काजू, बेदाणे घालूून लिंबू पिळावे व चमच्याने सर्व एकत्र मिसळावे.
नंतर वरील पारीसाठी तयार केलेल्या पीठाची लिंबाइतकी गोळी घेऊन त्याची खोलगट वाटी तयार करावी व त्यामधे तयार सारण भरून तोंड बंद करून चेंडू सारखा गोळा करावा.
आता तयार कचोर्या गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
गरमा-गरम कचोरी ओलं खोबरं, मीठ, दही, मिरची घालून वाटलेल्या चटणी बरोबर खायला द्यावी.
टिप्स :
• उपवासाची भाजणी पीठाऐवजी साबूदाणा पीठी किंवा शिंगाड्याचे पीठ किंवा आरारूट घेतले तरी चालते.
• आतील सारणामधे अर्धे खोबरे व अर्धे उकडलेले रताळे घालावे.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
25 July 2019
मेथी नमकीन (Methi Napkin)
साहित्य :-
• गव्हाचे पीठ १ कप
• बारीक रवा २ टेस्पून
• मैदा १ कप
• तेल ४ टेस्पून
• कसूरी मेथी ४ टीस्पून
• तिळ १ टीस्पून
• ओवा १ टीस्पून
• मिर्यांची भरड २ टीस्पून
• मीठ चवीनुसार
• तळण्यासाठी तेल
कृती :-
प्रथम एका बाऊलमधे गव्हाचे पीठ, मैदा, रवा एकत्र करून घ्यावे. नंतर त्यामधे मीठ,ओवा,कसूरी मेथी,तीळ,मिर्यांची भरड घालून सर्व एकत्र करावे.
आता या मिश्रणामधे मोठे चार चमचे तेल घालून हाताने चोळून चांगले मिक्स करावे. कोरडे पीठ मुठीत घेऊन दाबले तर मुटका होतो का पहावे. नाहीतर अजून एखादा चमचा तेल घालावे.
नंतर अंदाज घेत -घेत पाणी घालून घट्ट पीठ मळावे. दिलेल्या पीठाच्या प्रमाणासाठी साधारण अर्धा कप पाणी लागते. १० मिनीटे पीठ झाकून ठेवावे.
आता खूप जाड नाही का खूप पातळ नाही अशी पोळी लाटून लांबट पट्टया कापाव्यात. गरम तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंगावर तळावेत.
थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावेत. पाहीजे तेव्हा गरमा-गरम चहासोबत खमंग, खुसखूषीत 'मेथी नमकीन' चा आस्वाद घ्या.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
कटाची आमटी (Katachi Aamti)
साहित्य :-
* डाळीचा काढलेला कट ५ वाट्या
* सुके खोबरे एक लहान वाटी, ५० ग्रँम
* लिंबाएवढ्या चिंचेचा काढलेला कोळ
* गूळ लिंबाएवढा
* गरम मसाला १ टीस्पून
* गोडा मसाला २ टीस्पून
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* हळद १/२ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* फोडणीसाठी तेल एक पळीभर
* हींग, मोहरी, जीरे, कढीपत्ता
* कोथिंबीर
कृती :-
प्रथम सुक्या खोबर्याची वाटी डायरेक्ट गँसवर जाळामधे खरपूस भाजून घ्यावी.
आता भाजलेले खोबरे, जीरे, थोडा कढीपत्ता भाजून, कोथिंबीर सर्व मिक्सरमधे वाटून घ्यावे.
आता तेल गरम करून त्यामधे जीरे, मोहरी हींग तडतडवून घ्यावेत. त्यामधे कढीपत्ता, हळद, हींग घालावे व वाटलेला मसाला घालून परतावे. मसाला परतल्यावर त्यामधे लाल मिरचीपूड, गरम मसाला, गोडामसाला घालून परतावे.
सर्वात शेवटी डाळीचा कट, मीठ, गूळ व चिंचेचा कोळ घालून आमटी ५ मिनिट चांगली उकळू द्यावी. शेवटी वरून कोथिंबीर घालावी.
अशी ही खमंग कटाची आमटी मोकळ्या भातासोबत खूप छान लागते. तसेच पुरणपोळी खाताना मधे-मधे भुरकायलाही मस्त लागते. बरेचजण आमटीत पोळी बुडवूनही खातात. कशीही खा पण पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी पाहीजेच.
टिप्स :
* बरेचवेळा आमटीला कट कमी निघतो अशा वेळी थोडी शिजलेली डाळ घोटून घालावी.
* या आमटीला मसाला वाटताना खोबर्यासोबत हिरवी मिरची,आले, लसूण, कोथिंबीर व जाळावर खोबर्याप्रमाणे आख्खा कांदा भाजून घातला तरी चालतो.छान वेगळी चव येते. परंतु मी देवाला नैवेद्य असल्याने कांदा लसूण नाही घातले.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
10 July 2019
दुधीचे मुठीया (Dudhi Muthiya)
साहित्य :-
* खिसलेला कोवळा दुधी २ वाट्या
* गव्हाचे पीठ १ वाटी (कमी-जास्त होऊ शकते)
* चणाडाळीचे पीठ अर्धी वाटी (कमी-जास्त होऊ शकते)
* तांदुळाचे पीठ पाव वाटी
* बारीक रवा २ टेस्पून
*मीठ
*हळद
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
*धना-जिरा पावडर
* लिंबू रस चमचाभर
* कोथिंबीर
* फोडणी साहित्य तेल,हिंग, मोहरी,तिळ, कढीपत्ता
कृती :-
प्रथम कोवळा दुधी भोपळा सालं काढून किसून घ्यायचा. थोडं हलक्या हाताने किस पिळून घ्यायचा व निघालेले पाणी पिऊन टाकायचे. खूप नाही पाणी काढायचे. पण अगदीच न पिळता किस घेतला की पीठ खूप घालावे लागते व चवीला पीठ पीठ खूप लागते.
तर आता दुधीच्या किसात मावेल इतके गव्हाचे, तांदूळाचे व डाळीचे पीठ, रवा थोडासा घालायचे. तसेच मीठ, हळद, धना-जिरा पावडर, आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट, लिंबू रस, कोथिंबीर चिरून सर्व घालून सैलसर पीठ भिजवावे,
आता त्याचे मुटके करून उकडायचे व गार झाल्यावर कापून हिंग,जीरे,मोहरी,तिळ, कढीपत्ता घालून फोडणी करावी व त्यामधे उकडलेले मुठीया घालून चांगले तांबूस रंगावर परतायचे व खायचे.
टीप - यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या म्हणजे गाजर, पालक, मेथी मिसळले तरी छान लागते. तसेच पीठही बाजरी, मका, नाचणी मिसळून अधिक पौष्टिक करता येते.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
22 February 2019
हरा-भरा कबाब (Hara-bhara Kabab)
* हिरवे मटार २ वाट्या
* पालक एक जुडी
* शिमला मिरची २ नग
* बीन्स १ वाटी
* कांदापात चिरून १ वाटी
* कोथिंबीर १ वाटी
* हिरवी मिरची व आलं पेस्ट १ टीस्पून
* उकडलेले बटाटे २ नग
* ब्रेडक्रम्स २+२ टेस्पून
* काँर्नफ्लोअर २ टेस्पून
* मीठ चवीनुसार
* चाट मसाला १ टीस्पून
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
* आमचूर पावडर १/२ टीस्पून
* हळद १ टीस्पून
* जीरे १/२ टीस्पून
* तेल १ टीस्पून
* तेल तळण्यासाठी / शॅलोफ्राय साठी गरजेनुसार
प्रथम पालक निवडून स्वच्छ धुवून मोठा मोठा चिरावा व उकळत्या पाण्यात घालून दोन मिनिट ठेवावा. नंतर गरम पाण्यातून काढावा व चाळणीवर ठेवून वरून गार पाणी ओतून निथळत ठेवावे.
11 January 2019
फ्रेश स्ट्राँबेरी -कोकोनट बर्फी ( Fresh Strawberry -Coconut Burfi)
हिवाळ्यात सर्व भाज्या,फळे भरपूर प्रमाणात येतात.अन् खाल्लेही जातात. तर याच दिवसात लाल चुटूक रंगाच्या व हिरवे देठ असणार्या स्ट्राँबेरी बाजारात येतात.आंबट - गोड चवीच्या पिकलेल्या खूप छान लागतात. तसेच आपल्या आरोग्यासाठी पण उत्तम फळ आहे. यामधे विटामिन बी व सी भरपूर असते. शिवाय प्रोटीन, फाइबर, पोट्याशियम, मैग्नीशियम, फास्फोरस,आयोडीन अशीही तत्वे आहेत. स्ट्राँबेरी अनेक रोगाशी लढण्याची ताकद देते. जसे उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, कँंन्सर, डायबिटीज.शिवाय स्ट्राँबेरी सेवनाने पोट साफ रहाण्यास मदत होते. स्मरणशक्ति चांगली रहाते. डिप्रेशन कमी होते. महत्वाचे म्हणजे वजन घटण्यास मदत होते. म्हणून स्ट्राँबेरी ला सुपर फुड असेही म्हटले जाते. हे सर्व फायदे पाहून मी बाजारातून नेहमीच स्ट्राँबेरी आणते.पण नुसती खाऊन कंटाळा आला.म्हणून क्रश,बर्फी असे पदार्थ केले. या आधी च्या रेसिपीमधे क्रश केलाय. तेच वापरून ही बर्फी केली. कशी केली साहित्य व कृती-👇
साहित्य :-
• खोवलेले ओले खोबरे २ कप
• साखर २ कप
• स्ट्राँबेरी क्रश १/२ कप
• मिल्क पावडर १/२ कप
• फ्रेश क्रिम १ कप
• तूप १ टीस्पून ग्रीसिंगसाठी
कृती :-
प्रथम खोवलेले खोबरे +साखर मिक्सरमधून वाटून घ्यावी.
आता जाड बुडाच्या कढईत वाटलेले मिश्रण घालून मध्यम आचेवर शिजत ठेवावे.सतत ढवळत रहावे. अन्यथा मिश्रण तळाला करपू शकते.
आता मिश्रण अर्धे शिजले की फ्रेश क्रिम घालावे व सतत ढवळत रहावे.
आता कढईच्या कडेने मिश्रण कोरडे होण्यास सुरवात झाली की मिल्क पावङर घालावी. गँसची आच मंद करावी व सतत ढवळत रहावे. पांच ते दहा मिनिटानी मिश्रणाचा गोळा होतो व कढईपासून सुटू लागतो. आता गँस बंद करावा. मिश्रणाचे दोन भाग करावेत व एक भाग तूप लावलेल्या ताटात पसरवून वाटीने दाबावा. दुसरा कढईत तसाच राहू द्यावा. ही सर्व क्रिया झटपट करावी. अन्यथा मिश्रण खळखळीत कोरडे होते व वडी थापली जात नाही.
आता कढईमधे मिश्रणाचा जो अर्धा भाग आहे, त्यामधे स्ट्राँबेरी क्रश घालावे व पुन्हा पाच मिनिट गँस चालू करून शिजवावे.
नंतर आधीच जे पांढरे मिश्रण ताटात पसरलेय त्यावर हे स्ट्राँबेरी चे मिश्रण पसरावे. सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित थापून घ्यावे. थोडे सेट झाले की चाकूने आडव्या उभ्या रेषा पाडाव्यात.
आता पुर्ण गार झाल्यावर ही आकर्षक व सुंदर चवीची बर्फी डब्यात भरून ठेवावी.
टीप्स :
*,फ्रेश क्रिम च्या ऐवजी घरच्या एक लिटर दूधावरची जाड साय व एक कप दूध घेतले तरी चालते.
• साखरेचे प्रमाण थोडे कमी-जास्त केले तरी चालते.
° खोबरे कायम खवणीने खोवून नंतरच मिक्सरमधे वाटावे.अन्यथा बर्फीला अपेक्षित आकर्षक रंग येत नाही.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
09 January 2019
स्ट्राँबेरी क्रश ( Strawberry Crush)
सध्या बाजारात छान आंबट-गोड चवीच्या लालबुंद स्ट्राँबेरी येताहेत. सहाजिकच बघितले की घ्यावे वाटतात. घेतोही आपण पण घरी आणले की त्याचे काय करावे? प्रश्न पडतो. थोड्या नुसत्या खाल्या, कांही मिल्कशेक मधे गेल्या तर काही फ्रूट सलाडला गेल्या.राहीलेल्या वाया नको जायला म्हणून त्याचे क्रश करून ठेवले.कधीही मिल्कशेक, केक, हलवा, बर्फी बनविता येते. तर स्ट्राँबेरी क्रश कसा करायचा साहित्य व कृती-👇
साहित्य :-
• स्ट्राँबेरी ५०० ग्रॅम
• साखर २५० ग्रँम
• व्हिनेगर १ टीस्पून
कृती :-
प्रथम स्ट्राँबेरी देठ काढून स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी.
नंतर स्ट्राँबेरीचेे चाकूने मोठे -मोठे तुकडे करावेत.
आता जाड बुडाच्या पातेल्यात साखर व स्ट्राँबेरी एकत्र घालून मंद आचेवर ठेवावे व सतत साखर विरघळेपर्यंत ढवळत रहावे.
साखर विरघळली की, व्हिनेगर घालून दोन मिनिट मिश्रण उकळू द्यावे. एकतारी पाक होतो. गँस बंद करावा.
आता थंड झाल्यावर ब्लेडरने घुसळावे. तयार क्रश काचेच्या बाटलीमधे भरून ठेवावे.
हे क्रश फ्रिजमधे ठेवले तर दोन महीन्यापर्यंत टिकते. हवे तेव्हा काढून वापरता येते.अगदी रेडीमेड ज्यूस पिण्यापेक्षा एक भाग क्रश व तीन भाग थंड पाणी घालून झटपट ज्यूस करता येतो, मुले आवडीने पोळीबरोबर सुध्दा खातात.
टीप: स्टाँबेरी एकदम गोड नसतील तर साखरेचे प्रमाण वाढवावे. ५०० ग्रॅम स्ट्राँबेरी असेल ४०० ग्रँम साखर घ्यावी.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.