22 December 2015
बीटाची बर्फी ( Beetroot Burfi)
बीट हे एक रसाळ कंद आहे. गडद लाल-किरमिजी रंग असतो व आतून एकदम लालभडक असते. बीटापासून खाद्यरंग तयार केला जातो. साॅस, सरबते, जेलि, आईस्क्रीम इत्यादी मधे वापरतात. तसेच बीटामधे आयर्न भरपूर प्रमाणात असते.बीट रोजच्या आहारात वापरल्यास शरीरातील लाल पेशी वाढण्यास मदत होते. शक्तिवर्धक व रक्तवर्धक आहे. बीटमधे नैसर्गिक साखरेचे प्रमाण भरपूर असते.तरीसूध्दा कॅलरीज कमी असतात. पाश्चिमात्य देशात बीटापासून साखर तयार केली जाते.बीटाला तशी काही स्वताची अशी खास चव नसते.काहीसे गोडसर लागते. मात्र याचा रंगच अधिक मोहक असतो. बीट सॅलडमधे कच्चे, उकडून भरीत तसेच किसून कोशिंबीर, सूप , पराठे, पूर्या, हलवा इ. अशा अनेक प्रकारे वापरता येते. बीट जास्तीत- जास्त कसे पोटात जाईल ? हा विचार करून ही बीटरूट बर्फी केली. कशी केली ती कृती व साहीत्य,
साहीत्य :-
* उकडून साल काढून बीटाचा किस 1 वाटी
* साखर 1 वाटी
* ओल्या नारळाचा चव 1 वाटी
* मिल्क पावडर 2 टेस्पून
* अर्धा कप दूधावरची जाड साय/ खवा पाव
वाटी
* पाव कप दूध
* वेलचि पाडर अर्धी टीस्पून
* सजावटीसाठी काजू-बदामाचे काप ऐच्छिक
कृती :-
प्रथम खोबरे व साखर एका जाड बुडाच्या कढईत एकत्र करून शिजत ठेवा.
नंतर साखर विरघळून खोबर शिजत आले की, त्यातच किसलेला बीट घाला.सतत हलवत रहा. हलवत-हलवतच आधी साय व दूध घाला. नंतर मिल्क पावडर घाला. एकसारखे हलवत रहा.
आता काही वेळाने मिश्रण आटत येते व एकत्र गोळा होऊन कढई पासून सुटत येते.वेलची पूड घालून परत एकदा हलवा. गॅस बंद करा व मिश्रण एका ट्रेमधे किंवा थाळीमधे ओता. वरून काजू/बदामाचे पातळ काप पसरवा व हाताने किवा प्लास्टीक शीट ठेवून वाटीने वरून अलगद थापा. गरम असतानाच सूरीने वड्या कापून म्हणजे रेषा मारून ठेवा.
साधारण दीड-दोन तासानी वड्या सुकतात. आता त्या वड्या ट्रे मधून सुट्टया करून काढा व डब्यात भरून ठेवा. कोरडी थंड हवा असेल तर साधारण हवामानात चार दिवस सहज टिकतात. किवा मग फ्रीजमधे ठेवा. सिझन नूसार ठेवा.
आपल्या घरी कोणी येणार असेल किवा लहान मुलांचा वाढदिवस असेल तर अथवा दिवाळीत फराळाच्या ताटात रंगीत वड्या छान दिसतात. यांचा रंगच खूप सुंदर दिसतो.अतिशय रूचकर, पौष्टीक व सोप्या आहेत. तूम्हीही करून बघा व प्रतिक्रीया द्यायला विसरू नका.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
20 December 2015
शिंगाड्याचा हलवा (Chestnut Halawa)
शिंगाडा ही एक पाणथळजागी येणारी तृणवर्गीय वनस्पती आहे. याचे कंद खाद्य म्हणून वापरतात.काहीशी गोडसर चव असते. या फळाची वरून साल काळपट रंगाची असते व आत पांढरा भाग ,गाभा जो असतो तो खाण्यासाठी वापरतात. पीठ तांबूस, गुलाबी रंगाचे असते. हे पीठ उपवासाला चालते. उपवासाचे काही पदार्थ करायचे असतील म्हणजे कटलेट, कचोरी इ.तर बाईंडींग साठी काॅर्नफ्लोअर सारखे वापरतात. काहीसा चिकटपणा असतो. तसेच शिंगाडा पीठाचे थालीपीठ, पुर्याही, केल्या जातात. कंद बारीक चिरून शाबूदाण्या सारखी खिचडीही केली जाते.शिंगाडा अतिशय पौष्टीक असतो.चला तर आज 'शिंगाडा पिठाचा पौष्टीक हलवा' करूया. साहीत्य व कृती,
साहीत्य :-
* शिंगाडा पीठ 1 वाटी
* साखर 1 वाटी
* तूप मोठे 4 चमचे ( टेस्पून)
* वेलचीपूड अर्धा टीस्पून
* ड्रायफ्रूट्स
* पाणी
कती :-
प्रथम पॅन/कढई मधे तूप घाला. गरम झाले की, त्यामधे शिंगाडा पीठ घाला.बेसन लाडूचे बेसन जसे भाजतो तसे पीठ सतत हलवत राहून खमंग भाजून घ्या.
आता साखरेत अर्धा ते पाऊण वाटी कोमट पाणी घालून साखर पाण्यात विरघळवून घ्या व हे पाणी भाजलेल्या पीठात, गुठळी होणार नाही याची खबरदारी घेऊन कलथ्याने पीठ हलवत त्यात घाला. हलवत रहा.
पांच मिनिटात हे मिश्रण घट्ट होत येईल व कडेने तूप सुटू लागेल. गॅस बंद करा व वेलचीपूड , ड्रायफ्रूट्स घालून खाली उतरवा. हा हलवा साधारण सैलच असतो.
गरम लुसलूशित असा हलवा खाण्यास अतिशय उत्कृष्ठ लागतो. मुख्य म्हणजे उपवासालाही चालतो. तूम्हालाही आवडेल जरूर करून बघा व प्रतिक्रिया कळवायला विसरू नका .
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
16 December 2015
आलू-पालक सुकी भाजी ( Aloo-Palak Dry Subji)
आलू-पालक भाजी जशी ग्रेव्ही स्वरूपात करता येते तशीच सुकीसुध्दा करता येते. डब्यात न्यायची असेल तर सुकी भाजी जास्त सोईची होते.कशी करायची कृती व साहीत्य -
साहीत्य :-
* बारीक चिरलेला पालक एक जूडी
* बारीक चिरलेला कांदा एक मोठा
* एक बटाटा साल काढून चिरून चौक फोडी
* गरम मसाला 1 टीस्पून
* मीठ चवीनूसार
* लाल मिरचीपूड 1 टीस्पून
* आल-लसूण, मिरची पेस्ट 1 टीस्पून
* हळद 1/4 टीसूपून
* तेल 2 टेस्पून
* फोडणी साहीत्य ,मोहरी,हींग
कृती :-
प्रथम कढईत तेल घालून गरम करा. हींग,मोहरी व हळद घालून फोडणी करा.
आता कांदा व आलं-लसूण मिरची पेस्ट घाला. कांदा मऊ होईपर्यंत परता.
नंतर चिरलेला बटाटा घाला घाला व मऊ होईपर्यत परता.
शेवटी पालक घाला. याला जास्त परतावे लागत नाही. फोडणीत टाकल्यावर नुसता खाली बसला की बस्स.
आता चवीला मीठ , गरम मसाला व मिरचीपूड घाला. एक-दोन परतण्या द्या व गॅस बंद करा.
तयार भाजी बाऊलमधे काढा .फुलके/ पोळी सोबत छान लागते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते.आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
वांग्याचे भरीत ( Brinjal Raita)
वांग्याचे भरीत हा पदार्थ फार पुर्वीपासून केला जाणारा जुनाच व सर्वाना माहीत असणारा पदार्थ आहे. फक्त प्रत्येक प्रांतानुसार किंवा आवडीनुसार करण्याची पध्दत निरनिराळी आहे.
कुठे भरीतात दही घातले जाते तर कुठे दाण्याचे कुट किंवा काही घरात नुसते भाजलेल्या वांग्याचा गर,मीठ,मिरची फोडणी घालून केले जाते . आज मी माझ्या घरात ज्या पध्दतिचे आवडते व केले जाते, त्याची साहित्य व कृती सांगते,
साहित्य :-
* मोठ भरताचे वांग १ नग
* लाल टोमँटो मध्यम २
* मोठा कांदा १
* लसूण पाकळ्या ६-७
* हिरवी मिरची २-४ किंवा आवडीनुसार
* कोथंबिर
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* मीठ चविनूसार
* साखर चिमूटभर (ऐच्छीक)
* हळद, हिंग, मोहरी फोडणीसाठी
* तेल २ टेस्पून
कृती :-
प्रथम वांगे स्वच्छ धुवून, पुसून कोरडे करावे व थोडे तेल चोळावे. मंद गँसवर जाळी ठेउन सर्व बाजूनी व्यवस्थित भाजावे.
वांगे भाजेपर्यंत कांदा, टोमँटो, लसूण, मिरची व कोथंबिर बारीक चिरून घ्यावे.
आता भाजलेले वांगे गार झालेले असेल तर अलगद हाताने सर्व साल सोलून काढावे व गार पाण्याने स्वच्छ धुवावे. म्हणजे भाजलेली काळी साल पुर्णपणे निघून जाईल.
आता धुतलेले वांगे चाँपिंग बोर्डवर ठेवून सुरीने कापावे व नंतर बाउलमधे ठेउन मँशरने अथवा हाताने मँश करावे.
नंतर तेल गरम करून हिंग, मोहरी व हळद घालून फोडणी करावी. फोडणीमधे कांदा (थोडा कच्चा गरात मिसळा),लसूण मिरची घालून परतावे. कांदा मऊ झाला की, चिरलेला टोमँटो घालावा व परतून मऊ झाला की लाल मिरचीपूड, मीठ व चिमूटभर साखर घालावी. शेवटी वांग्याचा गर व थोडी कोथंबिर घालावी व सर्व नीट एकजीव करावे, पाण्याचा हबका मारावा व झाकून एक वाफ आणावी.
तयार भरीत बाऊलमधे काढून वरून कोथिंबिर घालावी. गरमा-गरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खावे. अतिशय रूचकर लागते. आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
भाजणी वडे( Bhajani Vada)
चटपटीत खायला कोणाला आवडत नाही ? सर्वानाच आवडते. पण रोज नविन करायचे तरी काय ? दिवाळीतल्या चकलची भाजणी थोडी शिल्लक होती.पण चकली करायची नव्हती.मग काय, घरात उपलब्ध होती ती पीठं व भाजणी घेऊन केला प्रयोग ! छान जमला. कसे केले वडे साहीत्य व कृती बघा,
साहीत्य :-
* भाजणी पीठ 2 वाट्या
* ज्वारीचे पीठ 1/2 वाटी
* नाचणी पीठ 1/4 वाटी
* गहू पीठ 1 टेस्पून
* तिखट, मीठ चवीनूसार
* धना-जीरा पावडर 1 टीस्पून
* हींग 1/4 टीस्पून
* हळद 1/4 टीस्पून
* तिळ 1टीस्पून
* पाणी
* तळण्यासाठी तेल
कृती :-
प्रथम एका बाउलमधे सर्व पीठे एकत्र करा.
नंतर त्यामधे हळद,तिखट,मीठ, धना-जिरा पावडर,तिळ मिसळा.
आता यामधे दोन लहान चमचे गरम तेल घाला. वडे थापता येतील इतपत घट्ट पीठ पाणी घालून मळा. दहा मिनीट झाकून ठेवा.
नंतर तेल गरम करायला ठेवा व मोठ्या लिंबाइतकी गोळी घेऊन हाताने साधारण चपटा आकार द्या व मधे भोक पाडा. तयार वडे गरम तेलात सोनेरी तळा.
खुसखूषीत तयार वडे नुसतेच किवा घट्ट दह्यासोबत खा.
टीप :- आपल्या आवडीनूसार बारीक चिरून कांदा किंवा लसूण-मिरची पेस्ट घातली तरी चालेल
आपल्या प्रतिसादाने नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
खजूर-अंजिर मिल्कशेक( Dates-fig Milkshake)
खजूर,अंजिर दोन्हीही खूप पौष्टीक. मग दोघांचा मिलाफ म्हणजे डबल पौष्टीक. लहान मुलांना वजन वाढीसाठी, शक्ति येण्यासाठी दूधात अंजिर भिजवून ते दूध देत असत. खजूर लोह वाढवतो. आणि दूधाची उपयुक्ततता तर आपल्याला माहीतच आहे. तर चला पट्कन आपण सोपा व पौष्टीक शेक तयार करू. साहित्य व कृती :
साहीत्य :-
* सीडलेस काळा खजूर ७-८ बिया
* सुकं अंजिर ४-५
* दूध २००मिली.
* साखर २ टेस्पून आवडीनुसार कमी-अधिक
कृती :-
प्रथम खजूर व अंजिर ४ तास थोड्या दूधामधे भिजत घाला.
नंतर मिक्सरमधे भिजलेले खजूर,अंजिर व साखर घाला व पेस्ट करा.
आता दूध घाला व हलकेच एकदा फिरवा. खजूर -अंजिर मिल्कशेक तयार.
कोमट किंवा आवडत असेल तर गार सर्व्ह करा.
अगदी लहान मुलांना द्यायचे असेल तर कोमटच द्या.
15 December 2015
कोबी पराठा ( Cabbage Paratha)
हिरवागार मस्त कोबीचा गड्डा होता. विचार केला की, याची माजी-पोळी तर करायचीच त्यापेक्षा पराठे करू लोणचं, साॅस दही काहीही घेऊन खाता येतात व पोळी-भाजीपेक्षा वेगळा प्रकार म्हणून सगळेच खूष.कसे करायचे साहीत्य व कृती-
साहीत्य-
* कोबी किसून 2 वाट्या
* धना-जिरा पावडर 2 टीस्पून
* लाल मिरचीपूड 1 टीस्पून
* हळद
* हिग
* मिठ चवीनूसार
* आल-'लसूण पेस्ट
* कोथंबिर बारीक चिरून
* गव्हाचे पिठ गरजेनूसार
* तेल
कृती :-
प्रथम अगदी थोडे तेल कढईत घाला. थोडे गरम झाले की त्यामधे आलं-लसूण पेस्ट, धना-जिरा पावडर, हळद, हींग, मिरची पावडर घालून त्यावर किसलेला कोबी घाला व थोडे परता. मीठ घाला व साधारण मऊ झाले की, कोथंबिर घालून गॅस बंद करा. मिश्रण थोडे थंड होऊ दे.
आता थंड झालेल्या मिश्रणात मावेल इतकेच गव्हाचे पिठ घाला. व नीट मळून घ्या.
नंतर तयार पिठाचे लहान-लहान गोळे घेऊन थोडे जाडसर पराठे लाटा व तेल सोडून भाजा.
गरमा-गरम पराठे तयार !
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
10 December 2015
माईनमुळा लोणचे( Coleus Root Pickle)
* माईनमूळे 1 किलो
* मोहरी डाळ 1 वाटी
* बारीक मीठ 2 वाट्या
* लिंबाचा रस 1 वाटी (अंदाजे मोठी8-10 लिंबे)
* हिंग 10 ग्रॅम
* मेथी 2 चमचे
* हळदपूड 1चमचा
* मिरची पावडर 5-6 टीस्पून
* तेल 1/2 वाटी
* मोहरी 2 टीस्पून
गोडा मसाला/काळा मसाला (Goda Masala)
'मसाला ' हा स्वयंपाक घरात बनणार्या प्रत्येक भाजी, उसळी,आमटी यांचा मुख्य 'आत्मा' असतो असे म्हणले तरी चालेल .कारण भाजीची मुख्य चव मसाल्यावरच अवलंबून असते. आणि हा मसाला प्रत्येक घरात निरनिराळ्या प्रकारचा असतो. घरात पूर्वीपासून परंपरागत असा जो केला जातो तीच चव जीभेवर बसलेली असते व तोच मसाला वापरतात.मसाले ,मेतकूट शक्यतो घरच्या-घरीच करावेत.मसाल्याचा वास चांगला येतो. बर्याच कुटूंबात नुसता गरम मसाला वापरतात तर काही भागात कांदा-लसूण आलं,कोथंबीर व गरम मसाला, मिरची एकत्र कुटून केलेला वापरतात. याला कांदा-लसूण चटणी म्हणतात.गुजराती बांधव शक्यतो धना-जीरा पावडर वापरतात. तर ,साधारण ब्राम्हण समाजात 'गोडा मसाला' वापरतात.यालाच काळा मसालाही म्हणतात. हा मसाला व नुसते तिखट-मीठ घातले भाजीला तरी भाजी चविष्ठ होते.कसा करायचा ते साहीत्य व कृती पहा.
साहीत्य :-
* धणे 250 ग्रॅम
* जीरे 125 ग्रॅम
* सुकं खोबरं 125 ग्रॅम (मोठ्या दोन वाट्या)
* तिळ 50 ग्रॅम
* खसखस 50 ग्रॅम
* खडा हींग 10 ग्रॅम
* मोहरी 10 ग्रॅम ( दोन टीस्पून)
* मेथी 5 ग्रॅम (एक टीस्पून)
* लवंग 5 ग्रॅम (10-12)
* मिरे 5 ग्रॅम
* दालचिनी 5 ग्रॅम ( 2 इंचाच्या 4-5 कांड्या)
* तमालपत्र 5-6 पाने
* चिरफळ 4-5 नग
* मसाला वेलदोडा 4-5 नग
* शहाजीरे 5ग्रॅम
* बदाम फूल 5 ग्रॅम (4-5नग)
* लाल सुकी मिरची 5-6 किवा लाल मिरचीपूड
पूड दोन टीस्पून
* हळदपूड 2 टीस्पून
* गोडेतेल 1 वाटी
* खडे मीठ अर्धी वाटी
कृती :-
प्रथम मसाल्याचे सर्व सामान वर दिलेल्या प्रमाणात काढून साफ करून निवडून घ्या.
खोबर्याचे पातळ काप करून घ्या.
आता सर्वात आधि तिळ,खसखस,मोहरी या वस्तू नुसत्याच कोरड्या, तेल न घालता भाजून घ्या. एका ताटात काढा.
नंतर धणे,जीरे व खोबरे सोडून बाकीच्या सर्व वस्तू ज्या कमी आहेत त्या अगदी थोडे-थोडे तेल कढईत घालून एक-एक वेगवेगळ्या चांगल्या भाजून घ्या. ताटात काढा.
आता त्याच कढईत परत थोडे तेल घालून जीरे तांबूस भाजून घ्या. ताटात काढा.
नंतर परत तेल घाला कढईत व खोबर्याचे काप तांबूस तळून काढा.
आता सर्वात शेवटी वाटीतले सर्व तेल घाला व धणे तांबूस भाजून घ्या.
याच क्रमाने सर्व साहीत्य भाजून घ्या म्हणजे तेवढ्याच तेलात सर्व नीट भाजले जाते व कढईत तेल शिल्लक रहात नाही . वाया जात नाही व मसाला फार तेलकटही होत नाही.
आता आधी तिळ, खसखस, मोहरी एकत्र मिक्सरच्या लहान भांड्यात कुटून घ्या. परातीत काढा.
नंतर सर्व लवंग, दालचिनी,मिरे असे वर दिलेले सर्व कमी पदार्थ एकत्र करून थोडे मीठ घालून कूटा. चाळून तिळ, खसखसवरच टाका.
आता राहीलेला चाळ व जिरे थोडे मीठ टाकून परत मिक्सरला कूटा. परत चाळून घ्या.
जिर्याचा राहीलेला चाळ, धणे मीठ टाकून परत कूटा. चाळून घ्या. चाळ परत-परत दोन-तिन वेळा कूटुन चाळून घ्या.शेवटी राहीलेला थोडा चाळ एकदम बारीक पावडर करा व आता न चाळताच परातीत टाका.
सर्वात शेवटी खोबर्याचे काप मीठ घालून कूटा व परातीतल्या मसाल्यावर घाला.
आता या मसाल्यात हळदपूड व मिरचीपूड टाका व सर्व मसाला हाताने नीट एकत्र कालवा.
हा तयार मसाला कोरड्या काचेच्या बरणीत तळात थोडे बारीक मीठ पसरून त्यावर दाबून भरा. वर शेवटीपण बरणीच्या तोंडाला मीठ पसरवा.घट्ट नीट झाकण लावून कोरड्या जागी ठेवून द्या. वर्षभर आरामात टिकतो. कोणत्याही रोजच्या भाज्या, उसळी, आमटी, मसाले भात यांत घालता येतो. झटपट चवदार पदार्थ बनतो. हा मसाला तयार असेल तर स्वयंपाक पट्कन तयार होतो.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
03 December 2015
राजमा मसाला (Rajama Masala)
राजमा मसाला एक पंजाबी भाजी आहे. राजमा मधे प्रोटीन्स भरपूर असतात. आपल्या आहारात जास्तीत -जास्त याचा वापर केला पाहीजे. भाजी कशी करायची पहा साहीत्य व कृती -
साहीत्य :-
* राजमा 1 वाटी
* कांदा 1 नग
* टोमँटो 1 नग
* आलं-लसूण पेस्ट
* लवंगा 2-4
* दालचिनी 2 काड्या
* तमालपत्रं एक
* तिखट, मीठ
* दही/ फ्रेश क्रिम (ऐच्छीक)
* तेल 2 टेस्पून
कृती :-
प्रथम राजमा 5-6 तास कोमट पाण्यात भिजवा.नंतर कुकर मधे शिजवून घ्या. शिजवताना लवंगा, दालचिनी, वेलदोडे, तमालपत्रं घाला.
कढईत तेल गरम करून त्यात चिरलेले कांदे परता, लाल तिखट, वाटलेलं आलं-लसूण आणि टोमॅटोची पेस्ट घाला. शिजवलेला राजमा घाला. चविला मीठ घाला. गरजेनुसार थोडे पाणी घाला. पाच मिनिट शिजू द्या. शेवटी दही किंवा फ्रेश क्रिम घातल्यास चव छान येते. भातासोबत सर्व्ह करा.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
29 November 2015
गोळ्याची आमटी (Curry)
गोळ्याची आमटी हा एक मराठी पारंपारिक पदार्थ आहे. रोज तिच तिच डाळीची आमटी खाऊन कंटाळा येतो, पण रोजच्या जेवणात एक पातळ पदार्थ लागतोच. तेव्हा ही आमटी करायला हरकत नाही. साहीत्य व कृती पहा -
साहीत्य :-
* चणा ङाळीच पीठ 1 वाटी
* धना-जिरा पावडर 1 टीस्पून
* गोडा मसाला 1/2 टीस्पून
* मीठ चवीनुसार
* मिरची-लसूण पेस्ट 1/2 टीस्पून
* हळद हींग
* सोडा चिमूटभर
* पाणी गरजेनूसार
आमटी साहीत्य
* तेल 2 टेस्पून
* मोहरी,हीग,हळद
* कङीपत्ता
* सुक खोबरे व जीरे कुटून 1 टेस्पून
* चिंचेचा कोळ 1 टेस्पून
* गूळ सुपारी इतका एक खडा
* धना-जिरा पावडर 1 टीस्पून
* गोडा मसाला 1/2 चमचा
* लाल मिरची पावङर 1 टीस्पून
* मीठ चवीनूसार
* पाणी 5-6 वाट्या ( कमी-जास्त घेऊ शकता)
* कोथंबिर
कृती :-
प्रथम डाळीचे पीठ एका बाउलमधे घ्या.त्यामधे वर गोळ्यासाठी दिलेले सर्व साहीत्य घाला व हाताने एकत्र करा. आता गरजेइतके म्हणजे गोळे करता येतील इतपत पाणी घालून घट्टसर भिजवून पंधरा मिनिट ठेवून द्या .तोपर्यत आमटीची तयारी करावी.
एका पातेल्यात तेल गरम करा. तापल्यावर त्यामधे हिंग मोहरी हळद घालून फोडणी करा.कडीपत्ता टाका व पाणी घाला. आता त्यामधे वर आमटीसाठी दिलेले सर्व साहीत्य घाला व उकळी येऊ दे.
आता आधि भिजवून ठेवलेल्या पीठाचे लहान-लहान गोळे तयार करा व उकळत्या आमटीमधे सोडा व चांगले शिजू द्या . पाच मिनिटात शिजतात. आता जर आमटी फार पातळ वाटली तर, एक लहान चमचा डाळीचे पीठ पाण्यात कालवून आमटीत घाला व एक उकळी काढा.
गरमा-गरम गोळ्याची आमटी वरून कोथंबिर घाला व भात किवा पोळीसोबत वाढा.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
आवळा लोणचे (Indian. Gooseberry Pickle)
या मोठ्या आवळ्यांना 'डोंगरी आवळा' सुध्दा म्हणतात. आवळा हे तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रंगाचे फळ आहे. व्हिटॅमिन "सी'चा सर्वोत्तम स्रोत म्हणून आवळ्याकडे पाहीले जाते. आवळ्याची विशेषतः ही की आवळा शिजवला तरीसुद्धा त्यातील "सी' व्हिटॅमिन नष्ट होत नाही. शिवाय आवळा त्वचेसाठी उत्तम असतो, कांती सुधरवतो, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी उपयोगी असतो. आवळ्याचे फळ तर मुख्यत्वे औषधात वापरले जातेच, पण आवळ्याच्या बियासुद्धा औषधी गुणांच्या असतात. अशा या गुणी आवळ्याचे लोणचे, चटणी, मुरांबा, आवळकाठी, सुपारी , सरबत इत्यादी अनेक पदार्थ केले जातात. सिझनमधे जितका जास्त खाता येईल तेवढा निरनिराळ्या प्रकारानी खाऊन घ्यावा. आज मी ताजे-ताजे लगेच खाता येण्यासारखे लोणचे केले.कसे पहा.
साहीत्य :-
* आवळे मध्यम आकाराचे 8-10 नग
(250 ग्रॅम)
* मोहरी डाळ 2 टेस्पून
* मेथी दाणे पाव टीस्पून
* हळद अर्धा टीस्पून
* लाल मिरची पूड अर्धा टीस्पून
* मीठ 6 टीस्पून किवा चवीनुसार
* हिंग पाव टीस्पून
* मोहरी अर्धा टीस्पून
* तेल 2-3 टेस्पून
* पाणी अर्धी वाटी
कृती --
प्रथम आवळे धुवून-पुसून साधारण चपट्या अर्ध चंद्राकृती फोडी कराव्यात. मीठ, हळद व मिरची पूड घालून एका बाऊलमधे ठेवा.
आता मोहरीडाळ मिक्सरवर बारीक करा व त्यातच पाणी घाला. नाकाला झिणझिण्या येईपर्यत (अंदाजे पांच मि.) घुसळावे व चिरलेल्या फोडीवर घालावी. मेथीदाणेपण तेलात तळून बारीक पूड करून घाला. सर्व व्यवस्थित कालवावे.
नंतर लहान कढल्यात तेल गरम करून हिंग, मोहरीची खमंग फोडणी करावी व थंड करून तयार केलेल्या लोणच्यावर घालावी व परत एकदा नीट हलवावे. लोणचे तयार !
ताजे-ताजे थोडे आंबट, थोडे तूरट चवीचे करकरीत लोणचे जेवणाची लज्जत वाढवते. तोंडाची रूची वाढवते. व हे लोणचे करकरीत खाण्यातच मजा येते
टीप : हे लोणचे फ्रीजमधे ठेवून खाल्यास आठ ते दहा दिवस टिकते. बाहेर फोडी मऊ पडतात व रंगही काळवंडतो. चवीत फरक पडत नाही.
तसेच जर जास्त प्रमाणात आवळे असतील व बर्षभरासाठी करायचे असेल तर फक्त पाणी घालू नये.बाकी सर्व कृती सारखीच.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
24 November 2015
पालक कोफ्ता करी ( Palak Koffta Curry)
आपण नेहमीच दुधी ,कोबी ,बटाटा अशा भाज्याचे 'कोफ्ता करी' बनवतो. आज थोडी वेगळ्या प्रकारची ''पालक कोफ्ता करी'' आपण बनवू. रीच अॅन्ड हेल्दी !
साहीत्य :-
कोफ्ता साठी
--------- -
* पालक बारीक चिरून 2-3 वाट्या
* डाळीचे पिठ 1 वाटी
* हिरवी मिरची पेस्ट 1 टीस्पून
* आलं एक इंच बारीक चिरून
* मीठ चवीला
* हिंग चिमूटभर
* हळद
* धना-जिरा पावडर 1 टीस्पून
* पाणी गरजेनूसार
करी साठी
---------
* लाल पिकलेले टोमॅटो 2 नग
* काजू 8-10
* शेंगदाणे 1 टेस्पून
* कादा बारीक चिरून मध्यम आकाराचा 1 नग
* आलं-लसंण पेस्ट अर्धा टीस्पून
* लाल मिरचीपूड 1 टीस्पून
* हळद पूड अर्धा टीस्पून
* धना-जिरा पावडर 1टीस्पून
* गरम मसाला 1टीस्पून
* मीठ चवीनूसार
* जीरे 1/2 टीस्पून
* तेल 4 टेस्पून
* पाणी गरजेनुसार
कृती :-
कोफ्ता
------
सर्वात आधी एका बाऊलमधे डाळीचे पीठ घ्या. आता त्या पिठा मधे चिरलेला पालक व वर सांगितलेले इतर सर्व साहीत्य मिसळा. बघत- बघत पाणी घाला व घट्टसरच असे भजी सारखे पीठ भिजवा.
नंतर ओवन सेफ ट्रेला तेलाचा हात लावून, त्यामधे लहान - लहान चपटे गोळे करून ठेवा.
आता तो ट्रे मायक्रोवेव्ह ओवनला हाय टेप. ला 4 मि. ठेवून द्या. तोपर्यत करीची तयारी करू. कोफ्ते तयार झाले की हाताला न चिकटता एकदम खुटखूटीत होतात.
करी
-----
पॅनमधे तेल गरम करत ठेवा. तोपर्यंत काजू, शेंगदाणे व टोमॅटोची मिक्सरवर पेस्ट करून घ्या.
आता तापलेल्या तेलात जिरे तडतडवून घ्या. त्यावर कांदा टाका. कांदा परतत आला की आल-लसूण पेस्ट टाका व परता. आता टोमॅटो काजूची तयार केलेली पेस्ट घाला व परतत परतत हळद , मिरची पूड, धना-जीरा पावडर ,गरम मसाला व मीठ घाला. सर्व मिश्रण तेल सुटे पर्यंत परता व शेवटी आपल्या आवडी नुसार कमी- जास्त पाणी घाला. शक्यतो घट्टसरच असावी ग्रेव्ही. खाण्यास चांगली लागते. एक उकळी येऊ दे.
शेवटी तयार कोफ्ते या गरम ग्रेव्ही मधे सोडा. पाच मिनिटाने गॅस बंद करा व गरमा-गरम 'पालक कोफ्ता करी' चपाती किवा फुलक्यां सोबत सर्व्ह करा.
टीप :- कोफ्ते भजी प्रमाणे तेलात तळून घेतले तरी चालतात.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
19 November 2015
मेथी पुरी ( Methi Puri)
मेथी भाजी मस्त खमंग लागते व त्याचे विविध असंख्य प्रकार बनवता येतात. जसे की, जेवणात भाजी तर बनवतोच तीन-चार प्रकारानी पण इतर भजी, कटलेट, पराठे, पचडी विविध प्रकार सुध्दा बनविता येतात. आता बाजारात छान येतेय मेथी , तर विविध प्रकार करून भरपूर खा. आज मेथीची मस्त खुसखूषीत खमग पूर्या केल्या. साहीत्य व कृती पहा.
साहीत्य :-
* गव्हाचे पिठ 4 वाट्या
* मैदा अर्धी वाटी
* बारीक चिरलेली मेथी 2 वाट्या
* कसुरी मेथी 2 टेस्पून
* धना-जिरा पावडर 2 टीस्पून
* हळद पावडर 1/2 टीस्पून
* मिरची पावडर 2 टीस्पून
* मिठ चवीनुसार
* हींग चिमूटभर
* तिळ 2 टीस्पून
* तेल
* पाणी
कृती :-
प्रथम गव्हाचे पिठ एका खोलगट बाऊल मधे घेऊन,त्यामधे तिखट,मीठ,हींग, धना जिरा पावडर घालून कोरडेच एकत्र करावे.
नंतर दोन टेस्पून तेल कढईत तापत ठेवा. तेल तापले की त्यात तिळ, हळद टाका पाठोपाठ कसूरी मेथी घाला थोडी तळली की, आता चिरलेली हिरवी मेथी टाका. पाच मिनट परतावे.थोडी मऊ झाली की गरम असतानाच आधी एकत्र करून ठेवलेल्या कोरड्या पिठात मिसळा व हाताने नीट मिक्स करून घ्यावे.
आता पाणी घेऊन थोडे थोडे घालत घट्ट कणिक भिजवा व दहा मिनिट झाकून ठेवा.
दहा मिनिटानी कणिकेच्या थोड्या जाडसर पुर्या लाटून गरम येलात तळा. मस्त खमंग खुसखूषीत ,' मेथी पुरी' तयार ! नुसत्याच किवा नाष्टयात चटणी , लोणचे साॅस घेऊन खा. चविला खुप छान लागतात.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.