30 December 2015

रवा डोसा (Rawa Dosa)

No comments :


बरेच वेळा असे होते की,भुक तर लागलीय पण रोजची तीच ती पोळी-भाजी करायचा व खायचा पण कंटाळा येतो.नविन दुसरे काही करायचे काय ? चविला खमंग पाहीजे, पौष्टीक पाहीजे,जास्त मेहनत व साहीत्य नको  व मुख्य म्हणजे झटपट झाले पाहीजे !! तर अशा सर्व अटी मधे बसणारा असा हा रवा डोसा आहे.आपले दक्षिण भारतीय बांधव करतात असे डोश्याचे वेगवेगळे बरेच प्रकार .मी पण बरेचवेळा करते.संध्याकाळचे वेळी खाण्यास करणेस सोईचा आहे.कसा केला पहा.

साहीत्य:-

1) बारिक रवा 1 वाटी
2) तांदुळाचे पीठ 1/2 वाटी
3) मैदा 1/4 वाटी
4) पाच-सहा मिर्यांची भरड
5) जीरे अर्धा टीस्पून
6) हिरवी मिरची,कढीपत्ता,कोथंबिर,आले आवडीप्रमाणे बारीक चिरून
7) हींग,मीठ चवीनुसार
8) आंबट दही अर्धी वाटी (ऐच्छिक)
9) तेल भाजण्यासाठी
10)पाणी भिजवण्यासाठी

कृती :-

     सर्वात आधी कच्चाच रवा एका बाऊल मध्ये घ्यावा. त्यामध्ये मैदा व तांदुळ पीठ घालावे.नंतर एक एक करत तेल व पाणी सोडून वरील सर्व साहीत्य त्यात मिसळावे.

आता हलवत हलवत अजिबात गुठळ्या न होऊ देता थोडे-थोडे पाणी घालावे.नेहमीच्या डोसा पीठा पेक्षा एकदम पातळ ठेवावे.मी इतक्या साहीत्याला अंदाजे तीन-साडेतीन वाट्या पाणी घातले. त्यातूनही पहीला डोसा काढल्यावर अंदाज घेऊन पाणी कमी-जास्त होऊ शकते.भिजवून 5-10 मिनिटे रहातेच. इतर काही तयारी करेपर्यंत. तेवढेच भिजणे पुरे.

आता तवा तापत ठेवा . फार एकदम कडक गरम तापवू नये. तापल्यावर त्यावर थोडे तेल सोडा कापडाने पुसा व हाताने शिंपडून किवा डावाने थोडे वरून पीठ तव्यावर घाला. मंद आचेवर खरपूस भाजा.थोडे - थोडे तेल कडेने सोडावे. भाजला की आपोआपच कडेने सुटू लागतो. याला एकाच बाजूने भाजावे.दुसर्या बाजूने भाजण्याची अजिबात गरज नसते . एकदम पातळ व जाळीदार असल्याने छान कुरकूरीत खमंग असा झटपट डोसा तयार !

कोंथिबिर ,पुदीन्याच्या हिरव्या चटणी सोबत खायला द्या .

टीप्स :-  पिठ एकदम पातळ ठेवावे . दाट ठेवले तर डोसा मऊ  होतो.जितके पातळ तितका अधिक जाळीदार व कुरकूरीत होतो.

तसेच यात आपण आवडीप्रमणे कांदा बारीक चिरून घालू शकतो किंवा मुलांना जास्त पौष्टीक करून द्यायचा असेल तर काजू पावडर घालू शकतो.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

फ्लाॅवर पराठा(Cauliflower Paratha)

No comments :

एकूणच कोणत्याही भाजीचे पराठे करायला व खायला ही एकदम सुटसूटीत असतात. भाजी ही खाल्ली जाते व पोळीचेही काम होते. डब्यात न्यायला व घरात, कशासोबत ही  खाता येतात. लोणचे,दही, लोणी,चटणी अथवा गरमा-गरम नुसतैच. तर चला आज फ्लाॅवर चे पराठे करू. साहित्य व कृती :-

साहीत्य :-

* फ्लाॅवर एक मध्यम आकाराचा गड्ढा
* हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट
* मीठ चविनूसार
* गरम मसाला 1टीस्पून
* हळद, हींग
* चिरून कोथंबिर
* कणिक 4 वाट्या
* तेल
* पाणी

कृती :-

प्रथम कणिक तेल,मीठ घालून नेहमी प्रमाणैच मळून ठेवा.

आता फ्लाँवरची मोठी-मोठी फुले तोडून मीठाच्या पणाने धुवून घ्या.नंतर किसणीवर खिसून घ्या.

नंतर  कढईत तेल गरम करा. हळद, हींग घाला. हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट घाला. आता खिसलेला फ्लाॅवर घाला..एक वाफ आणा. नंतर मीठ, गरम मसाला,कोथंबिर घालून थोडे परता. गँस बंद करा. सारण थंड होऊ दे.

आता कणिकेचा उंडा करून त्यामधे तयार सारण भरा व पुरणपोळी प्रमाणे लाटा. तेल सोडून खरपूस भाजा.

गरमा-गरम खायला द्या.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

22 December 2015

बीटाची बर्फी ( Beetroot Burfi)

No comments :

बीट हे एक रसाळ कंद आहे. गडद लाल-किरमिजी रंग असतो व आतून एकदम लालभडक असते. बीटापासून खाद्यरंग तयार केला जातो. साॅस, सरबते, जेलि, आईस्क्रीम इत्यादी मधे वापरतात. तसेच बीटामधे आयर्न भरपूर प्रमाणात असते.बीट रोजच्या आहारात वापरल्यास शरीरातील लाल पेशी वाढण्यास मदत होते. शक्तिवर्धक व रक्तवर्धक आहे. बीटमधे नैसर्गिक साखरेचे प्रमाण भरपूर असते.तरीसूध्दा कॅलरीज कमी असतात. पाश्चिमात्य देशात बीटापासून साखर तयार केली जाते.बीटाला तशी काही स्वताची अशी खास चव नसते.काहीसे गोडसर लागते. मात्र याचा रंगच अधिक मोहक असतो. बीट सॅलडमधे कच्चे, उकडून भरीत तसेच किसून कोशिंबीर, सूप , पराठे, पूर्या, हलवा इ. अशा अनेक प्रकारे वापरता येते. बीट जास्तीत- जास्त कसे पोटात जाईल ? हा विचार करून ही बीटरूट बर्फी केली. कशी केली ती कृती व साहीत्य,

साहीत्य :-
* उकडून साल काढून बीटाचा किस 1 वाटी
* साखर 1 वाटी
* ओल्या नारळाचा चव 1 वाटी
* मिल्क पावडर 2 टेस्पून
* अर्धा कप दूधावरची जाड साय/ खवा पाव  
   वाटी
* पाव कप दूध
* वेलचि पाडर अर्धी टीस्पून
* सजावटीसाठी काजू-बदामाचे काप ऐच्छिक

कृती :-

प्रथम खोबरे व साखर एका जाड बुडाच्या कढईत एकत्र करून शिजत ठेवा.

नंतर साखर विरघळून खोबर शिजत आले की, त्यातच किसलेला बीट घाला.सतत हलवत रहा. हलवत-हलवतच आधी साय व दूध घाला. नंतर मिल्क पावडर घाला. एकसारखे हलवत रहा.

आता  काही वेळाने मिश्रण आटत येते व एकत्र गोळा होऊन कढई पासून सुटत येते.वेलची पूड घालून परत एकदा हलवा. गॅस बंद करा व मिश्रण एका ट्रेमधे किंवा थाळीमधे ओता. वरून काजू/बदामाचे पातळ काप पसरवा व हाताने किवा प्लास्टीक शीट ठेवून वाटीने वरून अलगद थापा. गरम असतानाच सूरीने वड्या कापून म्हणजे रेषा मारून ठेवा.

साधारण दीड-दोन तासानी वड्या सुकतात. आता त्या वड्या ट्रे मधून सुट्टया करून काढा व डब्यात भरून ठेवा. कोरडी थंड हवा असेल तर साधारण हवामानात चार दिवस सहज टिकतात. किवा मग फ्रीजमधे ठेवा. सिझन नूसार ठेवा.

आपल्या घरी कोणी येणार असेल किवा लहान मुलांचा वाढदिवस असेल तर अथवा दिवाळीत फराळाच्या ताटात रंगीत वड्या छान दिसतात. यांचा रंगच खूप सुंदर दिसतो.अतिशय रूचकर, पौष्टीक व सोप्या आहेत. तूम्हीही करून बघा  व प्रतिक्रीया द्यायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

20 December 2015

शिंगाड्याचा हलवा (Chestnut Halawa)

No comments :

शिंगाडा ही एक पाणथळजागी येणारी तृणवर्गीय  वनस्पती आहे. याचे कंद खाद्य म्हणून वापरतात.काहीशी गोडसर चव असते. या फळाची वरून साल काळपट रंगाची असते व आत पांढरा भाग ,गाभा जो असतो तो खाण्यासाठी वापरतात. पीठ तांबूस, गुलाबी रंगाचे असते. हे पीठ उपवासाला चालते. उपवासाचे काही पदार्थ करायचे असतील म्हणजे कटलेट, कचोरी इ.तर बाईंडींग साठी काॅर्नफ्लोअर सारखे वापरतात. काहीसा चिकटपणा असतो. तसेच शिंगाडा पीठाचे थालीपीठ, पुर्याही,  केल्या जातात. कंद बारीक चिरून शाबूदाण्या सारखी खिचडीही केली जाते.शिंगाडा अतिशय पौष्टीक असतो.चला तर आज 'शिंगाडा पिठाचा पौष्टीक हलवा' करूया. साहीत्य व कृती,

साहीत्य :-
* शिंगाडा पीठ 1 वाटी
* साखर 1 वाटी
* तूप मोठे 4 चमचे ( टेस्पून)
* वेलचीपूड अर्धा टीस्पून
* ड्रायफ्रूट्स
* पाणी

कती :-

प्रथम पॅन/कढई मधे तूप घाला. गरम झाले की, त्यामधे शिंगाडा पीठ घाला.बेसन लाडूचे बेसन जसे भाजतो तसे पीठ सतत हलवत राहून खमंग भाजून घ्या.

आता साखरेत अर्धा ते पाऊण वाटी कोमट पाणी घालून साखर पाण्यात विरघळवून घ्या व हे पाणी भाजलेल्या पीठात, गुठळी होणार नाही याची खबरदारी घेऊन कलथ्याने पीठ हलवत त्यात घाला. हलवत रहा.

पांच मिनिटात हे मिश्रण घट्ट होत येईल व कडेने तूप सुटू लागेल. गॅस बंद करा व वेलचीपूड , ड्रायफ्रूट्स घालून खाली उतरवा. हा हलवा साधारण सैलच असतो.

गरम लुसलूशित असा हलवा खाण्यास अतिशय उत्कृष्ठ लागतो. मुख्य म्हणजे उपवासालाही चालतो. तूम्हालाही आवडेल जरूर करून बघा व प्रतिक्रिया कळवायला विसरू नका .

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

16 December 2015

आलू-पालक सुकी भाजी ( Aloo-Palak Dry Subji)

No comments :

आलू-पालक भाजी जशी ग्रेव्ही स्वरूपात करता येते तशीच सुकीसुध्दा करता येते. डब्यात न्यायची असेल तर सुकी भाजी जास्त सोईची होते.कशी करायची कृती व साहीत्य -

साहीत्य :-

* बारीक चिरलेला पालक एक जूडी
* बारीक चिरलेला कांदा एक मोठा
* एक बटाटा साल काढून चिरून चौक फोडी
* गरम मसाला 1 टीस्पून
* मीठ चवीनूसार
* लाल मिरचीपूड 1 टीस्पून
* आल-लसूण, मिरची पेस्ट 1 टीस्पून
* हळद 1/4 टीसूपून
* तेल 2 टेस्पून
* फोडणी साहीत्य ,मोहरी,हींग

कृती :-

प्रथम कढईत तेल घालून गरम करा. हींग,मोहरी व हळद घालून फोडणी करा.

आता कांदा व आलं-लसूण मिरची पेस्ट घाला. कांदा मऊ होईपर्यंत परता.

नंतर चिरलेला बटाटा घाला घाला  व मऊ होईपर्यत परता.

शेवटी पालक घाला. याला जास्त परतावे लागत नाही. फोडणीत टाकल्यावर नुसता खाली बसला की बस्स.

आता चवीला मीठ , गरम मसाला व मिरचीपूड घाला. एक-दोन परतण्या द्या व गॅस बंद करा.

तयार भाजी बाऊलमधे काढा .फुलके/ पोळी सोबत छान लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते.आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

वांग्याचे भरीत ( Brinjal Raita)

No comments :

वांग्याचे भरीत हा पदार्थ फार पुर्वीपासून केला जाणारा जुनाच व सर्वाना माहीत असणारा पदार्थ आहे. फक्त प्रत्येक प्रांतानुसार किंवा आवडीनुसार करण्याची पध्दत निरनिराळी आहे.
कुठे भरीतात दही घातले जाते तर कुठे दाण्याचे कुट किंवा काही घरात नुसते भाजलेल्या वांग्याचा गर,मीठ,मिरची फोडणी घालून केले जाते . आज मी माझ्या घरात ज्या पध्दतिचे आवडते व केले जाते, त्याची साहित्य व कृती सांगते,

साहित्य :-
* मोठ भरताचे वांग १ नग
* लाल टोमँटो मध्यम २
* मोठा कांदा १
* लसूण पाकळ्या ६-७
* हिरवी मिरची २-४ किंवा आवडीनुसार
* कोथंबिर
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* मीठ चविनूसार
* साखर चिमूटभर (ऐच्छीक)
* हळद, हिंग, मोहरी फोडणीसाठी
* तेल २ टेस्पून

कृती :-

प्रथम वांगे स्वच्छ धुवून, पुसून कोरडे करावे व थोडे तेल चोळावे. मंद गँसवर जाळी ठेउन सर्व बाजूनी व्यवस्थित भाजावे.

वांगे भाजेपर्यंत कांदा, टोमँटो, लसूण, मिरची व कोथंबिर बारीक चिरून घ्यावे.

आता भाजलेले वांगे गार झालेले असेल तर अलगद हाताने सर्व साल सोलून काढावे व गार पाण्याने स्वच्छ धुवावे. म्हणजे भाजलेली काळी साल पुर्णपणे निघून जाईल.

आता धुतलेले वांगे चाँपिंग बोर्डवर ठेवून सुरीने कापावे व नंतर बाउलमधे ठेउन मँशरने अथवा हाताने मँश करावे.

नंतर तेल गरम करून हिंग, मोहरी व हळद घालून फोडणी करावी. फोडणीमधे कांदा (थोडा कच्चा गरात मिसळा),लसूण मिरची घालून परतावे. कांदा मऊ झाला की, चिरलेला टोमँटो घालावा व परतून मऊ झाला की लाल मिरचीपूड, मीठ व चिमूटभर साखर घालावी. शेवटी वांग्याचा गर व थोडी कोथंबिर घालावी व  सर्व नीट एकजीव करावे, पाण्याचा हबका मारावा व झाकून एक वाफ आणावी.

तयार भरीत बाऊलमधे काढून वरून कोथिंबिर घालावी. गरमा-गरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खावे. अतिशय रूचकर लागते. आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

भाजणी वडे( Bhajani Vada)

No comments :

चटपटीत खायला कोणाला आवडत नाही ? सर्वानाच आवडते. पण रोज नविन करायचे तरी काय ?  दिवाळीतल्या चकलची भाजणी थोडी शिल्लक होती.पण चकली करायची नव्हती.मग काय, घरात उपलब्ध  होती ती पीठं व भाजणी घेऊन केला प्रयोग ! छान जमला. कसे केले वडे साहीत्य व कृती बघा,

साहीत्य :-
* भाजणी पीठ 2 वाट्या
* ज्वारीचे पीठ 1/2 वाटी
* नाचणी पीठ 1/4 वाटी
* गहू पीठ 1 टेस्पून
* तिखट, मीठ चवीनूसार
* धना-जीरा पावडर 1 टीस्पून
* हींग 1/4 टीस्पून
* हळद 1/4 टीस्पून
* तिळ 1टीस्पून
* पाणी
* तळण्यासाठी तेल

कृती :-

प्रथम एका बाउलमधे सर्व पीठे एकत्र करा.

नंतर त्यामधे हळद,तिखट,मीठ, धना-जिरा पावडर,तिळ मिसळा.

आता यामधे दोन लहान चमचे गरम तेल घाला. वडे थापता येतील इतपत घट्ट पीठ पाणी घालून मळा. दहा मिनीट झाकून ठेवा.

नंतर तेल गरम करायला ठेवा व मोठ्या लिंबाइतकी गोळी घेऊन हाताने साधारण चपटा आकार द्या व मधे भोक पाडा. तयार वडे गरम तेलात सोनेरी तळा.

खुसखूषीत तयार वडे नुसतेच किवा घट्ट दह्यासोबत खा.

टीप :- आपल्या आवडीनूसार बारीक चिरून कांदा किंवा लसूण-मिरची पेस्ट घातली तरी चालेल

आपल्या प्रतिसादाने नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

खजूर-अंजिर मिल्कशेक( Dates-fig Milkshake)

No comments :

खजूर,अंजिर दोन्हीही खूप पौष्टीक. मग दोघांचा मिलाफ म्हणजे डबल पौष्टीक. लहान मुलांना वजन वाढीसाठी, शक्ति येण्यासाठी दूधात अंजिर भिजवून ते दूध देत असत. खजूर लोह वाढवतो. आणि दूधाची उपयुक्ततता तर आपल्याला माहीतच आहे. तर चला पट्कन आपण सोपा व पौष्टीक शेक तयार करू. साहित्य व कृती :

साहीत्य :-

* सीडलेस काळा खजूर ७-८ बिया
* सुकं अंजिर ४-५
* दूध २००मिली.
* साखर २ टेस्पून आवडीनुसार कमी-अधिक

कृती :-

प्रथम खजूर व अंजिर ४ तास थोड्या दूधामधे भिजत घाला.

नंतर मिक्सरमधे भिजलेले खजूर,अंजिर व साखर घाला व पेस्ट करा.

आता  दूध घाला व हलकेच एकदा फिरवा. खजूर -अंजिर मिल्कशेक तयार.

कोमट किंवा आवडत असेल तर गार सर्व्ह करा.
अगदी लहान मुलांना द्यायचे असेल तर कोमटच द्या.

15 December 2015

कोबी पराठा ( Cabbage Paratha)

No comments :

हिरवागार मस्त कोबीचा गड्डा होता. विचार केला की, याची माजी-पोळी तर करायचीच त्यापेक्षा पराठे करू लोणचं, साॅस दही काहीही घेऊन खाता येतात व पोळी-भाजीपेक्षा वेगळा प्रकार म्हणून सगळेच खूष.कसे करायचे साहीत्य व कृती-

साहीत्य-

* कोबी किसून 2 वाट्या
* धना-जिरा पावडर 2 टीस्पून
* लाल मिरचीपूड 1 टीस्पून
* हळद
* हिग
* मिठ चवीनूसार
* आल-'लसूण पेस्ट
* कोथंबिर  बारीक चिरून
* गव्हाचे पिठ गरजेनूसार
* तेल

कृती :-

प्रथम अगदी थोडे तेल कढईत घाला. थोडे गरम झाले की त्यामधे आलं-लसूण पेस्ट, धना-जिरा पावडर, हळद, हींग, मिरची पावडर घालून त्यावर किसलेला कोबी घाला व थोडे परता. मीठ घाला व साधारण मऊ झाले की, कोथंबिर घालून गॅस बंद करा. मिश्रण थोडे थंड होऊ दे.

आता थंड झालेल्या मिश्रणात मावेल इतकेच गव्हाचे पिठ घाला. व नीट मळून घ्या.

नंतर तयार पिठाचे लहान-लहान गोळे घेऊन थोडे जाडसर पराठे लाटा व तेल सोडून भाजा.

गरमा-गरम पराठे तयार !

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या. 


10 December 2015

माईनमुळा लोणचे( Coleus Root Pickle)

5 comments :
माईनमूळाचे लोणचे ही फक्त कोल्हापूरची खासियत आहे.माझ्या मते अन्यत्र कोठे मिळत नसावित किवा मला तरी माहीत नाही. कोणाला माहीत असल्यास सांगा. परंतू आम्ही खुद्द कोल्हापूरचे असल्याने आमचेकडे दरवर्षीच केले जाते. सर्वानाच आवडते. कोल्हापूरच्या बाजारात साधारण नोव्हेबर ते फेब्रूवारी या कालावधित ही माईनमूळे मिळतात.या एक प्रकारच्या मूळ्या असतात. तांबूस करडा आल्ल्या सारखा याचा रंग असतो.वरची सालं काढली की आतून पांढरट असते.माईनमूळे अत्यंत औषधी असतात. हाडातला जूना ताप(ज्वर) कमी होतो.या लोणच्याच्या कृतीतील सर्वात किचकट भाग म्हणजे माईनमूळ्या साफ करणे. मूळ्याच असल्याने याला माती लागलेली असते. यांच आकार म्हणजे करंगळी एवढाच असतो व मोठ्या म्हणजे अंगठ्याएवढ्या जाड.गाजरासारख्या लांब असतात पण त्याला अनेक बारिक मूळ्या असतात. लोणचं करायच्या आधि आणून रात्रभर पाण्यात टाकावी लागतात.मग दुसरे दिवशी सकाळी त्याची साले काढून उभट तूकडे करायचे. याच्या गोल चकत्या पण करतात, पण उभट तूकडे चावायला जास्त चांगले लागतात. तर असे हे लोणचे प्रत्यक्ष साहीत्य व कृती कशी ते पहा,
साहीत्य :-
* माईनमूळे 1 किलो
* मोहरी डाळ 1 वाटी
* बारीक मीठ 2 वाट्या
* लिंबाचा रस 1 वाटी (अंदाजे मोठी8-10   लिंबे)
* हिंग 10 ग्रॅम
* मेथी 2 चमचे
* हळदपूड 1चमचा
* मिरची पावडर 5-6 टीस्पून
* तेल 1/2 वाटी
* मोहरी 2 टीस्पून
कृती
प्रथम माईनमूळे साल काढून पूसून कोरडी करून घ्यावित.नंतर त्याचे साधारण एक इंचाचे लांब, मधून उभे चिरून तूकडे करावेत.
आता माईनमूळाच्या तूकड्यांवर हिंग,मीठ, हळद, मिरचीपूड व लिंबूरस घालून ठेवा.
नंतर मेथी थोड्याशा तेलावर तांबूस तळून घ्या. मोहरी डाळ कोरडीच किंचित गरम करा.( भाजून नाही) व मेथी मोहरी मिक्सरवर कुटून घ्या. वर तयार तूकडे आहेत त्यावर घाला व सर्व एकत्रित नीट हलवा.
लोणचे असेच एखाद-दोन दिवस नूसते सर्व मसाला कालवून राहू द्या. फक्त मधून मधून हलवा. रस चांगला सुटतो. नंतर तेल गरम करून हिंग, मोहरी घालून खमंग फोडणी करा. ती पूर्ण थंड करा मग लोणच्यावर ओता व परत एकदा नीट हलवा. लोणचे तयार !
कोरड्या केलेल्या , काचेच्या बरणीत तळाला थोडे बारीक मीठ घाला व नंतर लोणचे भरा.स्वच्छ कोरड्या जागी ठेवून द्या. लागेल तसे थोडे-थोडे लहान बाऊलमधे काढून ,फार घट्ट वाटले तर किंचित पाणी सैल करण्या साठी घाला व हलवा परत जराशी हवे असल्यास ताजी फोडणी घातली तर जास्त चांगले लागते. अन्यथा तसेच  जेवणात खाल्ले तरी चालते. छान लागते.
हे लोणचे, माईनमुळाचे तूकडे करकरीत असताना खायला खूप मजा येते. पण मुरले की , तूकडे अंब्याच्या लोणच्यासारखे साधारण मऊ होतात. पण चव छानच असते.
टीप :- या लोणच्यात तिखटपणा साठी लाल मिरचीपूड ऐवजी हिरव्या मिरचीचे तूकडेही घातले तरी चालते. परंतू लाल तिखटामूळे लोणच्याला लाल रंग छान येतो.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

गोडा मसाला/काळा मसाला (Goda Masala)

No comments :

'मसाला ' हा स्वयंपाक घरात बनणार्या प्रत्येक भाजी, उसळी,आमटी यांचा मुख्य 'आत्मा' असतो असे म्हणले तरी चालेल .कारण भाजीची मुख्य चव मसाल्यावरच  अवलंबून असते. आणि हा मसाला प्रत्येक घरात निरनिराळ्या प्रकारचा असतो. घरात पूर्वीपासून परंपरागत असा जो केला जातो तीच चव जीभेवर बसलेली असते व तोच मसाला वापरतात.मसाले ,मेतकूट शक्यतो घरच्या-घरीच करावेत.मसाल्याचा वास चांगला येतो. बर्याच कुटूंबात नुसता गरम मसाला वापरतात तर काही भागात कांदा-लसूण आलं,कोथंबीर व गरम मसाला, मिरची एकत्र कुटून केलेला वापरतात. याला कांदा-लसूण चटणी म्हणतात.गुजराती बांधव शक्यतो धना-जीरा पावडर वापरतात. तर ,साधारण ब्राम्हण समाजात 'गोडा मसाला' वापरतात.यालाच काळा मसालाही म्हणतात. हा मसाला व नुसते तिखट-मीठ घातले भाजीला तरी भाजी चविष्ठ होते.कसा करायचा ते साहीत्य व कृती पहा.

साहीत्य :-

* धणे 250 ग्रॅम
* जीरे  125 ग्रॅम
* सुकं खोबरं 125 ग्रॅम (मोठ्या दोन वाट्या)
* तिळ 50 ग्रॅम
* खसखस 50 ग्रॅम
* खडा हींग 10 ग्रॅम
* मोहरी 10 ग्रॅम ( दोन टीस्पून)
* मेथी 5 ग्रॅम (एक टीस्पून)
* लवंग 5 ग्रॅम (10-12)
* मिरे 5 ग्रॅम
* दालचिनी 5 ग्रॅम ( 2 इंचाच्या 4-5 कांड्या)
* तमालपत्र 5-6 पाने
* चिरफळ 4-5 नग
* मसाला वेलदोडा 4-5 नग
* शहाजीरे 5ग्रॅम
* बदाम फूल  5 ग्रॅम (4-5नग)
* लाल सुकी मिरची 5-6 किवा लाल मिरचीपूड
   पूड दोन टीस्पून
* हळदपूड 2 टीस्पून
* गोडेतेल 1 वाटी
* खडे मीठ अर्धी वाटी

कृती :-

प्रथम मसाल्याचे सर्व सामान वर दिलेल्या प्रमाणात काढून साफ करून निवडून घ्या.

खोबर्याचे पातळ काप करून घ्या.

आता सर्वात आधि तिळ,खसखस,मोहरी या वस्तू नुसत्याच कोरड्या, तेल न घालता भाजून घ्या. एका ताटात काढा.

नंतर धणे,जीरे व खोबरे सोडून बाकीच्या सर्व वस्तू ज्या कमी आहेत त्या अगदी थोडे-थोडे तेल कढईत घालून एक-एक वेगवेगळ्या चांगल्या भाजून घ्या. ताटात काढा.

आता त्याच कढईत परत थोडे तेल घालून जीरे तांबूस भाजून घ्या. ताटात काढा.

नंतर परत तेल घाला कढईत व खोबर्याचे काप तांबूस तळून काढा.

आता सर्वात शेवटी वाटीतले सर्व तेल घाला व धणे तांबूस भाजून घ्या.

याच क्रमाने सर्व साहीत्य भाजून घ्या म्हणजे तेवढ्याच तेलात सर्व नीट भाजले जाते व कढईत तेल शिल्लक रहात नाही . वाया जात नाही व मसाला फार तेलकटही होत नाही.

आता आधी तिळ, खसखस, मोहरी एकत्र मिक्सरच्या लहान भांड्यात कुटून घ्या. परातीत काढा.

नंतर सर्व लवंग, दालचिनी,मिरे असे वर दिलेले सर्व कमी पदार्थ एकत्र करून थोडे मीठ घालून कूटा. चाळून तिळ, खसखसवरच टाका. 

आता राहीलेला चाळ व जिरे थोडे मीठ टाकून परत मिक्सरला कूटा. परत चाळून घ्या.

जिर्याचा राहीलेला चाळ, धणे मीठ टाकून परत कूटा. चाळून घ्या.  चाळ परत-परत दोन-तिन वेळा कूटुन चाळून घ्या.शेवटी राहीलेला थोडा चाळ एकदम बारीक पावडर करा व आता न चाळताच परातीत टाका.

सर्वात शेवटी खोबर्याचे काप मीठ घालून कूटा व परातीतल्या मसाल्यावर घाला.

आता या मसाल्यात हळदपूड व मिरचीपूड टाका व सर्व मसाला हाताने नीट एकत्र कालवा.

हा तयार मसाला कोरड्या काचेच्या बरणीत तळात थोडे बारीक मीठ पसरून त्यावर  दाबून  भरा. वर शेवटीपण बरणीच्या तोंडाला मीठ पसरवा.घट्ट नीट झाकण लावून कोरड्या जागी ठेवून द्या. वर्षभर आरामात टिकतो. कोणत्याही रोजच्या भाज्या, उसळी, आमटी, मसाले भात यांत घालता येतो. झटपट  चवदार पदार्थ बनतो. हा मसाला तयार असेल तर स्वयंपाक पट्कन तयार होतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

03 December 2015

राजमा मसाला (Rajama Masala)

No comments :

राजमा मसाला एक पंजाबी भाजी आहे. राजमा मधे प्रोटीन्स भरपूर असतात. आपल्या आहारात जास्तीत -जास्त याचा वापर केला पाहीजे. भाजी कशी करायची पहा साहीत्य व कृती -

साहीत्य :-

* राजमा 1 वाटी
* कांदा 1 नग
* टोमँटो 1  नग
* आलं-लसूण पेस्ट
* लवंगा 2-4
* दालचिनी 2 काड्या
* तमालपत्रं एक
* तिखट, मीठ
* दही/ फ्रेश क्रिम (ऐच्छीक)
* तेल 2 टेस्पून

कृती :-

प्रथम राजमा 5-6 तास कोमट पाण्यात भिजवा.नंतर  कुकर मधे शिजवून घ्या. शिजवताना लवंगा, दालचिनी, वेलदोडे, तमालपत्रं घाला.

कढईत तेल गरम करून त्यात चिरलेले कांदे परता, लाल तिखट, वाटलेलं आलं-लसूण आणि टोमॅटोची पेस्ट घाला. शिजवलेला राजमा घाला. चविला मीठ घाला. गरजेनुसार थोडे पाणी घाला. पाच मिनिट शिजू द्या. शेवटी दही किंवा फ्रेश क्रिम घातल्यास चव छान येते. भातासोबत सर्व्ह करा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

29 November 2015

गोळ्याची आमटी (Curry)

No comments :

गोळ्याची आमटी हा एक मराठी पारंपारिक पदार्थ आहे. रोज तिच तिच डाळीची आमटी खाऊन कंटाळा येतो, पण रोजच्या जेवणात एक पातळ पदार्थ लागतोच. तेव्हा ही आमटी करायला हरकत नाही. साहीत्य व कृती पहा -

साहीत्य :-

* चणा ङाळीच पीठ 1 वाटी
* धना-जिरा पावडर 1 टीस्पून
* गोडा मसाला 1/2 टीस्पून
* मीठ चवीनुसार
* मिरची-लसूण पेस्ट 1/2 टीस्पून
* हळद हींग
* सोडा चिमूटभर
* पाणी गरजेनूसार

आमटी साहीत्य
* तेल 2 टेस्पून
* मोहरी,हीग,हळद
* कङीपत्ता
* सुक खोबरे व जीरे कुटून 1 टेस्पून
* चिंचेचा कोळ 1 टेस्पून
* गूळ सुपारी इतका एक खडा
* धना-जिरा पावडर 1 टीस्पून
* गोडा मसाला 1/2 चमचा
* लाल मिरची पावङर 1 टीस्पून
* मीठ चवीनूसार
* पाणी 5-6 वाट्या ( कमी-जास्त घेऊ शकता)
* कोथंबिर

कृती :-

प्रथम डाळीचे पीठ एका बाउलमधे घ्या.त्यामधे  वर गोळ्यासाठी दिलेले सर्व साहीत्य घाला व हाताने एकत्र करा. आता गरजेइतके म्हणजे गोळे करता येतील इतपत पाणी घालून घट्टसर भिजवून पंधरा मिनिट ठेवून द्या .तोपर्यत आमटीची तयारी करावी.

एका पातेल्यात तेल गरम करा. तापल्यावर त्यामधे हिंग मोहरी  हळद घालून फोडणी करा.कडीपत्ता टाका व पाणी घाला. आता त्यामधे वर आमटीसाठी दिलेले सर्व साहीत्य घाला व उकळी येऊ दे.

आता  आधि भिजवून ठेवलेल्या पीठाचे लहान-लहान गोळे तयार करा व उकळत्या  आमटीमधे सोडा व चांगले शिजू द्या . पाच मिनिटात शिजतात. आता जर आमटी फार पातळ वाटली तर, एक लहान चमचा डाळीचे पीठ पाण्यात कालवून आमटीत घाला व एक उकळी काढा.

गरमा-गरम गोळ्याची आमटी वरून कोथंबिर घाला व भात किवा पोळीसोबत वाढा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.