उन्हाळ्याची चाहूल लागली की मला थंडगार वाळ्याचं माठातलं पाणी, कैरीचं गारेगार पन्हं, चमचमीत आंबा डाळ, कैरी बारीक चिरून केलेलं तात्पुरतं ताज लोणचं, हे लहाणपणीचे सर्व आठवू लागते.चैत्र लागला की,चैत्रातले हळदी-कुंकू एखाद्या मंगळवारी ,शुक्रवारी केले जाते. तेव्हा खास कैरीचे पन्हे व आंबा डाळ करतात. अतिशय रूचकर लागते.अशी आंबेडाळ किवा डाळीची कोशिंबीर कशी करायची व साहीत्य काय ते पहा.
साहीत्य :-
1) चणाडाळ, 2 वाट्या (2-3 तास भिजवलेली) 2) मध्यम एक कैरी साल काढून किसून,
3) हिरव्या मिरच्या 2-3
4) मीठ साखर चवीनुसार,
5) बारीक चिरलेली कोथिंबीर,
6) रिफाईंड तेल, मोहरी ,जिरे, हळद, हिंग,मेथीदाणे फोडणीसाठी, दोन लाल सुक्या मिरच्या. कडीपत्ता
कृती:-
प्रथम भिजवलेली डाळ जाडसर कुटावी. खलबत्यात कुटली तर जास्त चांगली होते.रद्दा होत नाही.नाहीतर आजकाल मिक्सर मधे करतातच पण अवल-चवल अशी भरड ठेवा.
कुटताना पाव चमचा जिरे,मीठ,मिरची व साखर सर्व घालून कुटावे. म्हणजे नीट मिक्सही होते.
नंतर त्यात किसलेली कैरी व कोथिंबीर घालून नीट कालवून घ्यावी.
आता तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे,मेथी, हिंग, लाल मिरच्या,कडीपत्ता घालून फोडणी करावी. शेवटी हळद थोडी जास्त घालावी.
ही फोडणी गार करून डाळीत मिसळावी व डाळ नीट कालवून घ्यावी.
सर्व्ह करताना वरून कोथिंबीर पेरावी. ही डाळ जेवणात पण कोशिंबीर म्हणून वाढता येते व नुसतीसुध्दा बशीत घेऊन खातात.परंतू चना डाळ पचायला जड असते व त्यात आंबे डाळ कच्चीच असते.त्यामुळे आपले प्रकृतीमान संभाळून खावी.
टीप:-कैरीचा आंबटपणा पाहून प्रमाण कमी-जास्त करावे.
ही माझी रेसिपी २ मे २०१५ महाराष्ट्र टाइम्स, च्या,"चख दे " या सदरा खाली प्रसिद्ध झाली होती.