15 December 2016

बाँम्बे-कराची हलवा (Bombay-Karachi Halawa)

No comments :
"बाँम्बे -कराची हलवा " हा सिंधी मिठाईचा एक प्रकार आहे. साधारण जेलीसारखा दिसतो व लुसलू़शित पण chewy असा अाहे. मिठाईच्या दुकानात खूप आकर्षकरीत्या अशी ही रंगी -बिरंगी मिठाई सजवून ठेवलेली असते. फार गोडही नाही. सणासुदीला किंवा पाहुणे येणार असतील तर करायला सोपी अन् दिसायला छान दिसते. कशी केली, साहित्य व कृती-
साहित्य :-
* काँर्नफ्लोअर १/२ कप (measuring cup)
* पाणी १ १/२ कप
इतर-
* साखर १ १/२ कप
* पाणी १ कप
* लिंबू रस १ टीस्पून
* तूप ४ टेस्पून
* फूडकलर आवडीचा कोणताही, ४-५ थेब
* वेलचीपूड
* काजू -बदाम काप १ टेस्पून

कृती :-
प्रथम एका नाँनस्टीक पँनमधे साखर व पाणी एकत्र करून, लहान गँसवर ठेऊन द्या. साखर विरघळे पर्यंत मधे -मधे हलवत रहा.
तोपर्यंत एका बाऊलमधे काँर्नफ्लोअर घ्यावे व त्यामधे दीड वाटी पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावी. गुठळ्या अजिबात राहू देऊ नयेत.

आता साखर विरघळली असेल तर त्यामधे ही तयार काँर्नफ्लोअर पेस्ट घालावी व सतत हलवत रहावे. तळापासून हलवावे. खाली लागण्याची शक्यता असते.

पांच मिनिटानी मिश्रण घट्ट होण्यास सुरवात होईल तर त्यामधे लिटेस्पून व रंगही घालावा व हलवत रहावे. ५-५ मिनिटानी हलवत हलवतच १-१ चमचा तूप घालावे. असे २० मिनिटे सतत हलवत रहावे.

आता मिश्रण पारदर्शी दिसू लागलेले असते. आताच त्यामधे काजू-बदामचे काप व वेलचीपूड घालावी. एकत्र सर्व हलवावे व असेल तर शक्यतो काचेच्या ट्रेमधे किंवा कोणत्याही ट्रेमधे तूपाचा हात चोळावा व तयार मिश्रण त्यावर ओतावे. वरून थोडे काजू -बदाम काप पेरावेत व मिश्रण १५ मिनिट गार होऊ द्यावे.
थंड झाले की बोट लावून पहावे. रबरासारखे मऊ लागते हाताला. नंतर तयार मिश्रणाच्या सुरीने कापून वड्या काढाव्यात.

या रंगीत वड्या खूप आकर्षक दिसतात तसेच इतर मिठाईच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात.

टिप :-
* काँर्नफ्लोअर पेस्ट तयार करताना अजिबात गुठळ्या रहाणार नाहीत याची काळजी घ्या. नाहीतर हलवा व्यवस्थित होत नाही.

* साखर फक्त विरघळवायची आहे. कोणताही एकतारी, दोनतारी पाक करायचा नाही.

* तूप दिलेल्या प्रमाणातच घालावे. कोणतीही तडजोड नको.

* सर्वात महत्वाचे दिलेल्या प्रमाणातच सर्व साहित्य मोजून घ्यावे.

* ही पाककृती करताना पूर्णपणे मंद गँसवर करावी. वाढवू नये.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

14 December 2016

मेथी भाजी (Methi Bhaji)

No comments :

मेथी सर्वांच्या परिचयाचीच भाजी आहे. सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. मेथीची मेत्रूटे, मेथीलाडू करतात. दूधवाढीसाठी त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात. तोंडाची चव गेली असल्यास या भाजीने रूची येते. मेथीची भाजी अनेक पध्दतिने केली जाते. तसेच पराठे, भजीही छान होतात. आज मी डाळवाली मेथीभाजी केली आहे. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* गोल पानांची ताजी मेथी जुडी १
* मुगाची डाळ १/२ वाटी
* लसूण ८-१0 पाकळ्या
* हिरवी मिरची ३-४
* मीठ चविनूसार
* तेल फोडणीसाठी
* हिंग-मोहरी, हळद

कृती :-
प्रथम मेथी निवडून, स्वच्छ धुवून बारीक चिरावी.मेथी निवडेपर्यंत मुगडाळ पाण्यात भिजत घालावी. मुगडाळ सहज व लवकर भिजते. वेळ लागत नाही.

आता कढईमधे (लोखंडी असेल तर जास्तच चांगले)  तेल गरम करून  हिंग,हळद मोहरीची फोडणी करून घ्या. फोडणीमधे लसूण ठेचून व हिरवी मिरचीचे तुकडे घालावेत. अशा फोडणीचा खमंग वास घरात पसरला की, कधी एकदा भाजी होतेय व आपण खातोय असे होते.

तर आता फोडणीमधे आधी भिजलेली डाळ व त्यावर चिरलेली मेथी टाकावी. पाच मिनिट झाकण ठेवावे. भाजी खाली बसते.  भाजीचा अंदाज येतो. आता चवीनुसार मीठ घालावे. आता झाकण न ठेवता, चमच्याने हलवत परतावे. भाजी सुकी झाली की गँस बंद करावा. या भाजीला वेळ लागत नाही. लोखंडी कढईत केली असेल तर लगेच दुसर्या भांड्यात काढून ठेवावी.

अशी खमंग भाजी सोबत गरमा-गरम टम्म फुगलेली भाकरी, लोण्याचा गोळा, कांदा व मिरचीचा खर्डा अहाहा.. स्वर्गसुख म्हणतात ते हेच का ते असे वाटते. त्यात बाहेरही मुसळधार पाऊस कोसळत असावा व आपली माणसे संध्याकाळी घरट्यात परतलेली असावीत, सर्वजण मिळून, गप्पा करत अशा जेवणावर ताव मारायला छानच वाटते.

मेथीची भाजी बर्याच पध्दतिने केली जाते. परंतु अशा पध्दतीने केलेली भाजीच घरात सर्वाना खूप आवडते. तुम्हीही करून बघा नक्की आवडेल.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

शेंगदाणे लसूण चटणी ( Dry Chutney)

No comments :

शेंगदाण्याची कोरडी चटणी एकदम सोपी, सर्वाना आवडणारी आहे. मुलांना डब्यात पोळीला तूप लावून त्यावर चटणी पसरून रोल करून देता येते.तसेच ऐत्यावेळी पाहुणे आल्यास ताटात डाव्या बाजूला वाढता येते. रोजच्या जेवणात दही घालून खाता येते. घाईच्यावेळी एखाद्या रस्साभाजाीमधे चमताभर टाकली असता रस्सा दाट व चवदार होतो. अशा अनेक प्रकारांनी उपयोगी येणारी चटणी कशी केली पहा. साहित्य व कृती ,

साहित्य :-
* भाजून सोललेले शेंगदाणे १ वाटी
* सोललेल्या लसूण पाकळ्या १० -१२
* मीठ चविनूसार
* लाल मिरचीपूड २ टीस्पून (आवडीनुसार कमी-जास्त)
* जीरे १/२ टीस्पून

कृती :-
वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधे भरड वाटले तरी चालते परंतु मी नेहमी ही चटणी खलबत्त्यात कुटून करते. चव अधिक चांगली लागते व कुटून केल्याने शेंगदाण्यांचे तेल सुटून एक ओलसरपणा चटणीला येतो व मुद्दा होते. कोरडे कुट होत नाही.

कुटताना सुध्दा सर्वात आधि खलबत्त्यात जीरे, लसूण, मीठ कुटून घेउन वाटीत काढावे. नंतर शेंगदाणे चांगले चेचून -चेचून तेल सुटेपर्यंत भरड कुटावेत.

नंतर त्यामधे मीठ चविनूसार, लाल तिखट व आधि कुटून ठेवलेला लसूण घालावा व एकत्र करून थोडे कुटावे. सर्व साहित्य एकजीव झाल्याची खात्री करून नंतर लहान बाटलीमधे भरून ठेवावी. आठ दिवस आरामात टिकते.

प्रवासात नेण्यासाठी पण उत्तम आहे.बरेचजण यामधे सुके खोबरेही कुटून मिसळतात. परंतु खोबरे घातले असता जास्त टिकत नाही. वास येतो.

तसेच मी मिरचीपूड घेतली आहे. पण ऐवजी सुक्या लाल मिरच्याही घेतात. अशी चटणी खूप तिखट होते. कारण मिरचीचे बी सुध्दा त्यामधे  कुटले जाते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

दोडक्याचा कोरडा (Dodkyacha Korada)

No comments :

"दोडक्याचा कोरडा" ही पारंपारिक पाककृती आहे. दोडक्याची डाळ घालून, दोडका, बटाटा, कांदा मिक्स भाजी, रस्साभाजी.. . भरला दोडका असे बरेच प्रकार आहेत. आज थोडे वेगळ्या पध्दतिने भाजी करण्याचे ठरविले  व या पारंपारिक पध्दतिची भाजी केली साहित्य व कृती,

साहित्य :-
* दोडका पाव किलो
* कांदा १
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
* कोथंबिर
* आमचूर पावडर किंवा लिंबूरस
* भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट २ टेस्पून
* मीठ चविनूसार
* साखर चिमूटभर
* तेल १ टेस्पून
* हळद,हिंग, मोहरी

कृति :-
प्रथम दोडके स्वच्छ धुवून साल काढून, खिसणीवर किसून घ्यावे. कांदा, कोथिंबिर बारीक चिरून घ्यावे.

नंतर कढईमधे तेल गरम करून हळद, हिंग, मोहरीची फोडणी करून घ्यावी.

फोडणीमधे कांदा व आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट घालावी व चांगले परतून घ्यावे.

परतेल्या मसाल्यामधे दोडक्याचा किस घालावा. मीठ, साखर घालावी व परतावे. किस मऊ झाल्यावर शेंगदाण्यांचा कूट घालावा व वर झाकण ठेवून एक वाफ काढावी.

तयार भाजीमधे वरून लिंबू पिळून सारखी करावी व कोथंबिर घालावी. गरम भाकरी, चपाती सोबत खावी.

या भाजीला शिजण्यासाठी पाणी घालण्याची गरज पडत नाही म्हणून याला "कोरडा" असे   म्हणतात.


12 December 2016

दाल मखनी (Dal Makhani)

No comments :
"दाल मखनी" ही पंजाबी डिश आहे. हाँटेलमधली सर्वात जास्त खाल्ली जाणारी, सर्व वयोगटातल्या लोकांच्या आवडीची व करायला पण सोप्पी अशी आहे. कशी करायची साहित्य व कृती,

साहित्य :-
* अाख्खे काळे उडीद १ वाटी
* राजमा किंवा आख्खी मसूर १/४ वाटी
* मोठा कांदा १ बारीक चिरून
* टोमँटो २ मध्यम पेस्ट करून
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट २ टीस्पून
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* गरम मसाला १ टीस्पून
* धना-जिरा पावङर १ टीस्पून
* आमचूर पावडर १/२ टीस्पून
* कसूरी मेथी २ टीस्पून (ऐच्छिक)
* मीठ चविनूसार
* फ्रेश क्रिम २-३ टेस्पून /दूध अर्धा कप
* बटर २ टेस्पून
* जीरे अर्धा टीस्पून
* कोथिंबिर बारीक चिरून
* हळद पूड अर्धा टीस्पून

कृती :-
प्रथम ६ ते ८ तास भिजलेले उडीद व राजमा कुकरला ३ -४ शिट्या काढून मऊ शिजवून घ्यावेत.
नंतर पँनमधे बटर गरम करून जीरे,हळद  घालावे. त्यावर चिरलेला कांदा व आलं -लसूण,मिरची पेस्ट टाकून परतावे.

आता टोमँटो पेस्ट घालावी. त्यावर लाल मिरचीपूड, गरम मसाला, मीठ, कसूरी मेरी घालून तूप सुटेपर्यंत परतावे. थोडे पाणी घालून, वर झाकणी झाकून पाच मिनिट शिजू द्यावे.

पाच मिनिटानी तयार मसाल्यामधे, मऊ शिजवून घेतलेले उडीद व राजमा /मसूर घालावे. आवडीनुसार अजून थोडे पाणी घालावे. परंतु जास्त पातळ करू मधे. घटसरच ठेवावे. घेतलेल्या पैकी निम्मे क्रिम घालावे व सर्व व्यवस्थित ढवळून गँस एकदम लहान करून किमान १० मिनिट झाकून शिजू द्यावे.महत्वाचे म्हणजे जितके जास्त शिजेल तितकी चव अधिक चांगली लागते. मोठ-मोठ्या रेस्टोरेंट मधे अधिक चांगल्या चविसाठी रात्रिच मंद आचेवर शिजत ठेवतात.

शेवटी बाऊलमधे काढून शिल्लक क्रिम व कोथंबिर वरून घालावे व गरमा-गरम फुलके, रोटी, चपाती आवडेल त्यासोबत खावे. खूप अप्रतिम लागते. तुम्हीही करून बघा नक्की आवडेल. कसे झाले कळवायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

03 December 2016

मसाला पाव (Masala Pav)

No comments :

"मसाला पाव " रोड साईड स्नँक्स चा प्रकार आहे. खायला चटपटीत व करायला पण सुटसूटीत. संध्याकाळी खाण्यासाठी एकदम मस्त. कसा करायचा साहीत्य व कृती,

साहित्य :-
* लादी पाव ६ नग
* मोठे कांदे २
* लाल टोमँटो २
* शिमला मिरच्या २
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट २ चमचे
* कोथिंबिर
* लिंबू अर्धा
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* हळद १ /२। टीस्पून
* पावभाजी मसाला १ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* चिमुटभर साखर
* आमचूर पावडर १ /२ टीस्पून
*  बटर

कृती :-

प्रथम कांदा, टोमँटो, शिमला मिरची, कोथिंबिर बारीक चिरून घ्यावे.

नंतर पँनमधे थोडे बटर घालावे व त्यावर कांदा घालावा व मऊ परतावा. आता आलं-लसूण मिरची पेस्ट घालावी.नंतर त्यावर शिमला व पाठोपाठ टोमँटो घालून सर्व मऊ परतावे.

आता परतलेल्या साहीत्यामधे सर्व मसाले हळद, लाल मिरचीपूड,  पावभाजी मसाला, आमचूर पावडर, मीठ व साखर घालावे. एकजीव करावे गरज वाटली तर किंचित पाणी घालावे. व पांच मिनिट झाकून ठेवावे.

शेवटी लिंबू पिळून कोथंबिर घालावी व वाटल्यास मँशरने मँश करावे. हा मसाला तयार झाला.

पँनमधे बटर घालून पाव मधून कापून भाजावा व  भाजलेल्या पावाला तयार मसाला आत लावावा.वरूनही थोडा लावावा. वरून कोथिंबिर घालावी व खायला द्यावा. मस्त चटपटीत मसाला पाव.

टिप :- हाच मसाला थोडा शिल्लक राहीला. मी फ्रिजमधे ठेऊन दिला व दुसरे दिवशी दोन बटाटे उकडून घेतले. पँनमधे थोडेसे बटर घातले व बटाटा मँश करून घातला त्यावर थोडे तिखट, मीठ, मसाला घातले आणि शिल्लक मसाला मिसळला व सर्व एकत्रित करून भाजी केली. ही भाजी भाजलेल्या पावामधे भरून त्यामधे कांदा, कोथिंबिर घातली व मिनी पावभाजीच केली. तीही चविला छान झाली.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

18 November 2016

वेज मनचाँव सूप (Manchow Soup)

No comments :

आजकाल चायनीज पदार्थांची क्रेझ वाढलीय. त्यापैकीच हे एक सूप आहे. यामधे बर्याच भाज्या असल्याने पौष्टीक व पोटभरीचे होते. संध्याकाळच्या जेवणात फारशी भूक नसेल व एक बाउल वेज मनचाँव सूप प्याले तर जेवणाची अजिबात भुक रहात नाही. असे हे स्पाईसी पण पौष्टीक सूप कसे केले पहा साहीत्य व कृती,

साहित्य :-

* चिरलेला कोबी १ वाटी
* शिमला मिरची १ वाटी
* गाजर किसून २ नग
* बीन्स १/२ वाटी
* कांदापात (पांढरा भाग)चिरून १/२ वाटी
* आलं-लसूण बारीक चिरून
* मिरची उभी चिरून बी काढलेली
* काँर्नफ्लोअर १ टेस्पून
* सोया साँस १ चमचा
* व्हिनेगार १ टीस्पून
* शेजवान साँस १ टीस्पून
* काळी मिरी पावडर १/२ टीस्पून
* मीठ चविनूसार
* वेजीटेबल स्टाँक किंवा पाणी ४ वाट्या
* तेल १ टेस्पून
* तळलेल्या चायनीज नूडल्स १/२ वाटी

कृती :-

प्रथम पँन गरम करून तेल घालावे. नंतर त्यामधे आलं-लसूण व मिरची घालून परतावे. नंतर कांदा व सर्व भाज्या एकेक करून घालून परताव्यात. फार मऊ होईपरेंत नको. साधारण कचवटच ठेवाव्यात.

आता मीठ,मिरपूड व व्हिनेगार, शेजवान साँस, सोया साँस घालावे. त्यावर व्हेजिटेबल स्टाँक घालावा. उकळत असतानाच काँर्नफ्लोअर अर्धा कप पाण्यात पेस्ट करून त्यामधे घालावे व सर्व चांगले ५ मिनिट उकळू द्यावे.

शेवटी तयार सूप बाऊलमधे काढून सर्व्ह करताना वरून तळलेल्या नूडल्स घालाव्यात व गरमा-गरम प्यायला द्यावे.

टिप्स :-
*भाज्या एकदम बारीक व लांबट चिराव्यात.

*व्हेजिटेबल स्टाँक असेल तर जास्त चांगले. सूप अधिक पौष्टीक बनते.

* नूडल्स ऐच्छीक आहेत. तयार मिळतात. किंवा चायनीज नूडल्स गरम पाण्यात शिजवून पाणी काढावे व गार नूडल्स तेलात कुरकुरीत तळून घ्याव्यात.

*आवडीनुसार भाज्या व प्रमाण घेऊ शकता.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

22 October 2016

रवा लाडू ( Rawa Ladu )

No comments :
लाडू आपण एरव्हीही मधल्या वेळी खाण्यासाठी किंवा कोणी आले गेले तर खायला देण्यासाठी सोयीचे होते म्हणून करतो. तसेच दिवाळी आली की खास फराळाच्या ताटातला पदार्थ म्हणून त्याची हक्काची जागा असतेच. यात सुध्दा कोणी रवा-बेसन लाडू करतो तर कोणी खवा घालून करतो. मी ओला नारळ घालून केलेत. कसे ते पहा साहित्य व कृती, 

साहीत्य:-

१) बारीक रवा ४ वाट्या
२) साखर ३ वाट्या
३) एका नारळाचे खवून खोबरे 
४) वेलची पूड दोन चमचे
५) काजू,बदामाचे काप,बेदाणे आवडीनुसार
६) साजूक तूप १ वाटी
७) गुलकंद २ टेस्पून

कृती:

प्रथम कढई तापत ठेवून त्यामधे तूप घालावे व त्यावर रवा खरपूस गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.रवा  भाजत आल्यावर शेवटी -शेवटी ओले खोबरे घालावे व चार परतण्या देऊन गॅस बंद करावा.

दुसर्या एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये साखर घेऊन त्यात साखर बुडेल इतपत पाणी घालावे. पातेले गॅसवर ठेवावे व सतत ढवळावे.साखर विरघळून पाच-दहा मिनीटे ऊकळू द्यावे. एकतारी पाक तयार तयार झाला का पहावे.झाला असेल तर तयार पाकामधे वर भाजलेला रवा,वेलची पूड सुकामेवा व गुलकंद घालावे .नीट हलवावे व मिश्रण आळून येण्यासाठी झाकून ठेवून द्यावे.मधून मधून हलवून बघावे.

साधारण दोन ते तिन तासानी मिश्रण आळून येते.मग त्याचे आपल्या आवडीनुसार हव्या त्या साइजचे  लाडू वळावेत.वळताना वर एक-एक बेदाणा लावावा.

छान मऊ व रवाळ लाडू तयार होतात.

या लाडूमधे ओले खोबरे असल्याने  आठ-दहा दिवसापेक्शा जास्त दिवस ठेवू नये.लवकर संपवावेत.वास येण्याची शक्यता असते अन्यथा फ्रीजमधे ठेवावेत व खाण्याच्या आधि थोडावेळ बाहेर काढून ठेवावेत.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

21 October 2016

करंजी (Karanji)

No comments :

करंजी हा पदार्थ महाराष्ट्रामधे खास दिवाळीला केला जाणार पारंपारिक पदार्थ आहे. दिवाळीचा फराळ तयार करायला सुरवात करायची तर गोड करंजी सर्वात आधि करायची पध्दत आहे. त्यामुळे करंजीला "शुभाची करंजी " असे म्हणतात. करंजी मधे सहसा चकली प्रमाणे बिघडण्याचा धोका नसतो परंतु लाटणे, भरणे,तळणे अशासाठी किमान दोघींची मदत असेल तर करणे कंटाळवाणे होत नाही.  दिवाळीत शाळांना सुट्टया लागलेल्या असतात. मग घरातली चिल्लर कंपनीसुध्दा करंजा भरण्याच्या, भरलेल्या चिरण्याने कातरायच्या कामाला हौसेने येते .किंवा शेजारणी सुध्दा दिवस ठरवून आज तुझ्याकडे, उद्या माझ्याकडे असे ठरवून पदार्थ करत असत. बाकी काहीही असो परंतु दिवाळीचा फराळ करंजी शिवाय पुर्ण नाहीच.तर अशी "करंजी" कशी करायची साहित्य व कृती,

साहित्य :-
वरच्या पारीसाठी -
* मैदा २ वाट्या
* बारीक रवा २ वाट्या
* मोहन २ टेस्पून
* दूध १ कप
* मीठ चिमूटभर
* पाणी गरजेनुसार

साहित्य :-
सारणासाठी -
* किसलेले सुके खोबरे १ १/२ वाट्या
* रवा १ /४ वाटी
* पिठी साखर १ १ /२ वाट्या
* खसखस १/४ वाटी
* वेलची पूड
* बेदाणे, चारोळी काजू,बादाम तुकडा आवडीनुसार
तळण्यासाठी तेल किंवा तूप

कृती :-

प्रथम रवा व मैदा एकत्र करून त्यामधे चविला मीठ व गरम तूप (मोहन) घालून चोळावे. नंतर दूध घालावे व गरजेनुसार पाणी घेऊन घट्ट मळावे. मळलेले पीठ ओल्या कपड्याखाली अर्धा ते एक तास झाकून ठेवावे. तोपर्यंत सारण तयार करावे.

सारण कृती -
आता कढईत खसखस कोरडीच भाजून घ्यावी. नंतर रवा भाजावा. आता किसलेले खोबरे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. थंड झाल्यावर खोबरे हाताने चुरडावे. त्यामधे रवा, साखर, वेलचीपूङ, ड्रायफ्रूट्स कापून घालावे.सारण तयार.

आता करंजी करण्यासाठी आधी मळून ठेवलेले पीठ कुटून किवा फूड प्रोसेसर मधून फिरवून काढावे. मळलेल्या पीठाच्या लहान -लहान गोळ्या करून पुरीसारखे लाटून घ्यावे. नंतर चमच्याने सारण भरावे व पारी दूधाचे बोट लाऊन बंद करावी. नक्षीदार चिरण्याने कापावी. अशा १५ -२0 करंजा करून ओल्या कापडाखाली झाकून ठेवावे. नंतर कढईत तेल गरम करून मंद गँसवर गुलाबी रंगावर तळावे.

खुसखूषीत तयार करंजा थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

टिप्स :-
* सारणात साखर आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावी.
* खोबर्याच्या वाट्या थोडावेळ कोमट पाण्यात टाकाव्यात व नंतर त्याची काळी पाठ काढावी व किसावे. किस पांढराशुभ्र होतो.करंजीसुध्दा स्वच्छ रंगाची दिसते. अथवा सारणामुळे काळपट रंग येतो.
* सारण आदले दिवशीच करून ठेवले असता जास्त सोयीचे होते. म्हणून आदले दिवशीच सवडीनुसार निगुतीने करून ठेवावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

16 October 2016

वेज दम बिर्याणी (Veg Dum Biryani)

No comments :

बिर्याणी ही एक भाताची,मुघलाई पारंपारिक पाककृती आहे. वेज व नाँनवेज दोन्ही प्रकारामध्ये करता येते. मी वेज बिर्याणी केली आहे. ही लहान -थोर सर्वांच्या आवडीची अशी आहे. साहित्य पाहिले की,वाटते खूप अवघड, किचकट कृती आहे. परंतु तसे अजिबात नाही! एकदम सहज,सोपी व चविष्ट पाककृती आहे.तसेच पौष्टीक व "वन डिश मिल" म्हणून एकदम झकास डिश आहे. क़़शी केली "वेज दम बिर्याणी " साहित्य व कृती, 👇

साहित्य :-

भातासाठी लागणारे-
* बासमती तांदुळ २ वाट्या
* लवंगा २-४
* हिरवी वेलची ४
* मोठी मसाला वेलची २
* तमालपत्रं मध्यम १
* दालचिनी २ इंच
* काळे मिरे ४
* मीठ
* तूप २ टेस्पून

ग्रेवीसाठी साहित्य :-
* फ्लाॅवर १ वाटी
* गाजर १/२ वाटी
* शिमला मिरची १ /२ वाटी
* बीन्स १/२ वाटी
* मटार १ /२ वाटी. या सर्व भाज्या मोठ्या चौकोनी चिरून घ्याव्यात.
* कांदा १ पातळ उभा चिरून
* टोमँटो १ बारीक चिरून
* कोथिंबिर चिरून
* आलं-लसूण पेस्ट २ टीस्पून
* हिरवी मिरची उभी चिरून,बिया काढून २
* कोथिंबिर बारीक चिरून
* गरम मसाला १ टीस्पून
* धना-जिरा पावडर २ टीस्पून
* मिरे ४-५ 
* लवंगा २-३
* तमालपत्रं १ मध्यम
* हिरवी वेलची २
* मसाला वेलची १
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* हळद १/२ टीस्पून
* जीरे १ टीस्पून
* मीठ चविनूसार
* तेल ४ टेस्पून
* फेटलेले दही १ वाटी

शेवटी वाफ म्हणजे दम आणण्यावेळी,
* उभा चिरून तळलेला कांदा अर्धा वाटी
* १०-१५ केशर काड्या पाव वाटी दूधामधे भिजवलेल्या
* कोथिंबिर चिरून
* पुदीना पाने १५-२०
* तूप २ टेस्पून

कृती :-

प्रथम भात मीठ व साहित्यामधे दिलेले सर्व मसाले अखंडच घालून मोकळा व नव्वद टक्कपर्यंतच शिजवून घ्यावा. शिजल्यावर ताटात काढून वरून तूप घालून हलवून गार होण्यासाठी ठेवावा. तूप घातल्याने शितं एकमेकाला न चिकटता सुटी रहातात.

आता ग्रेवीसाठी,पँनमधे तेल गरम करून जीरे तडतडवून घ्यावेत.नंतर त्यावर कांदा, आलं-लसूण पेस्ट, मिरची टाकावी. गुलाबी रंग येईपर्यंत परतावे. नंतर टोमँटो घालून मऊ होईपर्यंत परतावा. थोडे पाणी घालून परतले तरी चालते. नंतर ग्रेवीसाठी दिलेले सर्व मसाले, हळद, तिखट व मीठ घालून परतावे. शेवटी सर्व भाज्या घालून परतावे व थोडे पाणी घालून झाकून भाज्या शिजवाव्यात. भाज्या जास्त शिजवू नयेत. थोडे दाताखाली येणार्या क्रंची रहाव्यात. परत शेवटी दम देताना पण थोड्या शिजतात हे लक्षात घ्यावे.

आता तयार ग्रेवी थोडी थंड झाली की, फेटलेले दही व कोथिंबिर घालून एकसारखे करावे.

आता सर्वात शेवटी वाफ आणायची म्हणजेच "दम" द्यायचा . त्यासाठी एका जड बुङाच्या पसरट भांङ्यामधे  तळाला १ टेस्पून तूप घालावे. त्यावर तयार अर्ध्या ग्रेवीचा थर पसरवावा,  त्यावर तयार अर्ध्या भाताचा थर पसरवावा. त्यावर केशर दूध अर्धे टाकावे. नंतर कोथिंबिर व पुदीना घालावा.आता राहीलेल्या ग्रेवी व भाताचा असाच दुसरा थर पसरवावा. वरून केशरदूध शिंपडावे. हाताने किंवा चमच्याने सर्व भात थोडा दाबावा. १ टेस्पून तूप कडेने सोडावे व घट्ट झाकण लावून आधी गँसवर तवा ठेवावा व त्यावर भांडे ठेवावे. मंद गँसवर १५-२० मिनिट दणदणित वाफ आणावी.

शेवटी सर्व्हींगच्या वेळी वरून कोथिंबिर व तळलेला कांदा पसरावा व गरमा-गरम द्यावे.

टिप्स :-
* भाज्या व त्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावे.
* आवडीनुसार तळलेले काजू वरून घालावेत.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

04 October 2016

रताळ्याचा हलवा ( Sweet Potato Halawa)

No comments :

उपवास असला तरी पुृूर्णपणे पोट रिकामे ठेवणे आरोग्याला वाईटच.मग काय?  आपण शाबूदाणा खिचडी किंवा इतर कांही पदार्थ जे शेगदाण्याचे कूट वापरून केले जातात ते खातो. परंतु त्याने पित्त वाढते. रताळ्यामधे फाइबर भरपूर असते. सहज उपलब्ध असते त्यामुळे उपवासाला रताळे खाणे केव्हाही इष्टच. तर आज रताळ्याचा हलवा केला.कसा केला? साहित्य व कृती,

साहित्य :-
* रताळी मोठी २ (उकडून गर अंदाजे २ वाट्या)
* साखर १वाटी
* दूध १ कप
* तूप २ टेस्पून
* वेलचीपूड
* ड्रायफ्रूट्स

कृती :-

प्रथम रताळी स्वच्छ धुवून,मोठे तुकडे करावेत व कुकरमधे उकडून घ्यावे.

थंड झाल्यानंतर साल काढून आधि सुरीने कापून तुकडे करा व नंतर हाताने मँश करावे. आधि कापून घेतल्याने त्यातील तंतू किंवा शीरा ज्या असतात त्या कापल्या जातात व हलवा खाताना तोंडामधे  धागे येत नाहीत.

नंतर पँनमधे तूप गरम करून त्यामधे मँश केलेले रताळे घालावे व गुलाबी परतावे.

परतून झाल्यावर, नंतर त्यामधे दूध, साखर व वेलचीपूड घालावी. साखर विरघळून तूप सुटेपर्यंत ५ मिनिट परतावे व गँस बंद करावा.

शेवटी ड्रायफ्रूट्स घालावेत. खायला देताना वरून थोडे साजूक तूप सोडावे व खायला द्यावे.

अत्यंत पौष्टीक,सात्विक व लुसलू़शित असा हा "रताळ्याचा हलवा" चविला खूप छान लागतो. तूम्हीही करून बघा नक्की आवडेल.

टिप :- साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी. मी घेतलेल्या प्रमाणाने हलवा बर्यापैकी गोड होतो. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

02 October 2016

उपवासाचे भाजणीे पीठ ( Fasting Bhajani)

No comments :

उपवास म्हटले की नेहमी तीच ती शाबूदाणा खिचडी खाण्याचा कंटाळा येतो. तर भाजणी पीठ तयार असेल तर, थालीपीठ, पुर्या किंवा कधी भाकरी व भोपळा बटाट्याची उपवासाची भाजी करता येते. याच पीठात उकडलेला बटाटा, रताळी,कच्ची केळी मिसळून कटलेट, वडे असे पदार्थ करता येतात. एकंदरीत उपवासाची भाजणी घरात ठेवणे सोयीचे असते. ऐनवेळी उपयोगी पडते.तर कशी करायची साहित्य व कृती,

साहित्य :-

* वरी तांदुळ ५०० ग्रँम
* शाबूदाणा २५० ग्रँम
* राजगिरा २५० ग्रँम
* तेल किवा तूप १/२ टीस्पून 

कृती :-

प्रथम राजगिरा व वरी तांदुळ व्यवस्थित निवडून स्वच्छ करावे. शाबूदाणाही मोठ्या चाळणीतून चाळून घ्यावा म्हणजे त्यातील पीठ भाजताना कढईला चिकटत नाही.

आता सर्वात आधि राजगिरा भाजावा. याला कढई कमी तापलेली लागते. नाहीतर एकदम लाल होतो. नंतर वरी तांदुळ भाजावे. शेवटी शाबूदाणा कढईत किंचित तेल घालून भाजावा.  तेलामुळे शाबूदाणा भाजताना कढईला चिकटत नाही. अथवा तेल आधीच शाबूदाण्याला चोळून ठेवावे.

भाजलेले पदार्थ थंड होऊ द्यावेत. नंतर मिक्सरमधे, घरगुती अाटा चक्कीवर अथवा गिरणीतून दळून आणावे.

तयार पीठामधे थालीपीठ  करण्याच्या वेळी मीठ, मिरची, जीरे, दाण्याचे कूट घालून थालीपीठ करावे. थालीपीठ दही, उपवासाचे गोड लिंबू लोणचे घेऊन खावे.

टिप:
* भाजणी बेतशीरच भाजावी. अन्यथा थालीपीठ काळपट रंगाची,कडवट चवीची होतात व पीठाचा चिकटपणाही थोडा कमी होतो.

* भाजणी  हवाबंद डब्यात व कोरड्या जागी ठेवल्यास महिनाभर सहज टीकते.

* जीरे, भाजणी दळताना घातले तर त्याचा वास कमी होतो. म्हणून पदार्थ करण्यावेळी कच्चेच अाख्खे किंवा भरड घालावी.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.