°रसगुल्ला" हा बंगाली मिठाईचा प्रकार सर्वाना परिचित आहेच. याचीच थोडीे श्रीमंत भावंडं म्हणजे "अंगुरमलई" व "रसमलई "! यांचा थोडा श्रीमंती थाट असतो. रबडी, सुका मेवा, केशर यामधे वापरले जाते. यामधे तेल, तूपाचा वापर केलेला नसतो. जेवण झाल्यावर स्वीटडीश म्हणून खायला तर खूपच मस्त लागते. अतिशय सोपी व कमी साहित्यातील पाककृती आहे. तर ही रसमलई कशी करायची याचे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
पनीरसाठी --
° फुलक्रीम दूध १ लिटर
° लिंबू १
° साखर २ वाट्या
° पाणी ६ वाट्या
रबडीसाठी --
° फूलक्रीम दूध १ लिटर
° मिल्क पावडर २ टेस्पून
° साखर १ वाटी ( कमी-अधिक करू शकतो)
° वेलचीपूड
° केशरकाड्या चिमूटभर
° बदाम, पिस्त्याचे काप
कृती :--
प्रथम एका गँस स्टोववर,मंद आचेवर रबडीसाठी दूध उकळवत ठेवावे. मधून -मधून ढवळत रहावे.
आता दुसरिकडे पनीरसाठी दूध तापत ठेवावे. दूध तापेपर्यंत लिंबू रस काढून ठेवावा. जेवढा रस निघेल तेवढेच पाणी मिसळून घ्या.
आता दूध तापून वर आले की, गँस बंद करावा. दूध साधारण थंड झाले की, (म्हणजे 80% गरम असावे.) डावाने हलवत हलवत वाटीतील लिंबूरस थोडा -थोडा घालावा व दूध फाटले म्हणजे पाणी व पनीर वेगळे दिसायला लागले की थांबा.
आता एका चाळणीवर स्वच्छ पांढरा मलमलचा कपडा पसरून त्यावर फाटलेले दूध ओतावे. वरून थंड पाणी ओतून पनीर स्वच्छ धुवावे कापडाची पुरचुंडी करून हाताने दाबून पाणी काढावे. थोडावेळ, १५ मिनिट लटकवून ठेवावे. पाणी निथळून जाईल.
आता तयार पनीर हाताने छान मऊ एकजीव गोळा होईपर्यंत मळून घ्यावे. व साधारण चपटे गोळे तयार करा.
नंतर साखर व पाणी एकत्र करून उकळत ठेवावे. साखर विरघळून पाक उकळायला लागला की त्यात पनीरचे तयार गोळे सोङावेत. १५ ते २० मिनिटे मोठ्या आचेवर झाकून शिजू द्यावे. मधून एकदा गोळे हलवून उलटे-पालटे करावे. पंधरा मिनिटानंतर गोळे फुलून दुप्पट आकाराचे झालेले दिसतील. गँस बंद करावा व थोडे थंड होऊ द्यावे.
आता तोपर्यंत आधि रबडी साठी उकळत ठेवलेल्या दूधामधे मिल्कपावङर, वेलची, केशर व थोडा सुकामेवा घालावा. आवडीनुसार साखर घालावी व गँस बंद करावा.तयार रबडी गार होऊ द्यावी. रबडी आधीच तयार करून फ्रिजमधे ठेवली तर अधिकच चांगले.
शेवटी पाकातील पनीर गोळे चमच्याने काढून हाताने किंचित दाबून पाक काढावा व एकेक करून रबडीमधे सोडावेत.
तयार "रसमलई " बाऊलमधून खायला देताना वरून थोडे बदाम, पिस्त्याचे काप घालावेत.
टिप्स :-
* पनीर घरीच तयार करून घ्यावे. बाजारी पनीर खूप घट्ट असते. पनीर घट्ट असले तर गोळे खूप कडक होतात. लुसलूशीत रहात नाही व पनीरमधे पाणी जास्त शिल्लक राहिल्यास शिजवताना पाकात विरघळतात.
* फुलक्रीम दूधच वापरावे. पनीर लुसलू़शित होते. अथवा चोथट रहाते.
* गोळे फार दाब देऊन चपटे करू नयेत. पाकात फुटतात.
* दूध फाडण्यासाठी लिंबू ऐवजी १ टेस्पून व्हिनेगार वापरले तरी चालते.
* रबडी तयार करण्यासाठी लागणारा वेळ कमी करायचा असेल तर रबडीसाठी "कन्डेंस्ड मिल्क" वापरावे.
* तयार रसगुल्ले आणून, कन्डेंस्ड मिल्कची रबडी तयार करून झटपट रसमलई पण बनविता येते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.