अहाहा...पुरणपोळी म्हटले की, लगेच डोळ्यासमोर लुसलू़शित, खमंग घरच्या शुध्द तूपाची धार सोडलेली टम्म फुगलेली पोळी येते. पुरणपोळी महाराष्ट्रातील एक पारंपारिक पक्वान्न आहे. पूर्वी कोणताही सण-समारंभ असेल तरी पुरणपोळीच असायची. आजच्यासारखे श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी अशी वेगवेगळी पक्वान्न नसायची. त्याला कारणही तसेच होते घरच्या डाळी, गूळ असायचे! आजकाल स्त्रीया पण नोकरी करतात, धावपळ असते. पुरणपोळी करणे म्हणजे वेळखाऊ व कष्टाचे काम आहे. तरीपण ठराविक दिवशी तरी, म्हणजे होळी, गौरी-गणपती किंवा श्रावण महीन्यात तरी हमखास घरोघरी केली जाते. कशी करायची साहीत्य व कृती,
साहीत्य :-
* चना डाळ ४ वाट्या
* गूळ ४ वाट्या
* कणिक ४ वाट्या
* वेलची, जायफळ पावडर करून
* पाणी ८ वाट्या
* तेल /तूप
* चिमुटभर हळद
* चिमुटभर मीठ
* तांदुळाची पीठी लाटण्यासाठी
कृती :-
प्रथम चणाडाळ दुप्पट पाणी घालून कुक तीन शिट्या काढून शिजवून घ्यावी. कुकर थंड होऊ द्या.
आता तोपर्यंत कणिक मीठ,हळद व तेल घालून मळून ठेवावी. गूळ चिरून घ्यावा. जायफळ किसून घ्यावे. वेलची सोलून बारीक पूड करावी.
आता शिजलेली डाळ चाळणी एखाद्या पसरट भांङ्यावर ठेवावी व चाळणीत काढावी. डाळीतील सर्व पाणी गळू द्यावे.
नंतर पाणी काढलेली डाळ व गूळ एकत्र करून, जाड बुङाच्या कढईत शिजत ठेवावे. कडेने कोरडे होउन गोळा झाले की शिजले असे समजावे.
आता तयार पूरण, यंत्राभधून वाटून घ्यावे. बरेचजण मिक्सरमधे पण वाटतात. पूर्वी पाटा-वरवंट्यावर वाटत असत.
आता शेवटी भिजवून ठेवलेली कणिक तेल व पाण्याचा हात लावून चांगली, थोडी सैल अशी किवचून घ्यावी.
नंतर तवा तापत ठेवा. लिंबाएवढी कणिक घेऊन त्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्यावा व कणिकेचा उंडा करावा व त्यात भरावे. अलगद हाताने पोळी पीठी लावून लाटावी. तूप सोडून खरपूस भाजून घ्या.
गरमा-गरम पोळी कणिदार तूप घालून दूधासोबत खायला द्या.
टीप :-
* पोळीसाठी शक्यतो गूळच वापरावा.
* कणिक मळताना निम्मे दूध व निम्मे पाणी घेतले तर पोळी जास्त लुसलू़शित होते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.