18 February 2017
ब्रेड पिझ्झा (Bread Pizza)
नव्या पिढीला पिझ्झा, बर्गर, चायनीज फूड अतिशय प्रिय! नेहमी नेहमी हे पदार्थ खाणे शरीराला हानिकारकच. परंतु कधीतरी घरीच मुलांना बदल म्हणून करून द्यायला हरकत नाही. आणि घरीच असे खायला मिळाले तर बाहेर खायची इच्छाच होत नाही. "ब्रेड पिझ्झा " साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* ब्रेड स्लाईस गरजेनुसार (साहित्य ८ स्लाईसचे)
* शिमला मिरची मोठ्या २
* टोमँटो २
* कांदा मोठा १
* बटर ४ टेस्पून
* चीज २-३लहान क्यूब्स
* पिझ्झा साँस
* टोमँटो साँस
* चिली फ्लेक्स
* मिक्स हर्ब्स
*.मिरपूड
* मीठ
कृती,-
प्रथम भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. नंतर एकत्र करून त्यावर किंचित मीठ भुरभुरावे.
आता ब्रेड स्लाईसला एका बाजूला बटर लावून २ मिनिट प्रीहिट ओवनला २०० ° सेल्सियसला भाजावे.
नंतर भाजलेल्या बाजूवर पिझ्झा साँस लावावे व त्यावर मिक्स भाज्यांचा थर लावावा. त्यावर मिरचीपूड भुरभुरावी. नंतर वर चीज किसून घालावे.
आता २०० ° सेल्सियस प्रीहिट ओवनला ८-१० मिनिट भाजावे. वरचे चीज वितळून ब्रेड मस्त क्रिस्पी होतो.
नंतर ओवनमधून काढावे वरून टोमँटो साँस, चिली फ्लेक्स व मिक्स हर्ब्स भुरभुरावी. आवडत असेल तर अजून वर चीज किसून टाकावे.
लगेच मस्त क्रिस्पी, गरम, चटपटीत ब्रेड पिझ्झा खायला द्या.
टिप्स :- भाज्या आवडीनुसार व उपललब्धतेनुसार घ्याव्यात.
बटर चीज आवडीनुसार कमी-जास्त करावे.
ब्रेड, गोल स्लाईस असेल तर अधिक छान दिसते. ब्राउन ब्रेडही चालेल.
ओवन शिवाय घरात असलेल्या फ्रयपँन वर पण करता येते. फक्त वर झाकण ठेवावे. म्हणजे चीज वितळते व मधून मधून चेक करावे. नाहीतर एकच बाजू करपेल.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
11 February 2017
लाल भोपळ्याची रबडी (Pumpkin Rabadi)
"लाल भोपळ्याची रबडी " झटपट होणारा व पौष्टीक असा गोड पदार्थ आहे. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* लाल भोपळा पाव किलो
* दूध १ लिटर
* साखर अर्धी वाटी
* वेलचीपूङ
* बदाम सजावटीला
* तूप १ टेस्पून
कृती :-
प्रथम भोपळा साल काढून मोठ्या फोडी चिरून घ्याव्यात व प्रेशर कुकर मधे वाफवून घ्याव्यात.
आता भोपळा शिजेपर्यंत दूध उकळवायला ठेवावे.
नंतर वाफवलेल्या फोडी मँशरने मँश करून घ्याव्यात. थोड्या तूपावर मँश केलेला भोपळा पांच मिनिट परतावा.
आता परतलेला भोपळा आधिच उकळत असलेल्या दूधामधे घालावा. पांच मिनिट उकळवावे.
शेवटी साखर व वेलचीपूड घालावी. व्यवस्थित ढवळावे. साखर विरघळली की, गँस बंद करावा.
गरमा-गरम रबङी वरून बदाम बी ची सजावट करून खायला द्यावी.
टिप :- साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
09 February 2017
तिळाचे लाडू ( Til Laddu)
"तिळ लाडू "संक्रांतिला करतात.. कारण या दिवसात थंडी असते व थंडीत शरीराला तिळ व गुळ अतिशय लाभदायक असते. तिळातून शरीराला स्निग्धांश मिळतात. तसेच हाडे मजबूत होतात. यात कँल्शियम असते. गुळापासून शरीराला उष्णता व लोह मिळते. तर असे बहूगुणी लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
° तिळ २ वाट्या
° गुळ १ वाटी
° भाजून सोललेले शेंगदाणे अर्धा वाटी
° वेलचीपूड
कृती :-
प्रथम तिळ खमंग गुलाबी भाजून घ्याव्येत. गुळ चिरून घ्यावा.
नंतर भाजलेल्यापैकी निम्मेच तिळ भरड कुटावेत.
आता गँसवर जाड बुडाच्या भांड्यात गुळ घालावा व चमच्याने हलवत गुळ फक्त विरघळून एक चटका आणून घ्यावा. पाक करू नये.
आता झटपट, वितळलेल्या गुळात तिळ,कुटलेले तिळ, शेंगदाणे व वेलचीपूड घालून एकत्र करावे. हाताला सोसवेल इतपत गरम असतानाच गरम गरम, सुपारीच्या आकाराचे लाडू वळावेत.
थंड झाले की डब्यात भरून ठेवावे.
टिप :- मी यासाठी नेहमीचाच मऊ गुळ वापरला आहे. त्यामुळे लाडू छान मऊ होतात. अन्यथा चिक्की गुळ वापरला तर कडक व चिवट होतात.
नुसत्या तिळाऐवजी निम्मे तिळ व निम्मे शेंगदाणे कूट वापरले तरी चालते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
मटर मलई सब्जी ( Matar Malai Subji)
हिवाळ्यात ओले मटार भरपूर येतात व स्वस्तही असतात. तर भरपूर ओल्या मटारची ही दाटसर ग्रेवी असणारी भाजी गरम पोळी किंवा फुलक्यासोबत खायला एकदम मस्त लागते. कशी केली साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* ओले सोललेले मटार दाणे २ वाट्या
* मोठा कांदा १
* लाल टोमँटो २
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट २ टीस्पून
* भिजवलेले काजू ८ -१०
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* हळद चिमूटभर
* मीठ चविनूसार
* गरम मसाला १ टीस्पून
* दही २ टेस्पून
* फ्रेश क्रिम २ टेस्पून
* जीरे १/२ टीस्पून
* तेल २ टेस्पून
कृती :-
प्रथम मटार उकळत्या पाण्यात टाकून ५ मिनिट ठेवावे व काढावेत.
नंतर कांदा व टोमँटो -काजूची पेस्ट करून घ्यावी
आता पँनमधे तेल गरम करून जीरे तडतडवून घ्यावेत व त्यावर कांद्याची पेस्ट घालून परतावे. पाठोपाठ आलं-लसूण मिरची पेस्ट, टोमँटो काजूची पेस्ट घालावी व सर्व साहित्य तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर मटार घालून थोडे परतावे.
नंतर त्यामधे हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ घालावे. गरज भासलीच तर थोडे पाणी घालावे व एक उकळी काढावी. शेवटी दही घाला व एकत्र करून गँस बंद करावा.
तयार भाजी वरून फ्रेश क्रिम घालून किंवा आधीच क्रिम घातले तरी चालते. गरमा-गरम वाढावी .
टिप :- यासाठी फ्रोजन मटार ही चालतात.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
गुळ पापडी (Gul Papadi)
"गुळ पापडी" हा पारंपारिक व पौष्टीक असा गोड पदार्थ आहे. वाढत्या वयाच्या मुलांना भुक लागते व सततच येता-जाता तोंडात टाकायला कांहीतरी हवे असते. तर ही घरच्या-घरी उपलब्ध सामग्रीतून पौष्टीक "गुळ पापडी" बनवून ठेवली तर सोयीचे होते. तसेच ही बरेच दिवस टीकू शकते. कशी बनवायची साहित्य व कृती-
साहित्य :-
° गव्हाचे पीठ २ कप
° गुळ १ कप
° तूप 3/४ कप
° जायफळ, वेलचीपूङ १ टीस्पून
° ड्रायफ्रूट्स काप ऐच्छीक
कृती :-
प्रथम एका जाड बुडाच्या कढईत गव्हाचे पीठ भाजण्यासाठी घालावे. थोडे भाजले की परतत परतच थोडे - थोडे तूप घालत रहावे. सतत हलवत रहावे. बेसन लाडूच्या पिठाप्रमाणे पातळ झाले पाहीजे. तोपर्यंत तूप घालत रहावे. गुलाबी तांबूस रंग आला व खमंग वास सुटला की पीठ भाजले समजावे.
नंतर भाजलेल्या पीठामधे चिरलेला गुळ घालावा व हलवावे. गुळ विरघळला की लगेच गँस बंद करावा व तयार मिश्रण तूप लावलेल्या ताटात ओतावे. वाटीने एकसारखे पसरवून हलकेच थापावे. गरम असतानाच चाकूने आडव्या -उभ्या रेषा मारून ठेवा.
आता १० मिनिटानंतर थंड झालेल्या खुसखूषीत वड्या काढून डब्यात भरून ठेवा. आपण व मुलं येता-जाता खाऊन फडशा पाडा. किंवा मुलांना छोट्या डब्याच्या सुट्टीसाठी द्या.
टिप :- गव्हाचे पीठ थोडे मोटसर दळलेले असेल तर अधिक उत्तम!
तूप घालण्यामधे अजिबात कंजूसी नको. गव्हाच्या पीठाला भरपूर तूप लागते.
जर मऊ वड्या हव्या असतील तर भाजलेले पीठ पाच मिनीटे गार होऊ द्यावे, फार गार नको.गूळ विरघळण्यासाठी थोडा गरम हवा.एकदम गरम पिठात गूळ घातला की वडी कडक होते. मला स्वतःला कडक आवडते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
04 February 2017
कोबी वडी-2 (Cabbage Vadi)
कोबीची भाजी त्याच्या उग्र वासामुळे बर्याच जणाना आवडत नाही. पण पुढील पध्दतीने त्याच कोबीच्या वड्या केल्या तर आवडीने खाल्या जातात. कशा केल्या साहित्य व कृती-👇
साहित्य:-
१) किसलेला कोबी अर्धा किलो (४ वाट्या )
२) डाळीचे पीठ दिङ ते दोन वाटी
3) तांदूळ पीठ एक टे स्पून
४) कोथिबीर,आल लसूण मिरची पेस्ट
५) आमसूर पावडर किंवा लिंबूरस आंबटपणासाठी
६) हिंग मोहरी तिळ कढीपत्ता व तेल फोङणीसाठी
७) मीठ,चिमुटभर साखर, धना जिरा पावङर
८) पाणी गरजेनुसार
कृती:- प्रथम किसलेला कोबी एका पसरट भांङ्यामधे घेऊन त्यामधे वरील पीठे व म मसाला घालून व्यवस्थित कालवावे.जरूरीएवढे पाणी घालून थोडे सैलसर पीठ भिजवावे.
नंतर ढोकळा पात्राला तेलाचा हात लावून त्यामधे तयार पीठ ओतावे व वाफवून घ्यावे.
आता वाफवलेले वड्या ढोकळ्याप्रमाणे कापा व हिंग,मोहरी,तिळ कढीपत्ता घालून फोडणी करून त्यावर टाकून थोडे परतावे.
तयार वड्या जेवणात साईड डिश म्हणून किंवा चहासोबत खायला द्या.
टीप :- आंबटपणासाठी चिंचेचा कोळ किंवा आंबट ताकही चालते. कोबीमधे आंबट काही पदार्थ व चिमूटभर साखर घातल्याने उग्र वास कमी होतो.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
26 January 2017
तिरंगा सैंडविच (Tiranga Sandwich)
सर्वांच्या परिचयाचा नाष्ट्याचा, टीफीनचा झटपट होणारा एक पदार्थ म्हणजे "सैंडविच ". त्यामधे आपण आपल्या आवडीनुसार अनेक वेरीएशनस् करू शकतो. मी आज "तिरंगा सैंडविच" केलेय. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
° ब्रेड स्लाइस गरजेनुसार
° गाजर किसून
° टोमँटो पातळ गोल काप करून
° टोमँटो साँस
° बटर
° कोबी किसून
° काकडी पातळ गोल काप करून
° हिरवी चटणी
° चाट मसाला
° मीठ
कृती :-
प्रथम ब्रेडच्या कडा काढून घ्याव्यात. नंतर एका सँडविचला तीन ब्रेड एका ओळीत पसरून ठेवावेत. पहिल्या ब्रेडला हिरवी चटणी लावावी, दुसर्या बटर लावावे व तिसर्याला टोमँटो साँस लावावे.
नंतर पहिल्या हिरवी चटणी लावलेल्या ब्रेडवर कोबी, काकडी ठेवावे. त्यावर चाट मसाला व मीठ भुरभुरावे. त्यावर बटर लावलेला ब्रेड ठेवावा. त्याच्या दुसर्या बाजूला पण बटर लावावे. त्यावर गाजराचा किस, टोमँटोच्या चकत्या ठेवाव्यात व त्यावर मीठ, चाट मसाला भुरभूरावे.
शेवटी साँस लावलेला ब्रेड त्यावर पालथा ठेवावा व हाताने किंचित दाब द्यावा. तयार सैंडविच धारदार चाकूने मधून तिरपे कापावे व खायला द्यावे.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
22 January 2017
गाजर-मटार कटलेट (Carrot -Matar Cutlet)
कटलेट,टिक्की, पँटीस असे चटपटीत प्रकार संध्याकाळच्या हलक्या नाष्ट्याला नेहमीच पसंद केले जातात. करायला तसे सुटसुटीत व कमी साहित्य असते. तर आज "गाजर-मटार कटलेट" कसे केले साहित्य व कृती-👇
साहित्य :-
° ताजे मटार २ वाट्या
° बटाटे २
° गाजर २
° पातळ पोहे अर्धी वाटी
“ रवा किंवा ब्रेडक्रम्स गरजेनुसार
° आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट २ टीस्पून
° कोथिंबिर
° धना-जीरा पावडर १ टीस्पून
° चाट मसाला १ टीस्पून
° आमचूर पावडर अर्धा टीस्पून
° हळद पूड
° मीठ चविनूसार
° तेल
कृती :-
प्रथम बटाटे उकडून, मँश करून घ्यावेत. गाजर साल काढून किसून घ्यावेत.
नंतर त्यामधे वरील सर्व मसाला व पातळ पोहे मिसळावे व हाताने चांगले एकजीव करावे.
आता तयार मिश्रणाचे आपल्याला आवडतील त्या आकारात लहान -लहान चपटे गोळे करावेत व रव्यामधे घोळवून तेलामध्ये तळावेत.
तयार कटलेट साँस किंवा चटणीसोबत खा!
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
21 January 2017
टोमँटो राईस (Tomato Rice)
"टोमँटो राईस" हा भाताचा एक उत्तम, सात्विक व पौष्टीक प्रकार आहे. नेहमी नेहमी टोमँटोचे सूप,सार,कोशिंबिर खाण्यापेक्षा अशा प्रकारे भात करूनपण टोमँटो खाता येतो.करायला सोपा व सुटसूटीत प्रकार आहे. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
° बासमती तांदुळ २ वाट्या
° लाल टोमॅटो २ -३ मध्यम
° कांदा १
° आल-लसूण पेस्ट १ टीस्पून
° हिरवी मिरची २-४
° टोमँटो साँस २ टेस्पून
° धना-जीरा पावडर २ टीस्पून
° मीठ चविनुसार
° लाल मिरचीपूड १ टीस्पून
° तेल २ टेस्पून
° जीरे
° कोथिंबिर बारीक चिरून
कृती :-
प्रथम मोकळा भात शिजवून घेऊन ताटात गार होण्यासाठी पसरून एका बाजूला ठेऊन द्यावा.
आता कांदा व टोमँटो ची वेगवेगळी पेस्ट करून घ्यावी.
नंतर तेल गरम करून जीरे फोडणीत घालावे.त्यावर आल-लसूण पेस्ट, पाठोपाठ हिरवी मिरची व कांदा घालून परतावे. कांदा परतून तेल सुटायला लागले की टोमँटो प्यूरी घालावी. सर्व नीट परतावे.
आता त्यात लाल मिरची पावडर, धणे-जीरे पावडर. मीठ घालावे. कोथिंबिर व टोमँटो साँसही आताच घालावे. शेवटी शिजवलेला भात घालावा व व्यवस्थित एकत्र करून परतावे. झाकून एक वाफ काढा.
मस्त गरमा-गरम लालसर रंगाचा "टोमँटो राईस" तयार.
टिप्स :- यामधे आवडीनुसार मटार, शिमला मिरची पण वापरली जाते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
17 January 2017
आचारी पराठा (Achari Paratha)
"आचारी पराठा " हा काय प्रकार? एकदम सरळ आहे. आचार म्हणजे "लोणचे " लोणच्याचा पराठा. तर काय होते, बरेचवेळा अंब्याचे लोणचे जुने झाले की, बरणीत तसेच पडून रहाते, कोणालाच नको असते. नंतर हळू-हळू नविन अंब्याचा सिझन येतो व या जुन्या लोणच्याचे करावे तरी काय? हा प्रश्न गृहीणींसमोर असतो. तेव्हा त्याचे असे पराठे करून टाका. मुलांना डब्यात द्यायलापण सोयीचे व नाष्ट्यालाही छान लागतात. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* अंब्याचे लोणचे बिना कोयीचे
* गव्हाचे पीठ
* लाल मिरचीपूड
* हळद,हिंग
* ओवा
* तेल
* मीठ
कृती :-
प्रथम लोणचे मिक्सरमधे लहान भांड्यात घालून फिरवून घ्यावे व सरसरीत लोणचे बाऊलमधे काढावे. त्यामधे सैलपणा येण्यासाठी गरजेनुसार थोडे कच्चेच तेल घालून एकसंध करावे. व बाजूला ठेवून द्यावे.
आता गव्हाचे पीठ घेऊन त्यामधे तिखट,मीठ, हळद, ओवा सर्व घालून पाण्याने नेहमीच्या कणकेप्रमाणे मळावे.
नंतर नेहमीच्या घडीच्या पोळीप्रमाणे लहान गोळी लाटून त्यावर चमच्याने तयार मसाला थोडा पसरावा व घडी घालून जाडसर पोळी लाटावी. दोन्ही बाजूनी तेल सोडून खरपूस भाजून घ्यावी.
तयार गरमा-गरम खमंग, खुसखूषीत असे पराठे तूप/लोणी लावून खावेत.
11 January 2017
ओल्या हळदीचे दूध ( Turmeric Golden Milk)
"हळद" ही अत्यंत औषधी व गुणकारी आहे.सर्दी, कफ झाले असेल तर "हळदीचे दूध" त्यावर रामबाण उपाय आहे. घशातील खवखव थांबते. तसेच आयुर्वेदात हळदीला खूप महत्व दिले गेले आहे. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते.अजूनही हळदीचे खूप फायदे आहेत. रक्तशुध्दी होते, निद्रानाशापासून आराम मिळतो.,श्वसन विकारांवर उपयोगी आहे.त्वचेवर चमक येते. रंग उजळतो. तसेच दूधात कँल्शियम भरपूर असते. त्यामुळे हळद घालून दूध प्यायल्याने दुहेरी फायदा होतो. थंडीच्या दिवसात हळदीचे दूध अवश्य प्यावे. अनेक फाबयदे होतात. कसे तयार करायचे, साहित्य व कृती 👇 👇
साहित्य :-
* दूध अर्धा लिटर
* ओली हळद २ इंच
* वेलची पावङर १/२ टीस्पून
* लवंगा २
* दालचिनी पावडर १/२ टीस्पून
* मध २ टेस्पून
* खडीसाखर १ टेस्पून (ऐच्छीक)
कृती :-
प्रथम दूध गरम होण्यास ठेवावे. दूध गरम झाले की, त्यामधे हळदीचे खोड चेचून अथवा किसून घालावे. पाठोपाठ लवंगा टाकाव्यात. तसेच वेलची पावडर, थोडी दालचिनी पावडर घालावी व दूध पाच मिनिट चांगले उकळू द्यावे. गोड हवे असेल तर आताच खडीसाखर घालावी.
आता चांगले उकळलेले दूध ग्लासमघे गाळणीने गाळून ओतावे. वरून मध घालावा व थोडी दालचिनी पावडर भुरभुरावी. गरम-गरम दूध प्यावे.
औषधी व गुणकारी असे "हळदी दूध" थंडीमघे आवर्जून प्यावे. तुम्हीही जरूर करून बघा. नक्की आवडेल.
टिप:- ओली हळद नसेल तर १/२ टीस्पून हळद पावडर वापरावी.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
10 January 2017
मटार-पनीर सब्जी (Matar-Paneer subji)
घरामधे मटार व पनीर असले की भाज्यांचे विविध प्रकार करता येतात.जसे की, पनीर मसाला,मटर मसाला, मटर-पनीर मसाला, मटरची उसळ, पनीर भुर्जी,पनीर पकोड़े एक का दोन असंख्य पदार्थ होतात व चविष्ट होतात. त्षातलाच एक आज एक मटार-पनीर हा पदार्थ केला. साहित्य व कृती 👇
साहित्य :-
* मटार २ वाट्या
* पनीर २०० ग्रँम
* टोमँटो २
* कांदा १
* काजू ७ -८
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* मीठ चवीनुसार
* गरम मसाला १ टीस्पून
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* आमचूर पावडर गरज वाटल्यास
* साखर चिमूटभर
* जीरे, हिंग, हळद
* लाल मिरचीपूड
* तेल २ टेस्पून
* कोथिंबिर
कृती :-
प्रथम कांदा, टोमँटो व काजूची वेगवेगळी पेस्ट करून घ्यावी. पनीर शॅलो फ्राय करून घ्यावे.
नंतर पँनमधे तेल गरम करून त्यामधे जीरे, हिंग व हळद घालून फोडणी करून घ्यावी. फोडणीमधे आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट घालून थोडे परतावे. नंतर कांद्याची पेस्ट घालून परतावे. अगदी तेल सुटेपर्यंत गुलाबी रंगावर परतावे. शेवटी टोमँटो व काजूची पेस्ट घालावी.
तयार ग्रेवीमधे गरम मसाला,मीठ, साखर, लाल मिरचीपूड, आमचूर पावडर, धना-जिरा पावडर सर्व मसाला घालून परतावे. गरज वाटली तर थोडेसे पाणी घालावे व ग्रेवी थोडी शिजू द्यावी.
शेवटी तयार ग्रेवीमधे मटार व शॅलो फ्राय केलेले पनीर घालावे. सर्व व्यवस्थित हलवून पांच मिनिट झाकून शिजवावे.
आता तयार "मटार पनीर सब्जी" बाऊलमधे काढून वरून कोथिंबिर पेरावी व वाढण्यास घ्यावी.विशेष करून गरम फुलक्यासोबत ही भाजी खूप चवदार लागते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
ब्रेड डोसा ( Bread Dosa )
डोसा करायचा म्हणजे बरीच वेळखाऊ प्रक्रिया. डाळ तांदुळ ५ -६ तास भिजवणे,वाटणे,आंबवणे मग डोसा खायला मिळणार. तर कधी खायची इच्छा झाली व लगेच झटपट खायला मिळावा वाटले तर असा ब्रेडडोसा करून बघा. साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* ब्रेड स्लाइस कडा काढून ८
* रवा १/२ वाटी
* तांदुळाचे पीठ २ टेस्पून
* दही पाव वाटी
* पाणी गरजेनुसार
* मीठ चवीनुसार
कृती :-
प्रथम ब्रेड कुस्करून त्यामधे सर्व साहित्य घालावे व अर्धा तास झाकून ठेवावे.
नंतर मिक्सरमधे फिरवून काढावे. गरज वाटली तर पाणी घालावे व नेहमीच्या डोसा बँटर प्रमाणे बँटर तयार करावे.
नंतर तवा गरम करून तव्यावर वाटीने पीठ पसरून, कडेने तेल सोडून नेहमीप्रमाणे डोसे काढावेत.
तयार डोसे हिरव्या चटणी सोबत खायला द्यावेत.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
08 January 2017
कन्डेंस्ड मिल्क (Condensed Milk)
"कन्डेंस्ड मिल्क" हे केक,निरनिराळ्या खीरी, हलवा, मिठाई बर्फी तसेच फ्रूट सँलड करताना उपयोगात आणले जाते. "कन्डेंस्ड मिल्क" पदार्थात वापरले तर वेगळी साखर किंवा खवा वापरण्याची गरज उरत नाही व पदार्थ झटपट बनतो. बाजारात "नेसले मिल्कमेड " "अमूल मिठाईमेड" हे कन्डेंस्ड मिल्क सहज उपलब्ध आहेत. पण एखाद्या ऐन गरजेवेळी नाही मिळाले किवा दुकानात जाणे शक्य नसते अशावेळी आपण घरच्या-घरीच बनविले तर? अगदी साधी,सोपी व कमी साहित्यातील कृती आहे. तर हे "होममेड कन्डेंस्ड मिल्क" कसे करायचे साहित्य व कृती 👇
साहित्य :-
° गाईचे दूध १/२ लिटर
° साखर १/२ कप
° चिमुटभर खाण्याचा सोडा
कृती :-
प्रथम एका जाङ बुङाच्या पातेल्यात दूध तापविण्यास ठेवावे.
तापून वर आले की, त्यामधे साखर घालावी. पळीने हलवत रहा. साखर विरघळून दूध उकळू लागले की चिमूटभर सोङा घालावा व दूध सतत ढवळत रहावे. दूध उकळून साधारणपणे एकूण दूधाच्या १/३ दूध झाले पाहीजे.
दूध आटत आले की,मधे-मधे बशीत थेंब टाकून पहावा. साधारण चिकट व साखरेच्या एकतारी पाकाप्रमाणे बोटाला लागला तर आपले कन्डेंस्ड मिल्क" तयार झाले. थंड करून काचेच्या हवाबंद बाटलीमधे भरून फ्रिजमधे ठेवावे. गरज पडेल तेव्हा वापरा.
रोजची घरात उपलब्ध असणारी कोणतीही फळे घेऊन त्याचे मोठे चौकोनी तुकडे करा व वरून हे होममेड तयार मिल्कमेड चमचाभर घालून मुलांना डिशमधे घालून काटा चमच्याने खायला द्या.खूप सुंदर लागते व मुलं फळे आवडीने खातात.
टिप :- दूध उकळत असताना पळीने तळापासून सतत हलवत रहावे. दूध खाली लागले तर करपट वास येतो.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
05 January 2017
झटपट पावभाजी (Pavbhaji)
पावभाजी हा स्नँक्सचा पदार्थ सर्वाना परिचयाचा आहे. भाज्या असल्याने पौष्टीक आहे. ज्या भाज्या इतरवेळी नुसत्या केल्या तर मुलं खात नाहीत त्या यात लपवून घालता येतात. किंवा आठवड्याच्या शेवटी फ्रिज स्वच्छ करायचा असेल तर, उरलेल्या सर्व थोड्या थोड्या भाज्या घेऊन त्यात बटाटा घालून भाजी करता येते. सर्वसाधारणपणे पावभाजी करताना आपण आधी भाज्या चिरून व शिजवून घेतो. नंतर फोडणी करून मसाला वगेरे साहित्य घालून शिजवतो. पण लहान प्रमाणात व झटपट करायची असेल तर कशी करायची पहा साहित्य व कृती 👇 👇
साहित्य :-
* फ्लाॅवर, शिमला,कोबी,बीन्स,गाजर, बीटरूट,भोपळा, मटार यापैकी उपलब्ध असतील त्या भाज्या, आवडेल त्या प्रमाणात
* बटाटे ४ नग
* लाल टोमँटो २
* कांदे २ + २
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* पावभाजी मसाला गरजेनुसार
* लालमिरची पावडर
* मीठ चवीनुसार
* साखर चिमूटभर
* तेल २ टेस्पून
* बटर आवडीनुसार वर घालण्यासाठी
* कोथिंबिर, लिंबू
कृती :-
प्रथम सर्व भाज्या, टोमँटो, कांदा, कोथिंबिर बारीक चिरून घ्यावे.
नंतर कुकरमधे तेल घालून त्यावर कांदा,आले-लसूण, मिरची पेस्ट नंतर टोमँटो घालून परतावे.आताच हळद,लाल तिखट व मसाला घालावा. शेवटी सर्व भाज्या, बटाटे घालाव्यात. त्यावर मीठ,साखर घालावे. थोडे परतून पाणी घाला व झाकण लावून ३शिट्टया काढाव्यात.
कुकरची वाफ जिरल्यानंतर उघडून त्यातच भाज्या मँश कराव्यात अथवा ब्लेडरने घुसळाव्यात व थोडे पाणी घालून बारीक गँसवर रटरटत ठेवून द्या. दुसर्या गँसवर पँनमधे बटरवर पाव भाजावा.
शेवटी गरमा-गरम भाजी वरून बटर, कांदा,कोथिंबिर घालून, लिंबूची फोड ठेवून भाजलेल्या पावासोबत खायला द्या.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.