27 April 2016

मँगो मस्तानी (Mango Mastani)

No comments :

एप्रिल,मे उन्हाळा म्हटले की, जोडीला आंबे आलेच. आणि आंबे कोणाला आवडत नाहीत?  तो तर फळांचा राजा, सर्वानाच आवडतात. मग ओघानेे आंब्याचे विविध प्रकार करणे आलेच. त्यातसुध्दा खास उन्हाळ्यासाठी  थंडगार व पौष्टीक कांही घरच्या-घरी मिळाले तर? मग काय मजाच!

तर आज खास पुण्याची प्रसिध्द अशी 'मँगो मस्तानी' करू. या पेयाचा शोध लावण्याचे सर्व श्रेय पुणेकरांचेच बरं का! पुण्यात सुध्दा खास करून 'सुजाताची मँगो मस्तानी' प्रसिध्द आहे. मी अलिकडे नाही पण बर्याच बर्षापूर्वी ही चव चाखली होती. आवडली मला. ताजे आंबे, दूध व आईसक्रीम वापरून करतात. बाकी बर्याच ठिकाणी कस्टर्ड पावडर, रंग इसेंन्स वापरतात. तसेच यात अजून इतरही स्वाद आहेत, जसे की, चाँकलेट, आँरेंज,केशर-पिस्ता, बदाम इत्यादी. तर आपण बघू, मँगो मस्तानीचे साहीत्य व कृती :-

* हापूस आंबे 3-4 (साईजवर कमी-जास्त)
* थंडगार फुल क्रीम दूध अर्धा लिटर
* साखर 2-3 टेस्पून ( आंब्याच्या गोडीवर कमी-जास्त)
* इसेंन्स 5-6 थेंब ( ऐच्छीक)
* ड्रायफ्रूट्स काप 2टेस्पून
* चेरी सजावटीला
* वँनिला आईसक्रीम 4 स्कूप

कृती :-

सर्वात आधि आंबे साल काढून लहान फोडी करून घ्या.

आता सजावटीला साठी थोड्या आंब्याच्या फोडी व ड्रायफ्रूट्स काप बाजूला शिल्लक ठेवा  व बाकीचे साहीत्य, चिल्ड दूध,आंब्याच्या फोडी व साखर, इसेंन्स एकत्र करून मिक्सरमधे किवा ब्लेडरने घुसळा. शेवटी ड्रायफ्रूट्स मिसळा व हलकेच फिरवा. पावडर नको व्हायला.

आता ग्लासमधे आधि तयार आंब्याचे मिश्रण पाउण ग्लास भरेपर्यंत ओता, नंतर वर एक आईसक्रीम चा गोळा घाला. शेवटी वरून चेरी व आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट्स काप लावून सजवा.

थंडगार, एकदम चिल्ड सर्व्ह करा. मस्त लागते.
एकदम सोपी कृती आहे. तूम्हीही करून बघा. नक्की आवडेल. मात्र कशी झाली सांगायला विसरू नका.

टिप :- तयार करून फ्रिज मधे ठेवू नका चव बिघडते. वेळेवर ताजेच तयार करा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

26 April 2016

काकडीचे थालीपीठ( Cucumber Thalipith)

No comments :

नेहमीच पोळी-भाजी खाण्याचा मुले कंटाळा करतात. तर त्यांना निरनिराळ्या भाज्या घालून थालीपीठ, पराठे करून द्या. डब्यात द्यायला पण सोईचे व पौष्टिक आहे.आज काकडीचे थालीपीठ केले. कसे केले साहीत्य व कृती -

साहीत्य :-

* काकडी 2नग

* ज्वारीचे पीठ अंदाजे 2-3 वाट्या 

* बेसन पीठ अर्धा वाटी 

* किवा या दोन्ही पीठाला ऐवजी थालीपिठाची भाजणी 

* तिखट,  मीठ, हळद, धना-जिरा पावडर 

* तिळ,ओवा 

* कोथंबिर, कढीपत्ता 

* तेल 


कृती :-

प्रथम काकडी जून असेल तरच सालं काढा अन्यथा तशीच किसून घ्या.

नंतर काकडीला सुटलेल्या पाण्यात मावेल तेवढीेच ज्वारीचे पीठ आणि बेसन किंवा भाजणी पीठ घाला. त्यामधे मीठ, तीळ, ओवा, कढीपत्ता, कोथिंबिर हळद, तिखट व धना-जिरा पावडर घालून मळा. तव्यावर तेल टाकून थालीपीठ पसरवा व दोन्ही बाजून खरपूस भाजा . दही,लोणी किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

20 April 2016

पुदीना जलजीरा (Pudina Jaljeera)

No comments :
जलजीरा हे एक उन्हाळ्यात पिण्याचे थंड व पाचक पेय आहे. बाजारात तयार पावडर मिळते. परंतु त्यापेक्षा ताजे घरीच तयार केले तर चव खुप छान लागते. यातील जीरे, कोथिंबिर, पुदीना हे घटक आतून थंडावा देणारे तर आले सैंधव मीठ, हींग हे पाचक घटक आहेत. उन्हाळ्यात घशाला कोरड पडणे, डिहाइड्रेशन, उन्हाळी लागणे अशा उन्हाळी विकारांवर तर अतिशय उपयुक्त आहे. कसे करायचे साहीत्य व कृती,

साहीत्य :-
* जीरे २ टेस्पून
* सैंधव मीठ १टीस्पून
* पांढरे मीठ १/२ टीस्पून
* हींग १/४ टीस्पून
* आमचूर पावडर १ टेस्पून
* पुदीना पाने १ वाटी
* कोथिंबीर १ वाटी
* आलं एक इंच
* लिंबू २ नग
* थंड पाणी ४ ग्लास

कृती :-
प्रथम जीरे भाजून कुटून घ्या. नंतर कोथिंबीर, पुदीना व आलं धुवून मिक्सरमधे वाटून पेस्ट करा.

एका जारमधे पेस्ट काढा. त्यामधे लिंबू पिळा. पाणी घाला. आता जीरा पावडर, सैंधव मीठ, पांढरे मीठ, हींग व आमचूर पावडर घाला. व्यवस्थित ढवळा.

थंडगार प्यायला द्या. आवडत असेल तर ग्लास मधे वरून बर्फ घाला.

चवीला तर छान लागतेच व रंगपण हिरवा थंड नेत्रसुखद वाटतो. करायलाही सोपे आहे. तुम्हीही करून बघा. व कसे झाले ते इथे सांगायला विसरू नका.

टीप :- जीरे, सैंधव मीठ, मीठ, हींग व आमचूर पावडर एकत्र करून पावडर, हवाबंद डबीत भरून ठेवा. व ऐनवेळी पुदीना,कोथंबिर पेस्ट व लिंबूरस ग्लास मधे घ्या त्यामधे गार पाणी किवा सोडा घाला व वरून ही तयार पावडर टाका चमच्याने ढवळा. झटपट तयार!
तसेच ही पावडर ताका मधे घालून प्यायलाही छान लागते. 
किंवा नुसत्या थंडगार पाणी/ सोडा मधे घालून प्यालो तरी चालते.जल व जीरा!

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

लिंबू सरबत (Lemon Sharbat)

No comments :

लिंबू सरबत सर्वांच्या परिचयाचे आहे. उन्हाळ्यात तर हमखास प्रत्येक घरी, अधून-मधून केले जातेच. कधि घरच्यांच्या साठी तर,कधी घरी आल्या- गेल्यांसाठी! लिंबू मधे विटामिन 'सी' भरपूर असते. तसेच पाचक व तहान शमवणारे आहे. सहजसोपे व पट्कन होणारे आहे.

साहीत्य :-

* लिंबू 2 नग
* थंड पाणी  4 ग्लास
* पिठी साखर 2 टेस्पून
* मीठ चविनूसार
* वेलचीपूड (ऐच्छिक)

कृती :-
       प्रथम एका भांड्यामधे पाणी घ्या. त्यामधे मीठ, साखर घालून ढवळा व साखर विरघळवून घ्या.

आता लिंबू हाताने जमिनीवर दाबून फिरवून मऊ करा व आडवे चिरून दोन भाग करा. लिंबू यंत्रातून दाबून रस काढून मीठ,साखर विरघळलेल्या पाण्यात घाला. वरून वेलचीपूड घाला  व व्यवस्थित ढवळून थंडगार प्याला द्या.

टीप :- सरबत करायच्या 15 मिनिट आधि लिंबू फ्रिज मधून बाहेर काढून कोमट पाण्यात टाकल्यास रस जास्त निघतो.

18 April 2016

मैंगो कुल्फी (Mango kulfi)

No comments :

उन्हाळा म्हटले की, बाहेर उन्हें रणरणत असतात सहाजिकच काहीतरी थंडगार खावे वाटते. तर सकाळीच कुल्फी लावून फ्रिज मधे ठेवली तर, जेवण झाले की, मस्त मलाईदार कुल्फी चा आस्वाद घेता येईल. या दिवसात आंबे ही येतात.  तर चला आपण घरच्या-घरी पौष्टीक, शुध्द सात्विक अंब्याच्या स्वादाची कुल्फी तयार करू.

साहीत्य ;-

* होलमिल्क 1/2 लिटर
* खवा 50 ग्राम / मिल्क पावडर 4 टेस्पून
* साखर 1/2 वाटी
* मँगो पल्प 2 वाट्या
* काॅर्नफ्लोअर /तांदुळ पीठी 2 टेस्पून
* वेलचीपूड
* ड्रायफ्रूट्स

कृती :-

प्रथम दूध उकळवायला ठेवावे. थोडे उकळले की,खवा किवा मिल्क पावडर थोड्या दूधामधे मिक्स करून मग उकळत्या दूघात घाला. नंतर काॅर्नफ्लोअर पण थोड्या दूधामधे मिक्स करून दूघ हलवत-हलवत त्यात घाला. गुठळी होऊ देऊ नका. मिश्रण सतत ढवळत रहा. दूध दहा मिनिटानी घट्ट होण्यास सुरवात होईल. पूरेसे घट्ट झाले की,गँस बंद करा. मिश्रण थंड होऊ द्या.

आता आंबे सोलून, चिरून त्याच्या फोडी करून घ्या व साखर मिसळून मिक्सरमधे फिरवा.

आता थंड झालेल्या दूधामधे आब्यांचा रस, वेलची पूड,ड्रायफ्रूट्स सर्व घाला. परत एकदा सर्व एकत्र करून मिक्सरमधे फिरवा.

नंतर तयार दूधाचे मिश्रण कुल्फी मोल्डमधे किवा कोणत्याही प्लास्टिक बाऊलमधे ओता व फ्रिजर मधे 2-3 तास ठेउन द्या.

खायला देताना वरून ड्रायफ्रूट्स चा चूरा भुरभूरा व थंडगार 'मँगो कुल्फी' सर्व्ह करा. तूम्हीही करून बघा व कशी झाली ते सांगायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

10 April 2016

फालुदा आईसक्रीम (Faluda Ice-cream)

No comments :

'फालुदा आईसक्रीम' एक मस्त इंडियन डेजर्ट चा प्रकार आहे. गरमीच्या दिवसात असे मस्त गारेगार घरच्या घरी दुपारचे वेळी खायला मिळाले तर किती छान न?  तर चला बघू कसे करायचे पाहू,

साहीत्य :-
* फुल क्रीम मिल्क 1 लिटर
* फालुदा शेवया 1बाउल
* रोज सिरप अर्धा कप
* सब्जा बी 1 टेस्पून
* जेली क्यूब्स
* व्हँनिला आईसक्रीम
* ड्रायफ्रूट्स ऐच्छीक
* चेरी, टूटी-फूटी सजावटीला

कृती :-

प्रथम दूध उकळवायला ठेवावे.  चांगले उकळून दाट होईपर्यंत उकळा व गार करून फ्रिज मधे चांगले थंड होण्यासाठी ठेवून द्या.

सब्जा बी वाटीत पाणी घेऊन फुलण्यासाठी भिजत घाला. ( हे प्रकृतीला अतिशय थंड व पाचक असते.)

शेवया गरम पाण्यात हलकेच उकडा व थंड होण्यासाठी फ्रिज मधे ठेवून द्या.

आता खायला देण्तासाठी एक उभा ग्लास घ्या. त्यामधे तळाला आधी रोज सिरप घाला. नंतर अनुक्रमे शेवया, सब्जा बी, ड्रायफ्रूट्स, जेली घाला. नंतर गार दूध घाला. शेवटी वर आईसक्रीम एक स्कूप घाला व टूटी-फूटी, चेरीने सजवा.

गारेगार सर्व्ह करा.

थंड व पौष्टीक आहे तूम्हीही करून बघा

टीप :- फालुदा शेवया नसतील तर नेहमीच्या नायलाँन शेवया वापरा. किवा तयार करा.
कृती :-1 वाटी काॅर्नफ्लोअर, 2 वाटी पाणी घेऊन एकत्र करा.  गुठ्यळ्या होउ देउ नयेत.  गँसवर हलवत -हलवत घट्ट होईपर्यंत शिजवा व गरम असतानाच शेव यंत्रातून बर्फाच्या गार पाण्यात बाउल मधे पाडा. बाउल तसाच फ्रीज मधे ठेवा. ऐनवेळी पाण्यातून चमच्याने काढा व ग्लासमघे घाला.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

06 April 2016

लाल चवळीची उसळ (Chawali Usual)

No comments :

चवळी एक कडधान्याचा प्रकार आहे.पांढरी, लाल, लहान, मोठी देशी असे बरेच प्रकार आहेत. तर मी लाल बारीक चवळीची उसळ केलि आहे. साहीत्य व कृती,

साहीत्य :-

* चवळी 1 वाटी
* कांदा चिरून 1
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* गोडा /काळा मसाला
* मीठ चविनूसार
* लाल मिरचीपूड
* हळदपूड
* गूळ लहान खडा (ऐच्छिक)
* तेल 2 टेस्पून
* फोडणी साहीत्य
* कोथंबिर सजावटीला
* पाणी गरजे पूरते

कृती :-

प्रथम चवळी 5-6 तास भिजत घाला. नंतर कुकरला दोन शिट्या काढून शिजवून घ्या.

नंतर पातेल्यात तेल गरम करून हींग, मोहरी, हळद घालून फोडणी करा व चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत भाजा. आल-लसूण, हिरवी मिरची पेस्ट घाला. आता शिजलेली चवळी घाला. दोन वाट्या पाणी घाला. तिखट, मीठ, मसाला व गूळ घाला. पाच मिनिट शिजू द्या. नंतर गँस बंद करा.

आता वरून कोथंबिर घाला व भाकरी किवा चपाती सोबत वाढा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

04 April 2016

खट्टी -मिठी भेंडी ( Khatti -Mithi Bhindi)

No comments :

भेंडीची भाजी बर्याच प्रकारांनी करता येते. भेंडी गुणांनी थंड असते. तशी बाराही महिने येते पण साधारण एप्रिल,मे हा सिझन. या दिवसात खूप मस्त कोवळी लुसलू़शित लहान -लहान भेंडी येते. तर अख्या भेंडीची आंबट-गोड चवीची ही भाजी कशी करायची पहा,

साहीत्य :-
* भेंडी 200 ग्रॅम
* मोठे कांदे 2
* लाल टोमँटो 2
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* चिंचेचा कोळ , गूळ
* मीठ चविला
* गरम/गोडा मसाला
* लाल मिरचीपूड आवडीनुसार
* हळद
* तेल
* फोडणी साहीत्य

कृती :-

प्रथम भेंडी स्वच्छ धुवून पासून घ्या. आता भेंडी चारी बाजूनी फक्त उसी चिर मारून कापा. शेंड्या - बुडक्याकडून तसेच राहू द्या. फक्त पोट फाडा.

कांदा व टोमँटो उभा चिरून घ्या.

आता, कढईत तेल गरम करून हींग, मोहरी हळद घाला. आल-लसूण मिरची पेस्ट घाला.  कांदा व टोमँटो घाला. थोडेच परता भाजू नका. लगेच चिरलेली भेंडी घाला व सर्व नीट हलवून एक वाफ यायला झाकून ठेवा.

एक वाफ काढल्यानंतर त्यामधे चिंचेचा कोळ, तिखट, मीठ, मसाला, गूळ सर्व साहीत्य घालून हलवा व पाच मिनिट परत झाकून एक वाफ काढा. पाच मिनिटानी उघडल्यावर मस्त सर्व मसाला भेंडीच्या आत शिरलेला दिसेल.

आता गरमा-गरम खट्टी-मीठी भेंडी विथ ग्रेवी तयार!  पोळी सोबत खा.

टीप :- या भाजीला कांदा व टोमँटो भरपूर लागतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

01 April 2016

आप्पे दहीवडा (Aappe Dahivada)

No comments :
पौष्टिक तरीपण चटपटीत काय खायला करायचे? असा प्रश्न पडेल तेव्हा हा,'आप्पे दहीवडा ' हा एक चांगला पर्याय आहे. उन्हाळ्यात थंड व अजिबात तेलकट नसलेला पदार्थ आहे. तर पहा साहीत्य व कृती,
साहीत्य :-
* मोठा तांदुळ २ वाट्या
* उडीद डाळ १ वाटी
* चणाडाळ १/२ वाटी
* चविनुसार मीठ
* दही १ वाटी  व दह्यासाठी,
* मीठ,साखर
* वरून घालण्यासाठी, लाल मिरचीपूड व  मिरपूड

कृती :-
प्रथम तांदुळ व डाळी ४-५ तास वेगवेगळ्या भिजत घाला. नंतर वाटून एकत्र करा व फरमेंटेशन साठी ८ तास ठेवा.

आता आप्पे पात्राला तेलाचा हात लावून त्यात तयार पीठ घाला व झाकून दोन मिनिट वाफवा. परत पलटून दुसरी बाजू पण थोडी भाजा. पण आप्पे जास्त तांबूस भाजून नका. साधारण पांढरेच राहू द्या.

आता दही घुसळून घ्या व त्यामधे चविला मीठ ल साखर घाला.शेवटी एका प्लेट मधे तयार आप्पे  ठेवा व वरून दही घाला. मिरपूड व लाल मिरचीपूड भुरभूरा व खायला द्या.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

31 March 2016

चित्रान्न (Chitranna)

No comments :

चित्रान्न हा कर्नाटक भागातील भाताचा एक  प्रकार आहे. खायला चवदार व करायला एकदम सोपा. कसा करायचा साहीत्य व कृती,

साहीत्य :-

* तांदुळ 1 वाटी,
* 5-6 सुक्या लाल मिरच्या,कढीपत्ता, कोथंबिर,  * उडद डाळ 3 चमचे,
* खोवलेले ओले खोबर 2 वाट्या,
* कच्चा मसाला किंवा धना-जिरा पावडर 2 चमचे,
* मीठ, साखर चविनुसार,
* लिंबू अर्धा 
* तेल पाव वाटी

कृती :-

प्रथम मीठ घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. नंतर तो गार होण्यासाठी ताटात पसरून ठेवा.

नंतर फोडणी करून उडद डाळ गुलाबी भाजून घ्या. त्यामधे मिरची व कढीपत्ता घाला.आता वर गार केलेला भात घाला.वरून कच्चा मसाला, साखर व नारळाचा चव घाला व्यवस्थित हलवून एक वाफ आणा.

शेवटी वरून लिंबू पिळा व कोथंबिर घाला. गरमा-गरम वाढा.

टीप :- आदले  दिवशी चा शिळा भात राहीला असेल तर, हा भात जास्तच चांगला मोकळा होतो. गार करावा लागत नाही.

29 March 2016

मूग टिक्की (Moong Tikki)

No comments :

चटपटीत पदार्थ सगळ्यानाच खायला आवडतात.पण चटपटीत म्हणले की तेल आलेच. व आपण जर डाएट काॅन्शिस असू तर मग असे पदार्थ खाताना मनात अपराधीपणाची भावना येते.म्हणून चटपटीत पण पौष्टीक हिरव्या मुगाची टिक्की बनवली.

साहीत्य :-

1) मोड आलेले हिरवे मूग 2 वाट्या
2) उकडलेला बटाटा मोठ्ठा एक
3) मिरची, आले, लसूण पेस्ट आवडीनुसार
4) मीठ चवीला
5) गरम मसाला
6) तेल
7) कोथंबिर

कृती :-

प्रथम हिरवे मूग थोडे वाफवावेत .थंड झाल्यावर थोडे भरडच मिक्सरमधून काढावेत.

आता या मिश्रणात उकडलेला बटाटा मॅश करून घाला. नंतर त्यात मीठ, मसाला व आलं लसूण , मिरची पेस्ट, कोथंबिर घालावी व चांगले एकजीव करावे.

आता तयार मिश्रणाचे आपल्या आवडीच्या आकारमानाचे साधारण चपटे गोळे करा व पॅनमधे तेल सोडून उलटे-पालटे भाजावे.

मस्त खमंग व पौष्टीक टिक्की तयार. साॅस किवा चटणीसोबत सर्व्ह करा.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

22 March 2016

पोह्याचे वडे (Poha vada)

1 comment :

सर्वसामान्यपणे घरात नाष्टा म्हटले की,आपण  पट्कन होणारे पदार्थ म्हणून कांदापोहे किंवा रव्याच्या उपम्यालाच पसंती देतो. पण नेहमी - नेहमी तेच खायचा कंटाळा येतो. मग त्याच पोह्याचे वडे किंवा भजी केली तर?  सर्व साहीत्य थोड्याफार फरकाने तेच, फक्त प्रमाण वेगळे वआकार वेगळा. वेळही काही जास्त लागत नाही. पट्कन होतात. बघा साहीत्य व कृती :-

साहीत्य :-

* पातळ पोहे 2 वाट्या
* चना डाळ पीठ 2 टेस्पून
* तांदुळाचे पीठ 1 टेस्पून
* बारीक चिरून कांदा 1
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* बारीक चिरून कोथंबिर
* मीठ चविनूसार
* हळद
* धना-जिरा पावडर 2 टीस्पून
* तेल तळण्यासाठी
* पाणी 

कृती :-

प्रथम पोहे धुवून चाळणीमधे निथळत ठेवा. तोपर्यत इतर तयारी करावी. कांदा चिरून घेणे,आलं-लसूण मिरची पेस्ट तयार करणे इत्यादी.

आता भिजलेल्या पोह्यामधे वर दिलेले सर्व साहीत्य घालून हाताने एकजिव करून गोळा मळून तयार करा. गरज वाटली तर मळताना पाण्याचा हात घ्यावा.

नंतर तेल तापत ठेवा,व हाताने लहान -लहान चपटे वडे करून गरम तेलात तळा. तूम्ही फोटो मधे दाखवल्या प्रमाणे छोटी-छोटी भजी पण काढू शकता.

तयार खुसखूषीत व गरम कशासोबतही खा किंवा नुसतेही छान लागतात. तूम्हीही करून बघा नक्की आवडतील. मात्र प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

टीप :- पोहे जाडही घेऊ शकता.फक्त भिजवताना थोडे पाणी वापरावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

10 March 2016

व्हेजी कचोरी (Vegi. Kachori)

No comments :

कचोरी ही सामान्यपणे उत्तर भारतीयांची खासियत. वरून मैद्याचे आवरण (पुरी) व आत बटाटा, वाटाण्याचे सारण असते. पण मी थोडा बदल केलाय. मैदा टाळण्यासाठी हा प्रयोग केला व छान जमले. टिपिकल कचोरी पेक्षाही वरचे आवरण खुसखूषीत होते.व भाज्याही पोटात जातात. कसे केले साहीत्य व कृती :-

साहीत्य :-
सारणासाठी --
* कोबी किसान/बारीक चिरून 2 वाट्या
* मटार 1वाटी
* शिमला मिर्च बारीक चिरून 1
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट 2टीस्पून
* कोथंबिर चिरून
* धना-जिरा पावडर 2 टीस्पून
* चाट मसाला पाव टीस्पून
* साखर चिमूटभर
* मीठ चविनूसार
* हळद.,हींग मोहरी
* तेल 1टेस्पून
वरच्या पारीसाठी
* उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे 2-3
* जाड पोहे भाजून 2वाट्या
* मीठ चविला

कृती :-

    प्रथम बटाटे सोलून जाड खिसणाीने किसून घ्या. त्यामधे पोहे भाजून घाला. चविला मीठ घाला व एकत्र मळून घ्या. बाजूला ठेवून द्या.

आता सारणासाठी पँन मधे तेल गरम करा. हळद, हींग, मोहरी घालून फोडणी करा.  त्यामधे आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट घाला. नंतर कोबी, शिमला, मटार घाला. थोडे परतून घ्या. नंतर मीठ,गरम मसाला, धना-जीरा पावडर, साखर, चाट मसाला घालून एक वाफ आणून घ्या. फार मऊ शिजवू नका. क्रंची पणा राहू दे. शेवटी वरून कोथंबिर घालून हलवा.

आता आधि करून ठेवलेल्या कणिकेचा मोठ्या लिंबाइतका गोळा घ्या व वाटीचा आकार करून तयार सारण भरा.  अलगद हाताने तोंड बंद करून एकसारखा गोळा करा. अशा सर्व कचेार्या  करून घ्या.

गरम तेलात मध्यम आचेवर खरपूस तांबूस रंगावर तळा.

गरमा-गरमच खायला द्या. आवडत असेल तर हिरवी चटणी, साँस द्या. पण नुसत्याही छान लागतात. पोह्यामुळे खूप खुसखूषीत होतात. तूम्हीही करून बंघा. नक्की आवडतील.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

05 March 2016

चाँकलेट केक (Chocolate Cake)

No comments :

02 March 2016

पाटवड्याचा रस्सा (Patavadi Curry)

No comments :

पाटवड्याचा रस्सा ही पाककृती खानदेश भागातील आहे. तसा हा रस्सा वेगवेगळ्या पध्दतिने बर्याच घरात केला जातो. याची चव मसालेदार व चमचमीतपणा कडे झुकते. आमच्या घरी रोज हिरव्या भाज्या खाऊन कंटाळा आला की, मी बदल म्हणून करते. सर्वाना आवडतो . कसा केला कृती व साहीत्य-:

साहीत्य :-
रश्शयाचे
* कांदा पातळ उभा चिरून एक
* सुकं खोबरं किस अर्धी वाटी
* खसखस 2 टीस्पृन
* ओलं खोबरं अर्धी वाटी
* जीरे अर्धा टीस्पून
* आलं-लसूण पेस्ट 2 टीस्पून
* कोथंबिर
* लाल मिरचीपूड 2 टीस्पून
* धना-जिरा पावडर 2 टीस्पून
* गरम मसाला 1 टीस्पून
* मीठ चविनूसार
* तेल पाव वाटी(कट जास्त हवा असल्र्यास जास्त घ्या)
* हळद,हींग
* पाणी 4-5 वाट्या
पाटवडी साहीत्य :-
* चना डाळ पीठ 2 वाट्या
* तेल पाव वाटी
* आलं-लसूण मिरची पेस्ट 1 टीस्पून
* कोथंबिर व सूकं खोबरं किस सजावटीला
* फोडणी साहीत्य हळद,हींग,मोहरी
* पाणी 3 वाट्या( कमी-जास्त होऊ शकते)

कृती :-

प्रथम सूकं खोबरं, जिरे, खसखस भाजून घ्या. नंतर थोड्या तेलावर कांदा गुलाबी रंगावर परता.
आता मिक्सरमधे ओलं खोबरं व भाजलेले सर्व  साहीत्य वाटून पेस्ट करा .

नंतर तेल गरम करून त्यामधे हळद हींग, आल-लसूण पेस्ट घाला. मिरचीपूडही घाला. कटाचा रंग छान येतो. नंतर तयार पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता. मीठ,धना-जीरा पावडर,गरम मसाला घाला. शेवटी पाणी घालून उकळी आणा.

आता पाटवड्यासाठी कढईत तेल गरम करून फोडणी करा. फोडणीमधे आल॔-लसूण मिरची पेस्ट घालून परता.  दोन वाट्या पाणी घाला. चविला मीठ, कोथंबिर  घाला. उकळी आली की डाळीचे पीठ हलवत- हलवत गुठ्यळ्या होऊ न देता घालावे. एक वाफ आणा. चिमटीने पीठ धरून बघा. बोटाला चिकटले नाही की,झाले.

नंतर ताटात घेऊन पाण्याच्या हाताने मळून घ्या. व थाळ्यामधे आधीच कोथबीर, सुक खोबरं पसरून ठेवा व शेवटी मळलेला गोळा त्यावर थापा. गार झाल्यावर सुरीने वड्या कापा.

सर्व्ह करताना आधि वड्या बाउलमधे घाला व वरून रस्सा घाला. कोथंबिर घाला.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

26 February 2016

हिरव्या मुगाचे डोसे (Sprouts Dosa)

No comments :
कडधान्यामधे हिरवे मुग पचनास एकदम हलके . अगदी लहान मुलांना सुध्दा मुग डाळीचे कढण, खिचड़ी असे देतात. तसेच पथ्यकर आकारात मुग डाळ अग्रक्रमांकावर असते. वजन कमी करण्यासाठी डॉक्टर मोड आलेले मुग खाण्यास सांगतात. एकूण काय तर हिरवे मुग, मुगडाळ आरोग्याला उत्तम. परंतु तूरडाळीच्या तुलनेत चविला मुगडाळीला खमंगपणा तितकासा नसतो. त्यामुळे आहारात वापर कमी असतो.पण हिरव्या मुगाचा चविष्ट, खमंग असा एखादा पदार्थ तुम्हाला करून दिल्यास नक्की आवडेल.तर आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाचे डोसे करू -

साहीत्य -
* मोडाचे मुग 2 वाट्या
* डाळीचे पीठ 2 टेस्पून
* हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट 2 टीस्पून
* मीठ चविनूसार
* हळद, हींग
* कोथंबिर
* पाणी
* तेल

कृती :-

प्रथम मुग मिक्सरमधे थोडे पाणी घालून भरड वाटून घ्या.

नंतर वाटलेल्या मुगामधे कोथंबिर, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, डाळीचे पीठ,चविला मीठ व हळद,हींग घालून नीट ढवळून घ्या. गरज वाटल्यास थोडे पाणी घाला. परंतु जास्त पाणी घालून पातळ करू नका. मिश्रण घटसरच ठेवावे.

आता तापलेल्या तव्यावर थोडे तेल सोडा व डावाने थोडे -थोड़े मिश्रण घाला. डावानेच पसरवा. हे किंचित जाडसरच असतात. एक बाजू भाजली की दुसरीही बाजू तेल सोडून भाजून घ्या.

तयार डोसे हिरव्या चटणी सोबत खायला द्या. सकाळी नाष्टाला किंवा मुलांना डब्यात द्यायला सोईचे व पौष्टिक आहेत. तूम्हीही करून बघा नक्की आवडतील.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

24 February 2016

टोमँटो मिक्स व्हैज सूप ( Mix Veg.Soup)

No comments :
सूप! नुसते टमाटा सूप नेहमीच केले जाते. आज मी मिक्स व्हैज सूप केले आहे. हे सूप जर रात्रिच्या जेवणा ऐवजी घेतले तरी पोटभरीचे असल्याने भूक लागत नाही. एकदम सोपे व पट्कन होणारे आहे.

साहीत्य :-
* लाल टोमँटो 4 नग
* लाल भोपळा एक वाटी फोडी
* गाजर 2 नग
* लवंगा 4.
* दालचीनी 1इंच
* मिरपूड
* आलं अर्धा इंच
* लसूण 4 पाकळ्या
* गव्हाचे पीठ 1 टीस्पून
* मीठ चविनूसार
* साखर 1 टीस्पून
* पाणी /भाजीचा स्टाँक असेल तर जास्तच चांगले .

कृती :-

प्रथम गाजर व भोपळा साल काढून मोठे तूकडे करून घ्या.

आता कूकरच्या डब्यात टोमँटो, गाजर व भोपळ्याच्या फोडी घाला. त्यासोबतच, गव्हाचे पीठ व मीठ, साखर  सोडून बाकी सर्व घाला व शिजायला ठेवा. एक शिट्टी काढा.

थंड झाले की,लसूण,आलं दालचीनी लवंगा चमच्याने काढून टाका, टोमँटो ची साल काढा व मिक्सरमधे किवा ब्लेडरने घुसळून मीठ व साखर घाला.गरजे इतक पाणी घाला.

आता एका वाटीत गव्हाचे पीठ घेऊन थोडे पाणी घालून पेस्ट बनवा व वरील मिश्रणात मिसळा. सर्व नीट ढवळून गँसवर गरम करायला ठेवावे. चांगले गरम होउन उकळले की गँस बंद करा व गरमा-गरम सूप बाउलमधे काढा. वरून मिरपूड घाला व प्यायला द्या.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते.आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

18 February 2016

सुंदल (Sundal)

No comments :

सुंदल हा एक कर्नाटकी पदार्थ आहे.ही पाककृती माझे आवडते शेफ श्री विष्णू मनोहर यानी Colors t v वरील "मेजवानी" या खाद्य  कार्यक्रमामधे दाखविलेली आहे. मी पाहीली तर एकदम सोपी व सहज करता येण्यासारखी वाटली. मुख्य म्हणजे घरातल्या घरात जे उपलब्ध साहीत्य असते त्यात तयार होणारी असल्याने मी पट्कन करून पाहीली. आवडली!  खूप झटपट व चवदार बनली. तसेच पोटभरीची पण आहे. मुलांना शाळेतून घरी आल्यावर संध्याकाळच्या नाष्टाला घ्यायला छान आहे. कसे करायचे कृती व साहित्य -

साहित्य :-

* तांदुळाचे पीठ 1 वाटी
* पाणी 1 वाटी
* मीठ, साखर चविनुसार
* खोवलेलेे ओलं खोबर अर्धी वाटी
* तेल 2 टेस्पून
* फोडणी साहित्य
* उडीद डाळ 1 टीस्पून
* कढीपत्ता
* कोथंबिर
* लिंबू ऐच्छिक

कृती :-

प्रथम पाणी गरम करण्यास ठेवा. त्यामधे चिमूटभर मीठ व थोड़े तेल टाका. उकळी आली की, पीठ घाला. झार्याच्या टोकाने हलवा. गुठळी न होउ देता, उकडीच्या मोदक सारखी उक्कड शिजवा. पंधरा मिनिट झाकून ठेवा.

आता तेल पाण्याच्या हाताने उक्कड नीट मळून घ्या व सुपारी सारख्या लहान गोळ्या करा.

आता चाळंणीवर गोळ्या ठेउन मोदका सारखे 10 मी. वाफवा.

नंतर कढईत तेल घाला व फोडणी करा. फोडणी मघे उडद डाळ गुलाबी होईपर्यंत तळा. आता कढीपत्ता व ओले खोबर घालून थोडे परता.मीठ व साखर चवीला घाला. थोडे लिंबू पिळा.

शेवटी वाफवलेल्या गोळ्या घालून, सर्व व्यवस्थित हलवा व परत पाच मिनिट वाफवा.

आता तयार सुंदल डिश मधे काढून वर कोथंबिर  घालून गरमा-गरम खायला द्या.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते.आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

12 February 2016

वाणाचे पापड (Paapad)

No comments :
'वाणाचे पापड' ही रेसिपी माझी मैत्रिण नेहा सौरभ पाटील हीने दीलेली आहे.मीही करून पाहीली छान वाटली म्हंणून तुमच्या बरोबर शेअर करत आहे.
ही एक कर्नाटक प्रांतातील पारंपारिक रेसिपी आहे..संक्राति दिवशी प्रत्येक सवाष्णींना मातीच्या सुगडामधे हे सात पापड वाण म्हंणून घालून दीले जातात. मूळ रेसिपी पेक्शा साहित्या मधे थोडाफार मी बदल केला आहे. मूळ 2 वाटी कणिक व 1वाटी बेसन किंवा 3 वाटी मैदा व 1 वाटी बेसन होते तर मी दीड वाटी मैदा व दीड वाटी कणिक व एक वाटी वेसन घेतले. छान झाले . साहित्य व कृती :-

साहित्य :-
* कणिक 1 1/2 वाटी
* मैदा 1 1/2 वाटी
* बेसन 1 वाटी
* जीरे 2 टीस्पून
* ओवा 1 टीस्पून
* तिळ 2 टीस्पून
* हळद 1/2 टीस्पून
* मोहन 3 टीस्पून
* मीठा चविनुसार
* तेल तंळणीसाठी
* पाणी

कृती ;-

प्रथम मैदा, कणिक, बेसन व सर्व मसाला कोरडेच एकत्र करून घ्यावे.

नंतर गरम तेलाचे मोहन घालून पीठाला चोळा.

आता गरजे पूरते पाणी घालून कणिक ंघट्ट मळा. दहा मिनिट झाकून ठेवा.

दहा मिनिटानी पुरीच्या आकाराचे पातळ पापड लाटून त्यावर सुरीने टोचे मारा व गरम तेलात तळा.

हे पापड स्नँक्स म्हणून चहा सोबत पण खाता येतात.तसेच पंधरा दिवस पर्यंत चांगले टिकतात. प्रवासातही नेता येतात. तूम्हीही करून बंघा. नक्की आवडतील.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते.आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

03 February 2016

चाकवत वडे (Chakawat Vade)

No comments :

चाकवत ही पालाभाजी आहे.या भाजीचे भिजवलेली चना डाळ व शेंगदाणे घालून गरगटे(पातळ भाजी) छान होते.पण आज मनात आले की भाजी खूप जास्त आहे, थोड्या भाजीचे वडे करावेत. तसा हा फार जूना प्रकार आहे. पण ही भाजीच तशी सहसा मिळत नसल्याने सर्रास केले जात नाहीत.असो, साहीत्य व कृती -

साहीत्य :-

* बारीक चिरलेले चाकवत 2 वाट्या
* डाळीच पीठ 1 वाटी
* तांदुळाची पीठी 1 टेस्पून
* हिरवी मिरची+लसूण+आलं पेस्ट 2 टीस्पून
* मीठ चवीनूसार
* हंळद
* तेल

कृती :-

प्रथम कढईत अगदी थोडेसे तेल गरम करून, आल-लसूण,मिरची पेस्ट व हळद घाला. त्यावर भाजी टाका. एक वाफ येउन भाजी खाली बसली की, लगेच डाळीचे पीठ,तादुळ पीठ व मीठ घालून गुठळी न होऊ देता घोटा. फार घट्ट वाटले तर पाण्याचा हबका मारा व एक वाफ आणून गॅस बंद करा. थंड होऊ द्या.

आता ते थंड मिश्रण चांगले मळा व हातावरच थापून साधारण गोल,चपटसर वडे करा. गरम तेलात सोडा व मंद आचेवर तांबूस तळा.

अतिशय खुसखूषीत, हलके असे वडे तयार होतात. चटणी,साॅस सोबत अथवा नुसतेच खा.
छान लागतात. तुम्हीही करून बघा. नक्की आवडतील. प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते.आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

28 January 2016

आलू-पालक ग्रेव्ही सब्जी ( Aloo-Palak Gravy Subji)

No comments :

पालक एक स्वस्त अशी पालेभाजी आहे. मात्र पालकाची भाजी शक्यतो बर्याचजणाची नावडतीच ! मुलांना तर भाज्या नकोच असतात त्यात पालकाची तर नकोच नको. पालकाला स्वताची अशी खास वेगळी चव नसते.पण रंग मात्र छान असतो. तसेच यात लोह, फाॅलीक अॅसिड, जीवनसत्वे असतात.पालकाचे विविध प्रकार करता येतात.तसेच ते नुसते कच्चेच सलाड रूपात पण खाता येते.आज आपण बटाट्यासोबत करू. कारण बटाटा तसा सर्वानाच व खास मुलांना आवडतो.

साहीत्य :-
* पालक एक जूडी
* बटाटे मध्यम दोन
* कांदा एक
* टोमॅटो मोठा एक
* आल-लसूण,मिरची पेस्ट
* काजू 5-6 (ऐच्छिक)
* फ्रेश क्रिम (ऐच्छिक)
* तेल फोडणी साठी
* हिग ,हळद
* मीठ चवीनुसार
* गरम मसाला एक सपाट टीस्पून
* पाणी

कृती :-

प्रथम पालक निवडून, स्वच्छ धुवून घ्या.तो गरम पाण्यात टाकून नुसता एक मिनिट ब्लांच करावा. चाळणीत काढून वरून गार पाणी घालून थंड करत ठेवा. तोपर्यंत,

बटाटा साल काढून चौकोनी मोठे तूकडे करा. कांदा, टोमॅटो व काजूची पेस्ट करा.

आता पालकाची पण मिक्सरमधून पेस्ट करा

नंतर पातेल्यात तेल गरम करून हळद व हींग घाला, त्यावर आधी आल-लसूण,मिरची पेस्ट, नंतर कांदा,टोमॅटोची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता.

आता बटाट्याच्या फोडी अगदी थोडे पाणी घालून साधारण मऊ करून घ्या. कारण पालकबरोबर पण थोड्या शिजणार आहेत.

सर्वात शेवटी पालकाची पेस्ट घाला. मीठ,गरम मसाला घाला व एक उकळी येऊ द्या.

गरमा-गरम भाजी सर्व्ह करताना वरून फ्रेश क्रीम घालून पोळी किवा फुलक्या सोबत द्या.

टीप :- फार वेळ भाजी शिजवू नये.पालकाचा रंग जास्त शिजले की पिवळा पडतो.

ब्लांच केल्यावर अगदी फ्रिजमधील गार पाणी घातल्यास , रंग हिरवा रहाण्यास मदत होते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते.आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.