30 December 2014

मेथी डाळ-कांदा (Methi Dal-Kanda )

No comments :
आपण बरेच वेळा मंडईमधे जातो व चांगली मिळाली,स्वस्त मिळाली म्हणून गरज नसताना पण भाजीची एखादी जूडी जादाच आणतो. मग त्या भाजीचे वेगवेगळे प्रकार केले जातात.तरी शेवटी मूठभर भाजी शिल्लक रहाते.तर आता काय करायचे ? मग त्याचा पूढील प्रमाणे मेथी डाळ कांदा करून बघा.

साहीत्य :-
१) धुवून बारीक चिरलेली मेथी १ वाटी
२) मूग डाळ भिजवलेली १ वाटी
३) कांदा चिरून १ वाटी
४) लसूण,हिरवी मिरची पेस्ट
५) तेल ,फोडणी साहीत्य
६) मीठ चवीनुसार
कृती :-
प्रथम तेल तापवून फोडणी करावी व त्यात मिरची लसूण पेस्ट टाकावी.नंतर कांदा घालावा .कांदा गुलाबी रंगावर भाजला की आता भिजलेली डाळ घालावी व थोडे परतावे.नंतर त्यावर मेथी टाकावी व परतून झाकण ठेवून एक वाफ काढावी.शेवटी चविला मिठ घालून परतावे व गॅस बंद करावा.

खमंग मेथी डाळ-कांदा गरमा-गरम भाकरी बरोबर  खावा छान लागतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

26 December 2014

गाजर हलवा- १(Carrot Halawa )

No comments :
गाजर ही एक सर्वाना परिचित अशी भाजी आहे . गाजरामध्ये 'अ' जीवनसत्व भरपूर असते.त्यामूळे गाजर डोळ्यांसाठी उत्तम टाॅनिक असून ते शरीर शुध्दीकरणाचे कामपण करते.असे हे गाजर आपण अनेक प्रकारे उपयोगात आणतो. हलवा, खीर, वड्या, भाजी,कोशिंबीर,सॅलड,सूप,केक इत्यादी.पण कच्चीच खाल्यास अधिक उपयुक्त असतात.तरीपण स्वस्त मिळाल्याने एखादेवेळी भरपूर प्रमाणात उपलब्द झाली तर त्यातिल लहान कोवळी गाजरे कच्ची व सॅलड,कोशिंबीर स्वरूपात खावित व राहीलेली मोठी गाजरे किसून पूढे दिल्याप्रमाणे हलवा करून टाकावा.घरातील सर्व मंडळीपण खूष !

साहीत्य :-
१) गाजरे १ किलो ( गाजरे मोठी व लाल रंगाची वेचून घ्यावित )
२) साखर १ वाटी
३) तूप अर्धी वाटी
४ ) वेलची पावडर ,चार-पाच लवंगा
५) सुका मेवा आपल्या आवडीनूसार
६) एक कप दुध व एक लि.दूधाची मलई किवा खवा १०० ग्रॅम

कृती :-
प्रथम गाजरे स्वच्छ धुवून,साल काढून किसून घ्यावित.नंतर हा किस हातानेच दाबून पिळून रस काढून बाजूला ठेवा.

आता पॅनमध्ये तूप गरम करून त्यात लवंगा टाकाव्यात व त्यावर किस टाकावा.कोरडा होउन चांगला मऊ होईपर्यंत परतावा.
नंतर दूध व मलई किवा खवा घालावा.दोन-पाच मिनीटे परतवत रहावे.

आता साखर घाला व विरघळेपर्यंत हलवा. थोडे घट्टसर झाल्यावर गॅस बंद करा.
खाली घेऊन वेलची पूड व सुकामेवा घालावा व छानशा बाउल मधे काढून ठेवा.हवे तेव्हा व आवडत असल्यात खायला देताना वरून छानसे चमचा दोन चमचे लोणकढी तूप घालावे व खावा.

असा हलवा दोन-तिन दिवस आरामात टिकतो .फ्रीजमधे ठेवल्यास आठ दिवसपण रहातो.

टीप्स :-
किस पिळून ठेवलेला रस मिठ,साखर घालून पिऊन टाकावा खूप जीवनसत्वे असतात.अथवा सूपमध्ये वापरावा.

साखरेचे प्रमाण आपल्या आवडीने कमी-जास्त करावे.

खवा किंवा दूध,मलई ऐवजी आपल्याकडे जर पेढे शिल्लक असतील तर ते चार-पाच चूरडून घातले तरी चालते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

24 December 2014

शेव भाजी (Sev Subji)

No comments :
एखादे दिवशी त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा भाजी आणायचा कंटाळा करतो व अचानक पाहूणे येतात अशा वेळी झटपट व चमचमित असा हा भाजीचा प्रकार उत्तम आहे.तसे पाहीले तर ही भाजी खास करून गुजराती मंडळींची खासियत ! पण आजकाल सर्वजणच करतात.अगदी एखाद्या जेवणाच्या धाब्यावर सुध्दा असते.कोणी गाठीया शेव वापरतात तर कोणी लाल तिखट शेव वापरतात.तर अशी ही शेव भाजी कशी बनवायची पाहू.
साहीत्य :-
* लाल/गाठीया शेव एक वाटी
* कांदा एक
* लाल टोमॅटो एक
* आल-लसूण पेस्ट एक चमचा
* धना-जिरा पावडर अर्धा चमचा
* गरम मसाला एक चमचा
* मिरची पावडर
* मिठ
* तेल
* फोडणीचे साहीत्य
* पाणी
* कोथंबिर
कृती :-
        प्रथम कांदा,आले-लसूण पेस्ट तयार करावी.नंतर पातेल्यात तेल घालून फोडणी करून त्यामध्ये तयार पेस्ट घालावी व परतावी.नंतर त्यावर टोमॅटो पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतावे.

आता दोन वाट्या पाणी घाला.गरम मसाला,धना-जिरा पावडर, तिखट,मिठ सर्व घालावे व शेवटी शेव घालून एक उकळी काढावी .

तयार भाजीमधे वरून कोथंबिर घालून व आवडत असेल जोडीला कांदा-लिंबू ठेवून सर्व्ह करावे.भाकरी,पोळी अथवा तंदूर रोटी बरोबर छान लागते.

टीप :-
ही माजी थोडी रस्सादारच छान लागते.पण सूकी पाहीजे असल्यास पाणी कमी घाला.
तसेच जास्त आधि करून ठेवल्यास पाणी शोषले जाऊन भाजी घट्ट व रद्दा होते.म्हणून आयत्यावेळीच करावी.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

आहार संबधी काही सोप्या टीप्स !

No comments :

भोजन कसे घ्यावे ??
***************
आपल्या जेवणाचे प्रमाण ठरवण्यसाठी साधे सोपे गणित सांगितले आहे. आपल्या जठराचे ४ भाग करा. त्यातील २/३ भाग घन/ठोस आहार (भात, भाजी, चपाती इ.) घ्या. १/४ भाग द्रवाहार घ्या (दूध, ताक, रस, सूप इ.). उरलेल्या १/४ भाग रिकामा ठेवा. यामुळे जठरात त्याचे चलनवलन नीट होऊन त्याचे पचन नीट होते. म्हणून तर आपल्याकडे म्हणतात, 'सावकाश = स+अवकाश' जेवावे.

*भोजनक्रम

आहार जेव्हा आपल्या शरीराच्या तापमानाचा होईल तेव्हाच त्याचे आपल्या पाचकाग्निद्वारे पचन होते. योग्य पचनासाठी भोजनक्रम असा असावा:

१) प्रथम घोटभर पाणी प्यावे.

२) यानंतर मधुर व स्निग्ध पदार्थ खावेत. यामुळे अन्ननलिकेला स्निग्धत्व प्राप्त होते व पुढील घास ठोठरे न बसता सुलभपणे पुढे जातात. भूक लागलेली असताना पोटात वायुदोष वाढलेला असतो. या वायूची शांती अशा पदार्थांनी होते. यामुळे पुढे होणारे पचनाचे विकार टाळता येतात. तूप लावलेली पोळी किंवा भाकरी असे जड पदार्थ सर्वप्रथम खावेत कारण भुकेलेला माणूस असे पचायला जड पदार्थ सहज पचवू शकतो. यानंतर भात व हलके पदार्थ घ्यावेत. वरण, भात, तूप व वर लिंबू पिळून खाणे ही अत्यंत योग्य पध्दत आहे. प्रथिने (डाळीचे वरण), कर्बोदके (तांदळाचा भात), स्निग्ध (तूप) व विटॅमिन्स या सर्वांचे हे अगदी योग्य मिश्रण आहे.

३) यानंतर खारट व आंबट पदार्थ घ्यावेत. हे पदार्थ जठरात पाचक स्त्राव स्त्रवायला मदत करतात. यात लोणची, पापड, कोथिंबीर या सर्वांचा समावेश होतो पण ही अत्यंत मर्यादित प्रमाणातच घ्यावीत.

४) सर्वात शेवटी तिखट, कडू, व तुरट रस असावेत. भाजी, कढी, ताक हे पदार्थ सर्वात शेवटी घ्यावेत. आवळयासारख्या तुरट रसाच्या आणि कारलं, मेथीसारख्या कडू रसाच्या पदार्थांचा समावेश रोजच्या आहारात जरूर करावा.
आपला आहार सर्व रस युक्त असा असावा.
गोड,आंबट,खारट,तिखट,तुरट असा सर्व चवीयुक्त !

आपल्याकडे हल्ली स्वीट डिश म्हणून मिष्टान्ने शेवटी खाण्याची पध्दत रूढ होत आहे. हे पदार्थ स्वभावत: पचनाला जड असतात. आधी खाल्लेल्या पदार्थांच्या पचनात पित्त व्यग्र असताना अशा पदार्थांचे व्यवस्थित पचन होत नाही.

अति थंड, अति गरम, अति कोरडे, अति शिजवलेले, शिळे अन्न कधीही खाऊ नये. अति थंड पदार्थ हे जरी स्पर्शाला थंड असले तरी प्रत्यक्षात ते अति पित्तकर असतात कारण त्यांना आपल्या शरीराच्या तापमानाला आणण्याकरीता जठरात अधिक पित्ताचा स्त्राव होतो. अति उष्ण पदार्थांचे तोंड येणे व यांसारखे अनेक दुष्परिणाम तर आपणास माहितच आहे.

*पाणी

आहाराचा प्रमाणे पाणी पिण्याचाही क्रम आहे. काही लाकांना जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यायची सवय असते तर काहींना जेवणानंतर. पेटलेल्या विस्तवावर पाणी ओतलं की विस्तव जसा विझून जातो त्याप्रमाणे जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास पाचकाग्नी विझून जातो. म्हणजेच सर्व पाचक स्त्राव पातळ होतात. याने अग्निमान्द्य होऊन हळूहळू पचनाच्या तक्रारी उद्भवू लागतात. भूक न लागणे ही यातील प्रमुख तक्रार असते. हळूहळू माणूस कृश होत जातो.
जेवल्यानंतर पाणी पिणेही तितकेच वाईट. या सवयीमुळे पुढे स्थौल्य, मधुमेह, तसेच आमाचे विकार उद्भवू लागतात. या पाण्याने पाचक स्त्रावाद्वारे अन्न पचविण्याच्या क्रियेत अडथळा येतो. त्यामुळे जेवताना एक ते दीड ग्लास पाणी मध्ये-मध्ये घोट घोट घेत रहावे.

विरुध्दाहार

ज्या दोन वस्तू वेगवेगळया खाण्याने अपाय होत नाही परंतु, त्याच वस्तू एकत्र करून, मिसळून खाल्ल्या तर त्या शरीराला विषाप्रमाणे अपायकारक होतात. अशा वस्तू एकत्र करणे म्हणजे विरुध्दाहार होय.

दूध व आंबट फळे (कैरी, चिंच, करवंद, अननस, मोसंबी, द्राक्ष) एकत्र करुन खाणे.

वरी, मटकी, कुळीथ, उडीद, वाटाणे, वाल दुधाबरोबर खाणे.

कच्चा मुळा व दूध एकमेकांअगोदर खाऊ नयेत, त्याने चामडीचे विकार होण्याची शक्यता असते.

दूध, भात, मीठ एकत्र खाणे. दूध व मासे एकत्र खाणे.

दही कधीही तापवून खाऊ नये.
ताक किंवा दह्याबरोबर केळ खाणे.

गरमागरम जेवणानंतर आईस्क्रीम किंवा शितपेये घेणे.

तूप व मध सम प्रमाणात एकत्र खाणे.
मोहरीच्या तेलात परतलेले मासे, हळकुंड.
मध, दही, मद्य यापैकी कशाबरोबरही उष्ण पदार्थ खाणे.

ताक व कारल्याची भाजी एकत्र खाणे.

रात्री झोपतांना सातूचे पीठ खाणे.

उन्हात तापलेल्या शरीराने थंड दूध किंवा पाणी प्यायल्याने रक्तपित्त होते.

अशा अजून इतर बर्याच गोष्टी आहेत,ज्या आपण चुकीच्या करत असतो.पण  या काही सर्वसामान्य गोष्टी सांगीतल्या.

काही सहज व सोपे नियम आपण आहारा सबंधि पाळले तर काही अंश तरी आपण पोटाच्या तक्रारी अथवा इतर काही छोट्या-मोठ्या आजारा पासून दुर राहू शकतो !

20 December 2014

ब्रेड रोल (Bread Roll )

No comments :

आतले सारण तयार असेल तर पट्कन अगदी आयत्यवेळी सुध्दा तयार होणारा प्रकार म्हणजे हे ब्रेडरोल ! त्यात आपल्या आवडीनूसार व घरात उपलब्ध सामग्रीनूसार आपण आतले सारण तयार करू शकतो. मी पूढील प्रकारे केले.

साहीत्य :-

1) ब्रेड स्लाईस आपल्या गरजे इतके
2) उकडलेले बटाटे 2 नग
3) मटार पाव वाटी
4) बिन्स चिरून पाव वाटी
5) सोया चंक पाव वाटी
6) पिकलेला टोमॅटो एक चिरून
7) कांदा एक चिरून
8) कोथंबिर
9) आल,लसूण,हीरवी मिरची पेस्ट
10) गरम मसाला
11) चाट मसाला
12) मिठ चवीला
13) तेल व फोडणी साहीत्य
14) तळणीसाठी तेल
15) पाणी

कृती :-

      प्रथम सोयाचंक गरम उकळ्त्या पाण्यामध्ये टाकावेत.पाच मिनीटांनी गाळणीने गाळून पाणी काढून टाकावे व हाताने सोयाबिन चूरडून घ्यावे.

आता कढईमधे फोडणीपूरते तेल घालून फोडणी करून त्यात कांदा घालावा नंतर आले लसूण मिरची पेस्ट टाकावी.आता टोमॅटो घालून परता त्यावर बिन्स व मटार टाकून शिजवून घ्या शेवटी उकडलेला बटाटा व सोया चंक घाला.

नंतर त्यावर गरम मसाला, चाट मसाला, मीठ व कोथंबिर घालून नीट हलवावे.कोरडे होईपर्यत परतून गॅस बंद करावा व सारण थंड होऊ द्यावे.

आता कडा काढून एक-एक ब्रेड स्लाईस पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात बुडवून काढावा व तळहाताने दाबून पाणी काढावे.त्यामध्ये वरील सारण भरावे व हलकेच हाताने दाबत रोल करावा.नीट तोंड बंद करावे व तेलात खरपूस तळावे.

तळून टीश्यूपेपरवर काढा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल.

गरमा-गरम खमंग खुसखूषीत ब्रेड रोल तयार! कोणत्याही चटणी साॅस बरोबर अथवा नुसतेच खाल्ले तरी छान लागतात.

टीप :-सारण तयार करताना तेल कमीत कमी वापरावे.

सारण चांगले कोरडे करून घ्यावे म्हणजे रोल छान खुसखूषीत होतात.

18 December 2014

व्हेज टोस्ट सॅडविच (Veg Toast Sandwich)

No comments :

सकाळी उठले की आपल्याला बरेच वेळा असा प्रश्न पडतो की मुलांना डब्यामधे आवडीचे पण झटपट व पोटभरीचे असे काय द्यावे?? किंवा संध्याकाळचा नाष्टा काय करावा ? अशा वेळी हे सॅडविच ट्राय करा .भाजी रात्रिच करून फ्रीज मधे ठेवली तरी चालते व ऐत्यावेळी पट्कन ब्रेडला लावून भाजले की डीश तयार ! तर ते कसे करायचे आता पाहू ...

साहीत्य :-

1) सॅडविच ब्रेड 8-10 स्लाइस
2) उकडलेले बटाटे 2 नग
3) मटार अर्धी वाटी
4) टोमॅटो एक
5) कांदा एक
6) मिठ चविनुसार
7) हळद,मिरचिपूड
8) गरम मसाला किंवा पावभाजी मसाला एक चमचा
9)साखर चिमूटभर(ऐच्छीक)
10) तेल
11) टोमॅटो साॅस
12) हिरवी चटणी
13) बटर 
   

कृती :-

       प्रथम पॅनमधे थोडेसे तेल घालावे व कांदा टाकावा नंतर मटार घालावेत.मऊ होइपर्यत  परतावे.आता चिरलेला टोमॅटो घालावा व मऊ होऊ द्यावा.शेवटी मॅश केलेला बटाटा टाकावा.

आता मिठ,साखर,हळद मिरचीपूड व मसाला घालून निट सर्व मिश्रण हलवावे.पाच मिनिटे परतावे व गॅस बंद करावा.

आता दोन ब्रेड स्लाइस घ्या एका स्लाइसला हीरवी चटणी लावा व त्यावर वरील तयार भाजी पसरा.त्यावर दुसरा स्लाइस ठेवा व वरून बटर लावा.टोस्टरला बटर ची बाजू खाली करून ठेवा व आता वरच्या बाजूला पण बटर लावा म्हणजे दोन्हीकडून टोस्ट खरपूस भाजला जाईल.

असा खरपूस भाजलेला टोस्ट साॅस बरोबर खाण्यास द्या .

        

16 December 2014

सरसों का साग ( Sarson ka Saag )

No comments :
सरसो म्हणजे मोहरी,मोहरीची पालाभाजी ! याची भाजी म्हणजे,"सरसों का साग व मकई की रोटी.ही "पंजाब,दिल्ली व उत्तरप्रदेशांतील पश्मिमेकडील भागात फार लोकप्रिय आहे. साधारण हीवाळ्याच्या दिवसात आपल्याकडे मंडई मध्ये एखाद दुसर्या भाजीवाल्याकडे मिळते.सर्रास मेथी पालका प्रमाणे मिळत नाही.तरीपण मिळाली तर जरूर करा.खूप चवदार लागते.या भाजीच्या जोडीला मक्कयाची गरमा-गरम भाकरी व मस्त वर लोण्याचा गोळा ! व्वा क्या बात है तर चला कशी करायची भाजी ते पाहू.
साहीत्य :-
1) मोहरीची भाजी निवडून,धुवून एक जूडी
2) पालकाची भाजी निवडून,धुवून एक जूडी
3) कांदा एक मोठा
4) पिकलेले टोमॅटो मध्यम आकाराचे 2 नग
5) हिरवि मिरची,आले,लसूण पेस्ट एक चमचा
6) मक्का पिठ 2 टेबलस्पून
7) मिठ चवीनुसार
8) तेल/बटर फोडणीसाठी
कृती :-
      सर्वात आधि दोन्ही भाज्या चिरून घेउन एका पातेलीमधे पाणी घालून वाफविण्यास ठेवाव्यात.
भाज्या उकडेपर्यंत कांदा बारिक चिरून घ्यावा.टोमॅटोची प्यूरी करून घ्यावी.मिरची आले,लसूण पेस्ट तयार करावी.

आता गॅस बंद करावा व भाजी चाळणीवर ओतून त्यातील जादाचे पाणी काढून टाकावे.(शक्यतो मापातच पाणी घालावे म्हणजे काढावे लागणार नाही व जीवनसत्वे जाणार नाहीत) आणी भाजी थोडी ब्लेंडरला घोटून घ्यावी.फार गुळगूळीत नको.

आता गॅसवर पॅन गरम करण्यास ठेवा व बटर घाला.गरम झाले की मोहरी हींगाची छान फोडणी करा त्यात हळद घाला.नंतर कांदा टाका व परता .कांदा गुलाबी रंगाचा झाला की टोमॅटी प्यूरी,आले-लसूण,मिरची पेस्ट घाला.तेल सुटेपर्यत परतत रहा.
आता शेवटी घोटलेल्य भाज्या टाका व मक्कयाचे पिठ घालून नीट हलवा गुठळ्या राहू देउ नका.शेवटी मीठ घालावे व पाच मि.शिजू द्यावे.
पाच मिनीटानी गॅस बंद करावा व भाजी सर्व्हींग बाऊल मधे काढावी.खमंग भाजी तयार ! गरमा-गरम मक्कयाच्या भाकरीसोबत वाढावी.

थंडीच्या मोसमात तर असा मेनू खूपच चवदार लागतो.त्यात मोहरी गुणधर्माने उष्ण व मक्का पचायला हलका व गोड असल्याने हीवाळ्यात उत्तम.

टीप ;- या मोहरीच्या भाजीमध्ये जोडीला "बथुआ" नावाची भाजी उ.प्रदेशमधे वापरतात.पण ती आपल्याकडे सहसा मिळत नाही.म्हणून पालक वापरले तरी चालते.नुसती मोहरीची भाजी पण होते पण मोहरी उग्र असल्याने चवीला उग्र लागते तसेच थोडी चोथटपण होते. शक्यतो बटरवरच करावी. 

15 December 2014

मेथी-पालक पकोडे (Methi-Palak Pakode)

No comments :
मेथी व पालक या तशा सहज उपलब्ध होणार्या पालेभाज्या आहेत.तसेच हीवाळ्याच्या मोसमात तर सर्वच भाज्या मुबलक व इतर मोसमाच्या तुलनेने थोड्या स्वस्त मिळतात.त्यामूळे पालक मेथी यांच्या भाज्या, पराठे आपण बनवतोच नेहमी पण थंडीच्या मोसमात थोडे तेलकट,चटपटीत पदार्थ खावून आपल्या जिभेचे चोचले थोडे पुरविले तरी चालते .कारण या दिवसात आपली पचनशक्ती पण चांगली असते.कोणताही पदार्थ पचण्यास सहसा त्रास होत नाही.तर चला,आपण मेथी-पालक घेऊन त्याचे खमंग पकोडे बनवूया.

साहित्य :-
* मेथी धुवून बारिक चिरलेली १ वाटी
* पालक बारिक चिरलेला १ वाटी
* डाळीचे पीठ लागेल तसे.अंदाजे एक वाटी
* तांदुळ पीठ २ चमचे
* मीठ अर्धा टीस्पून
* मिरची पावडर अर्धा टीस्पून,हळद
* धना-जिरा पावडर अर्धा चमचा
* सोडा चिमूटभर
* हींग पाव चमचा
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम एका पसरट भांड्यामधे धुवून बारिक चिरलेली मेथी व पालक घ्यावे.त्यावर सोडा व डाळीचे पिठ सोडून सर्व साहीत्य घालावे.नीट एकत्र कालवावे.दहा मिनिट तसेच ठेवा.
नंतर त्यात मावेल एवढेच डाळीचे पिठ घालावे व कालवावे.पाण्याचा वापर करू नये.पालक मेथी एकत्र होणेएवढेच पीठ घालावे.साधारण कोरडे कोरडेच ठेवावे.

आता गॅसवर तेल तापत ठेवावे व ऐत्यावेळी सोडा घालावा व नीट हलवून लहान-लहान भजी हाताने तेलात सोडा.खरपूस ,मंद तळा.
तयार पकोडे साॅस किंवा चटणीबरोबर खाण्यास द्या.असे केलेले पकोडे अत्यंत हलके व खुसखूषीत लागतात.

टीप :-  पाण्याचा वापर केला की पीठाचे प्रमाण वाढते व हलकेपणा व खुसखूषीतपणा कमी होतो.



आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.


12 December 2014

सोया,ओट्स व पालक नगेट्स( Soya,Oats & Palak Nuggets)

No comments :
पालक किंवा ओट्स,सोया यांना मूळची अशी चव काहीही नसते.परंतु पोषणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे आहेत.परंतु आपल्याला जिभेला चवदार लागत नसल्याने आपल्या आहारात सहसा वापरले जात नाहीत.तेव्हा ते आपल्या पोटात जावेत म्हणून खाली दिल्याप्रमाणे करायला सोप्पे व खमंग असे नगेट्स बनवून पहा.नक्की सर्वाना आवडतील.

साहित्य :-
* पालकाची धुतलेली सात-आठ पाने
* पोहे १/२ वाटी
* ओट्स १/२ वाटी
* सोया चंकची भरड १/२ वाटी
* उकडलेला बटाटे मध्यम आकाराचे २
* हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट १ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* ब्रेड क्रम्स अर्धी वाटी
* तेल
* लिंबू

कृती :-
प्रथम पालकाची पाने ब्लांच करून घ्यावीत.नंतर त्यातील पाणी गाळून काढावे व पालक आणी  पोहे एकत्र थोडा लिंबू पिळून वाटून घ्यावे.(लिंबूने पालकाचा रंग हिरवा रहातो)

नंतर पॅनमधे ओट्स व सोया थोडे भाजून घ्यावेत.
आता एका बाउलमधे उकडलेला बटाटा मॅश करावा.त्यामधे वर वाटलेले पालकाचे मिश्रण व भाजलेले। सोया,ओट्स तसेच मिरची,आले लसूण पेस्ट,चवीला मीठ घालून परत थोडा लिंबू रस घालावा.सर्व मिश्रण हाताने चांगले एकजीव करावे व गोळा तयार करावा.

आता तयार मिश्रणाचे लहान-लहान गोळे घेउन आपल्याला हवा तो आकार द्यावा व ब्रेडक्रम्स मधे घोळवून शॅलोफ्राय करावे.

आपले पौष्टीक व चटकदार नगेट्स तयार ! साॅस हिरवी चटणी किंवा नुसतेही चहा बरोबर सर्व्ह करा अथवा जेवणात साईड डिश म्हणून ठेवा.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

11 December 2014

समोसा (Samosa)

No comments :



साहित्य :-
सारणाचे
---------
* वाफवलेले मटार १ वाटी
* उकडलेले बटाटे ४  (४००ग्रॅम)
* गरम मसाला अर्धा चमचा
* लाल मिरची पावडर १/२ टीस्पून
* धना-जीरा पावडर १ १/२ टीस्पून
* चाट मसाला १/२ टीस्पून किंवा आमचूर पावडर
* साधारण कुटलेले धणे भरड १ टीस्पून
* आलं- लसूण, हिरवी मिरची पेस्ट आपल्या आवडीने
* कोथिबीर चिरलेली
* मीठ चवीनुसार
* आवडत असेल तर  लिंबू पाव चमचा
* पुदीना पेस्ट / पावडर १ टीस्पून (ऐच्छिक) 

वरच्या पारीसाठी साहित्य :-
----------------------
* मैदा २ कप
* काॅर्नफ्लोअर २ चमचे
* गार मोहन तेल पााव कप 
* चिमूटभर मीठ चवीला
* ओवा पाव चमचा (ऐच्छीक)
* तेल तळणीसाठी
* पाणी १/२ कप पेक्षा थोडे कमीच

कृती
प्रथम मैदा  गारच तेल(मोहन) व मीठ,ओवा घालून कमीत कमी  पाणी वापरून घट्ट भिजवून ठेवा.

नंतर मटार व बटाटा मॅश करून घ्यावे. पँनमध्ये अगदी थोडे तेल घालून त्यात आलं-लसूण, मिरची पेस्ट घालून नंतर त्यामधे  मँश केलेला बटाटा, मटार घालून त्यामधे सारणासाठी दिलेले सर्व मसाले  घालून  मिश्रण तयार करून घ्यावे. मिश्रण चांगले परतून कोरडे करावे. 

आता भिजवलेल्या मैद्याचा एका पोळीएवढा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटा व मध्यभागी चिरून दोन अर्धे भाग करा.एका मागात तयार सारण भरावे व शंकू सारखा आकार द्यावा.तोंड नीट दाबून बंद करा.असे सर्वे समोसे तयार करून घ्या.


आता गरम तेलात मंद आचेवर तळा.
खुसखूषीत समोसे तयार !



गरमा गरम सामोसे साॅस किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

टीप्स:
* समोसे मंद आचेवरच खरपूस होइपर्यत तळावेत.म्हणजे तरील आवरण खुसखूषीत होते.
* पीठ घट्ट मळावे.
* आतील सारण चांगले कोरडे करून घ्यावे. अन्यथा आतील सारणाच्या ओलाव्याने समोसा तळल्यावर कांही वेळातच म्हणजे गार झाल्यावर मऊ पडतो. 


आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

10 December 2014

किचन टीप्स (Kitchen Tips)

No comments :

1) कच्च्या बटाट्याचे ताजे चिप्स बनवायचे असतील तर चिप्स किसून ते तळण्यापूर्वी तूरटीच्या पाण्यात टाका.चिप्स अत्यंत कुरकूरीत वपांढरेशुभ्र होतात.

2) लसूण सोलताना त्याची साले सहज निघण्यासाठी पाकळ्यांना थोडेसे तेल चोळून नंतर सोला.सहज निघतात.

3) टोमॅटोचे सूप बनविताना त्यात थोडी पुदीना पाने टाकावित सूप चवदार बनते.

4) बदाम बी ठेवलेल्या बरणीत 4-5 चमचे साखर टाका .ताजे  टिकतात .

5)कोणत्याही फ्ळांचा मुरांबा बनवायचा असेल तर फळे उकडताना त्यात चिमूटभर मिठ टाकावे.मुरांबा जास्त स्वादीष्ट व टीकाऊ होतो.

लिंबाचे गोड लोणचे ( Sweet Lemon Pickle)

No comments :
उपवास असला की आंबट-गोड चवीचे लोणचे, चटणी असे काही चवीला असेल तर थालीपीठ, वरीचा भात असे उपवासाचे पदार्थ पण एकदम चटपटीत वाटतात. जिभेला चव येते. तर उपवासाचे लोणचे कसे करायचे याची कृती व साहित्य पुढे देत आहे.

साहित्य:-
* लिंबू २५ नग
* साखर मध्यम आकाराच्या १० वाट्या
* मीठ २ वाट्या
* लाल मिरचीपूड १ १/२(दिड)वाटी
* जीरेपूड ४ टीस्पून

कृती:
प्रथम  लिंबू  स्वच्छ  धुवून व पुसून कोरडे करून घ्यावेत. नंतर लिंबाच्या मध्यम आकाराच्या साधारण ८-१० फोडी करून त्यातील शक्य तितक्या बिया काढून टाकाव्यात. 

नंतर फोडींना मीठ, मिरचीपूड, जीरेपूड लावून साधारण आठ दिवस स्वच्छ काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवावे.

नंतर साखर,आठ दिवस मुरवलेल्या लिंबाच्या फोडीत मिसळावी व बरणीत भरून ठेवावे. रोजच्या रोज बरणी उघडून, स्वच्छ व कोरड्या चमच्याने लोणचे ढवळावे.असे साखर पूर्ण विरघळेपर्यंत करावे. 

ज्यांना वेळ नसेल किवा साखर विरघळे पर्यंत रोजच हलविण्याचे काम त्रासाचे वाटत असेल त्यांनी साखरेचा एकतारी पाक करावा व त्यामधे लिंबाच्या फोडी घालव्यात.

असे हे रसाळ आंबट,गोड,तिखट चवीचे लोणचे खास करून उपवासा दिवशी खाता येते.उपवासाला तर चालतेच  शिवाय तोंडाला चव नसेल,तर तसेच आजारी व्यक्तीना पत्थकर आहारात चालते.लहान मुलांना भाताबरोबर चवीला देता येते.

टीप :-पावसाळ्यामधे लिंबू स्वस्त असतात पण पावसाळी लिंबूचे लोणचे बर्षभराचे साठी करू नये टिकत नाही.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

08 December 2014

स्वयंपाक शक्यतो घरातल्या स्त्रीनेच का करावा ?

No comments :

आजकाल प्रत्येकाचे आयुष्य धावपळीचे खूप झाले आहे.स्त्रिया सुध्दा पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. काही कारणामूळे तिला नोकरी करणे आवश्यक असते. त्यामूळे तिचा दिवसातला बराच वेळ बाहेर जातो.घरी आली की थकून जाते.त्यामुळे काहीवेळा आपल्यातल्या बर्याचजणी स्वयंपाकाच्या बाईचा पर्याय स्वीकारतात,पण पदार्थामधे करणार्या व्यक्तीचे भाव उतरतात असे म्हणतात.   म्हणूनच शक्यतो घरातल्या स्त्रीनेच स्वयंपाक करावा.

म्हणतात की घरच्या स्त्रीने बनवलेले जेवण हे फक्त पोट भरण्यासाठी नव्हे तर त्यातून आरोग्य लाभते ,पोषण लाभते . पण कधी विचार केलाय का कि एखाद्या भाजीत किव्हा पदार्थात मीठ किव्हा तिखट जास्त कमी पडण्याचे कारण काय असेल." तिला स्वयंपाक बनवता येत नाही " नाही हे कारण नसावे आणि नसेलच पण ती कसल्यातरी विचारात गुंतलेली होती जेव्हा ती तो स्वयंपाक करत होती. हो हे अगदी खरं आहे.
ही गोष्ट प्रत्येकानीच वाचावी आणि लक्ष्यात ठेवावी असे मला वाटते
आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा जर आपण टेन्शन किव्हा रागात असलो तर आपण ते टेन्शन आणि राग आपल्या स्वयंपाकात नकळत उतरवत असतो आणि परिणामस्वरूप त्यात मीठ जास्त पडत किव्हा भाजी करपते किव्हा अजून काहीतरी होत फक्त एवढाच नाही तर ज्या व्यक्तीला आपण ते जेवायला घालणार त्याच्या तब्येतीशी हि आपण नकळत पण खेळतो ... तसे होता कामा नाही ,
प्रशंसा कुणाला आवडत नाही आणि निंदा कुणाला आवडते . म्हणून आपण स्वयंपाक बनवताना छान छान विचार करावे , जी भाजी बनवताय त्या भाजीशी बोलावे , त्यात आपले प्रेम आपुलकी काळजी ओतावी , मनापासून स्वयंपाक करावे negative न राहता positivity ने जेवण बनवावे ह्याने नुसतच जेवण tasty नाही तर तुम्ही बनवलेले जेवण रुचकर पौष्टिक आणि त्यांच्या आरोग्याला लाभेल असे बनेल . तेव्हा स्वयंपाक करताना आनंदी राहा फ्रेश राहा वैचारिक राहा पण चांगले विचार करा आणि मगच स्वयंपाक बनवा आणि बघा तुमच्या आप्तेष्टांची तब्येत सुधारू लागेल , तुम्हाला प्रशंसा मिळेल , पदार्थ फसणार नाही आणि तुम्ही एक उत्तम गृहीणी म्हणून परत स्वतःला सिद्ध करू शकाल.

आपण जसे अन्न खातो तसेच आपले विचार, प्रकृती व चेहर्यावरचे भाव बनतात.घरची स्त्री नेहमी आपल्या माणसानी खावे म्हणून प्रेमाने,  आनंदाने,आपुलकीने व जीव ओतून जेवण बनवते .तिचे प्रेम व हातची चव पदार्थात उतरते. त्याचा फायदा ही होतो.सर्वाना नेहमी सकस चवदार अन्न मिळते दवाखाना औषधे दूर रहातात.

म्हणून शक्यतो घरच्या स्त्रीने आनंदाने जेवण बनवावे व असे बनविलेले जेवण खाणार्यानी पण ,'हे माझ्यासाठी माझ्या मायेच्या व्यक्तीनीबनविले आहे' असा विचार करूनच खावे.खूप फायदा होतो.

घरच्या स्त्रीने मस्त चवदार ताजे बनविलेले पदार्थानी,छान सजविलेले ताट पाहीले की पोट भरलेले असले तरी परत एकदा जेवावे असे वाटले पाहीजे ! म्हणून जेवण वाढताना पण आकर्षक पणे ताट मांडावे.

फोटोमधे दाखविले आहे तशा पदार्थाच्य  जागा असाव्यात.डाव्या बाजूचे पदार्थ कमी खावेत.भाज्या उजव्या हातच्या जास्त खाव्यात इ .असे बरेच संकेत असतात.

Presentation is always important !!


28 November 2014

खस्ता पराठा (Khasta Paratha)

No comments :
हा एक राजस्थान मधिल पराठ्याचा लोकप्रिय प्रकार आहे.सुटसूटीत,कमी साहीत्यात व खमंग असा असल्याने बदल म्हणून खाण्यास काहीच हरकत नाही ! कसा करायचा ते पहा ...

साहित्य:-
* गव्हाचे पीठ २ वाट्या
* दही २ चमचे
* तेल १ टेस्पून
* मीठ,हळद,तिखट,हींग,धना-जीरा पावडर,ओवा,मिरी पूड भरड सर्व अर्धा चमचा

कृती :-
प्रथम एका लहान वाटीमधे एक चमचा तेल घेऊन सर्व मसाला घालून हलवून ठेवावे.

नंतर दुसर्या एका पसरट भांड्यामधे गव्हाचे पीठ घेऊन,मीठ,तेल व दही घालून पाणी घेऊन नेहमीप्रमाणे भिजवावी.१० मि.झाकून ठेवावी.

आता वरील मळलेल्या कणिकेचा एक लहान गोळा घेऊन पोळी लाटावी.पोळीवर तयार मसाला पसरावा व सूरळी करावी.सूरळी चक्राकार गुंडाळावी व परत गोळा करून हलक्या हाताने पराठा लाटावा.तेल सोडून खरपूस भाजावा.

तयार पराठा नुसता अथवा कोणत्याही चटणी किंवा दह्या बरोबर सर्व्ह करा.

हे पराठे  टीकाऊ असल्याने प्रवासात नेण्यास उत्तम आहेत.तसेच मुलाना टीफीनमधे  देण्यास पण सोयीचे किवा घरीसुध्दा बदल म्हणून खाण्यास छानच लागतात !

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

25 November 2014

चिंच-गूळ ,खजूराची गोड चटणी (Sweet Chutney)

No comments :
साहित्य :-
* चिंच एक वाटी
* गुळ अर्धी वाटी
* खजूर अर्धी वाटी
* तिखट,मीठ चवीनुसार
* जीरे पूड,चाट मसाला चवीला

कृती:-
प्रथम चिंच ,गुळ व खजूर थोडे पाणी घालून एकत्र कुकरला लावावे व एक शिट्टी काढावी. 

थंड झाल्यावर मिक्सरला वाटावे आणी गाळणीतून गाळून घ्यावे.

नंतर त्यात चवीनुसार तिखट,मीठ,चाट मसाला, जीरेपूड घालावे.चटणी तयार! भेळ,समोसा कोणतेही चाट कशासोबतही खाता येते. 

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

चाट मसाला (Chat Masala)

No comments :
साहित्य :-
चाट मसाला ! आज बर्याच कंपन्यांचा तयार चाट मसाला मार्केट मधे उपलब्ध आहे. आपल्याला पट्कन एखादे पॅकेट आणणे सोयीचे असते.पण एखादे वेळी आपण आणायचे विसरतो व आपल्याला एखादी चाट डिश बनवायचा मूड तर असतो.अशा वेळी काय करायचे ? विचार करू नका ,पूढे दिल्याप्रमाणे चाट मसाला तयार करावा ---

साहित्य :-
* सुंठ पावडर अर्धा चमचा
* आमचूर पावडर अर्धा चमचा
* काळे मीठ अर्धा चमचा
* काळी मिरी ८-१० 
* जीरे अर्धा चमचा
* लाल तिखट पाव चमचा
* हींग पाव चमचा
* पांढरे मीठ  पाव चमचा

कृती :-
 प्रथम काळी मीरी व जीरे पावडर करा आणि त्यामधे वरील सर्व मसाला मिसळावा.नीट एकत्र करावे. चाट मसाला तयार! नीट हवाबंद  बाटलीत भरून ठेवावा.लागेल तेव्हा वापरता येतो.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.


22 November 2014

होममेड कुरकुरे (Homemade Kurkure)

No comments :
साहित्य:-

* मैदा २ वाट्या
* कडीपत्ता पाने १ वाटी
* हिरवी मिरची,मीठ चवीनुसार
* तेल तळण्यासाठी
* पाणी
* चाट मसाला

कृती :-
प्रथम मैदा स्वच्छ चाळून एका पसरट भांड्यामध्ये घ्यावा.नंतर कडीपत्ता,मिरची व मीठ एकत्र भरड वाटावे आणि मैदयामध्ये घालावे.दोन चमचे तेल घालावे व मैदा पाण्याने घट्ट मळून घ्यावा.अर्धा तास झाकून ठेऊन द्यावा.

अर्ध्या तासानंतर मळलेल्या पीठाचा लहान गोळा  घेऊन त्याची पातळ पोळी लाटावी व सुरीने त्याच्या बोटभर रुंदीच्या पट्ट्या कापून गरम तेलामध्ये.मंद तळाव्यात .

गार झाल्यावर.त्यावर चाट मसाला भुरभुरवा व एयरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवा.मुलांना येता-जाता तोंडात टाकण्यासाठी व मोठ्यांना सुद्धा चहा बरोबर खाण्यास छान लागतात .

बाजारी चिप्स,कुरकुरे अशा पदार्थांना उत्तम पर्याय होऊ शकतो .तसेच कडीपत्ता मध्ये calcium पण भरपूर असते .घरच्या घरी बनविले असल्याने शुध्द्ध व पौष्टिक पण झाले.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

19 November 2014

सुरळीच्या वड्या/खांडवी ( Khandawi )

No comments :
साहित्य:-
* चना डाळ पीठ १वाटी
* आंबट ताक १वाटी
* पाणी १वाटी
* हळद,मीठ
* फोडणीचे साहित्य तेल मोहरी,हींग
* ओले खोबरे,चिरलेली कोथंबीर.

कृती:-
प्रथम जाड बुडाच्या एका भांङ्यामधे पीठ घेऊन त्यामधे मीठ,हळद घाला.पाणी व ताक घालून सर्व नीट मिक्स करावे.भांडे मंद आचेवर गॅसवर ठेवावे.सतत एकसारखे हलवत रहावे,गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.मिश्रण शिजत आले की साधारण चमकदार दिसते व कडेने सुटू लागते.खाली उतरवून गरम असतानाच ताटाला अथवा प्लॅस्टीक शीटला डावाने पातळ पसरावे.(ही क्रिया झटपट करावी)
थंड झाले की,चाकूने कापून घ्यावे ,म्हणजे रेषा माराव्यात व त्यावर चमच्याने थंड फोडणी घालून खोबरे, कोथंबीर पसरावे.प्रत्येक पट्टीच्या लहान लहान सुरळ्या करून डीशमधे काढावे.

आवडीप्रमाणे वरून खोबरे,कोथंबीर घालून सर्व्ह करावे.

टीप :- 
सर्व साहित्य एकत्र करून कुकरला एक शिट्टी काढली व नंतर ताटाला पसरविले तरी चालते.जास्त सोयीचे होते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

18 November 2014

गाजराचे रोल(Carrot Roll)

No comments :
हिवाळ्याच्या दिवसात गाजरे मुबलक प्रमाणात येतात व स्वस्त पण असतात. गाजर डोळ्यासाठी अत्यंत उपयोगी असते.तसेच गाजरामधे  विटामिन 'ए' भरपूर प्रमाणात असते.त्यामुळे त्याचा जास्तीत-जास्त वापर आपण आहारात करून घ्यावा.पण नेहमीचेच सूप,कोशिंबीर गोड हलवा खाण्याचा कंटाळा येतो.अशावेळी पुढील प्रकारे चटपटीत व खमंग असे 'गाजराचे रोल' बनविता येतील.

साहित्य:-
* गाजराचा किस २ वाट्या
* गव्हाचे पीठ  १ वाटी
* चना डाळ पीठ १ वाटी
* तांदुळ पीठ २ टेस्पून
* धना-जीरा पावडर १टीस्पून
* हळद
* मीठ चवीनुसार
* कोथिंबीर,मिरची,आले-लसूण पेस्ट २ टीस्पून
* चिमूटभर सोडा
* तेल
* फोडणीसाठी मोहरी,हींग,तिळ,कडीपत्ता

कृती:-
प्रथम गाजराचा किस एका बाऊलमधे घ्यावा. त्यामधे गव्हाचे पीठ ,डाळीचे पीठ,तांदुळाचे पीठ व वरील सर्व मसाला घालावा.चिमूटभर सोडा व दोन चमचे तेल घालावे व नीट एकत्र करून गोळा मळावा.गरज वाटली तर थोडा पाण्याचा हात घ्यावा.

आता तयार गोळ्याचे लहान-लहान गोळे घेऊन लांबट गोल रोल करावेत आणि गॅसवर पातेले अगर स्टीमर मधे दहा मिनीट वाफवावेत.

थंड झाल्यावर कढई मधे मोहरी,हींग,तिळ,
कढीपत्ता घालून फोडणी करावी व त्यात तयार रोल टाकून थोडे परतावे.

आपले खमंग व पौष्टीक गाजर रोल तयार ! चहा बरोबर किंवा जेवणात सुध्दा साइड डीश म्हणून खाता येतील.

टीप :- 
पीठ मळताना शक्यतो पाण्याचा वापर करू नये  गाजराच्या किसात मावेल एवढीच गव्हाचे पीठ  व डाळ पीठ घ्यावे.म्हणजे गाजराचा रंग ही उठून येतो व रोल हलके पण होतात. 

हे रोल मायक्रोवेव्ह ओव्हन मधे पण आपण बेक करू शकतो.हाय टेंप.ला ३-४ मि .झाकून बेक करावेत.स्टैंडींग टाईम २ मिनिट द्यावा.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

17 November 2014

काजू कतली (Kaju Katali)

No comments :
काजू कतली घरी बनविणे एकदम सोपे आहे.वेळ पण फारसा लागत नाही. सर्व साहित्य तयार असेल तर फक्त दहा मिनिटे लागतात. तर कशाला भेसळयुक्त बाजारी काजूकतली आणायची ? कशी करायची ते पहा....
साहीत्य:-
* काजू १कप
* मिल्क पावडर १/४कप
* साखर ३/४ कप
* पाणी १/४ कप +२ टेस्पून
* तूप १ टीस्पून 
* वेलचीपूड ऐच्छीक 
* चांदी वर्ख ऐच्छिक 

कृती:-
प्रथम काजूची मिक्सर मधून पावडर करून घ्यावी.नंतर बाऊलमधे काढून मिल्क पावडर त्यामधे मिसळून घ्यावी. 

नंतर साखरेमधे पाणी घालून एकतारी पाक करावा. साधारणपणे ४ ते ५ मिनिटात पाक होतो. 

आता तयार पाकामधे काजू पावडर व वेलचीपूड घालून गोळा होइपर्यंत हलवत रहावे.ती कढईपासून मिश्रण सुटत येते.होत आल्यावर शेवटी तूप घालावे. 

तयार मिश्रणाचा गोळा  ताटामधे काढावा व साधारण गरम असतानाच मळून पोळपाटावर तूपाचा हात लावून जाडसर पोळी लाटावी. थंड झाले की चाकूने रेषा पाडाव्यात व वड्या काढाव्यात . 

अशी काजू कतली आठ दिवस आरामात टिकते. गावी जाताना करून नेंण्यास किंवा काही कार्यक्रम असेल तर आधीच करून ठेवता येते.

टीप्स :
* काजू पावङर मिक्सर चालू -बंद करत करावी. नाहीतर तेल सुटते. 
* काजू पावङर चाळून घ्यावी.
* गोळा तयार करताना फार मळू नये, तूप सुटते. 

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.







15 November 2014

मायक्रोवेव्ह ढोकळा (Microwave Dhokala)

No comments :
साहित्य:-
* चनाडाळ पीठ एक मोठी वाटी
* रवा १/४ वाटी
* एका लिंबूचा रस
* मीठ १/२ टीस्पून
* साखर १/२ टीस्पून
* इनो फ्रूटसाॅल्ट १टीस्पून
* पाणी आवशक्यतेनुसार
* फोडणीसाठी तेल,मोहरी तिळ,हिंग,कडीपत्ता व हिरवी मिरची तुकडे

कृती :-
प्रथम एका पसरट बाऊलमधे डाळीचे पीठ घ्यावे.त्यामधे रवा,मीठ व साखर घालून गुठळ्या न होउ देता हलवत-हलवत पाणी घालावे व मिश्रण तयार करावे .आत्ताच लिंबू पण पिळावा व दहा मिनीटे झाकून ठेवावे.हे मिश्रण फार घट्ट अथवा सैल नसावे.भजीच्या पीठा इतपत सैल ठेवावे.

दहा मिनीटानंतर पीठामधे इनो पावडर घालून एकाच दिशेने पीठ हलवून, तेल लावलेल्या मायक्रोसेफ डीशमधे ओतावे.इनो घातल्यावर जास्त वेळ पीठ हलवू नये पट्कन आत ठेवावे.
मायक्रोवेव्ह हाय टेंपरेचरला ३-४ मिनीट झाकून ठेवावा.स्टॅडींग टाइम २ मि.द्यावा.

आता ढोकळा बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवावा.तोपर्यंत लहान कढईमधे हींग,मोहरी तिळ ,मिरची ,कडीपत्ता घालून फोडणी तयार करावी.तयार फोडणीमधे अर्धी वाटी पाणी व थोडीशी साखर घालून एक मिनीट उकळून गॅस बंद करावा.

नंतर तयार ढोकळा सर्व्हींग प्लेट मधे काढावा व वरून तयार केलेली फोडणी कोथिंबीर पसरावे.

टीप :- 
चना डाळ पीठ असल्याने हा ढोकळा कोरडा होइल म्हणून फोडणी मधे आपण पाणी घातले आहे.जास्त मऊ आवडत असल्यास अर्ध्या वाटीपेक्शाही थोडे जास्त पाणी फोडणीमधे घालावे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

13 November 2014

हेल्दी स्टार्टर (Healthy Starter )

No comments :
मुलांना नेहमीच काहीतरी चटपटीत खायला हवे असते.आपल्याला वाटत असते सकस काहीतरी जावे त्यांच्या पोटामध्ये मग काय करावे ? तर अशावेली मधला मार्ग म्हणून घरच्या घरी लापशी रव्यापासून पौष्टीक व चटपटीत असे स्टारटर तयार करून बघा.झटपट तयार पण होतात ! कसे करायचे बघा...
साहित्य:-
* लापशी रवा १ वाटी
* उकडलेला बटाटा मोठा एक
* बारीक चिरलेला कांदा एक
* मिरची, कोथंबीर
* काॅर्नफ्लोअर दोन टेस्पून
* ब्रेडक्रम्स अर्धी वाटी
* कसूरीमेथी चिमूटभर व धना पावडर
* मीठ चवीनुसार
* तळण्यासाठी तेल

कृती:-
प्रथम लापशी रवा व बटाटा उकडून घ्यावा. नंतर उकडलेल्या रव्यामधे,मॅश केलेला बटाटा, 
चिरलेला कांदा,कोथंबीर,मिरची,निम्मे काॅर्नफ्लोअर्धे, ब्रेडक्रम्स,कसूरी मेथी,धना पावडर व मीठ घालून सर्व व्यवस्थित एकत्र करून मळावे व गोळा बनवावा.

एका बाऊलमध्ये शिल्लक ठेवलेले एक चमचा काॅर्नफ्लोअर घेऊन त्यात पाणी घालावे व पातळ पेस्ट बनवावी.

आता वरील तयार मिश्रणाचे लहान-लहान लांबट गोळे करून काॅर्नफ्लोअरच्या पातळ मिश्रणामध्ये बुडवून ब्रेडक्रम्समधे घोळवावेत व तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत. गरम असतानाच टूथपीक खोचावी. खायला सोपे पडते. 

आपले हेल्दी स्टारटर्स तयार !!! साॅस सोबत अथवा नुसतेपण खाण्यास चांगले लागतात.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

09 November 2014

डोसा (Dosa)

No comments :
डोसा हा पदार्थ दक्षिणेकडचा आहे. तिथल्या लोकांच्या रोजच जेवणात असतो. पण तो मऊ असतो. सहाजिकच आहे आपल्या चपातीऐवजी असतो. मग फार कडक व कुरकुरीत जास्त खाता येणार नाही. पण आपण इतर प्रांतातील मंडळी कधीतरी नाष्ट्यामधे खातो .त्यामुळे मी कुरकूरीत केलाय. कसा ते साहित्य व कृती पुढे वाचा. 
साहित्य :-
* मोठा तांदुळ २ वाट्या
* उडीद डाळ १ वाटी
* तुरटी(Alum)खडा चिंचोक्याएवढा
* मेथी दाणे एक टीस्पून

कृती:-
प्रथम तांदुळ व डाळ स्वच्छ निवडुन,धुवून घ्यावेत व पाच ते सहा तास पुरेशा पाण्यात भिजत घालावेत.

भिजल्यानंतर पाणी काढून टाकावे व सर्व जिन्नस मिक्सरवर वेगवेगळे बारीक वाटून घ्यावेत.
नंतर सर्व नीट एकत्र मिसळून हलवावे व आंबण्यासाठी पाच ते सहा तास झाकून ठेवावे.

पीठ आंबल्यावर चांगले फुलून वर येते.अशा पीठाचे डोसे अत्यंत हलके व कुरकूरीत होतात. आता या फुललेल्या पीठाला डावाने नीट हलवावे व निम्मे पीठ फ्रीजमधे ठेवावे म्हणजे लागेल तसे घेता येते.आता राहीलेल्या पीठामधे चवीनुसार मीठ व चमचाभर तेल  घालावे व गरजेनुसार थोडे पाणी घालून सारखे करावे व तव्यावर डोसे काढावेत. पाणी फक्त पीठ तव्यावर ओतता यावे इतपतच घालावे. दाट असावे.  

आवडीनुसार वर बटर लावावे अथवा नाही लावले तरी चालते.चटणी व बटाटा भाजी बरोबर सर्व्ह करावे.

टीप्स :- 
*पीठ फार पातळ अथवा घट्ट ठेऊ नये.म्हणजे वाटीने व्यवस्थित तव्यावर पसरता येते.

*तुरटीमूळे डोसे जास्त क्रिस्पी होतात.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

08 November 2014

चोको कुकीज (Choco Cookies)

No comments :
साहित्य:-
* मैदा १ किलो
* साजुक तूप १/२ किलो (वनस्पति तूप असेल तर पाऊण किलो)
* पिठीसाखर १/४ किलो
* चाॅकलेट चिप्स दोन टेस्पून
* चाॅकलेट इसेंस २ टीस्पून
* बेकींग पावडर एक टीस्पून/सोङा दोन चिमूट

कृती :-
प्रथम मैदा स्वच्छ चाळून घ्यावा.नंतर तूप व पीठीसाखर फुड प्रोसेसर मधे पाच मिनिट फिरवून साखर विरघळून घ्यावी.

आता विरघळलेल्या साखरेमधे मैदा,बेकींग पावडर व इसेंस घालून गोळा बनेपर्यंत फिरवावे
आता तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचा साचा घेऊन अथवा हातानेच लहान-लहान कुकीज बनवून वरून एक-एक चाॅकलेट चिप चिकटवून ट्रेला लावावे व180°-200° ला प्रीहिट ओव्हनला २५-३० मिनीट भाजावीत.

भाजून  झाली की बाहेर ठेवून थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावीत. गरम असताना मऊ असतात गार झाल्यावर कुरकुरीत होतात. 

टीप्स:- शक्य असेल तर साजूक तूपच घ्यावे.खूप छान खरपूस वास व चव येते.
फुड प्रोसेसर नसेल तर हाताने तूप फेटावे व नंतर मैदा घालावा व गोळा बनवावा.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

04 November 2014

किचन टीप्स (Kitchen Tips)

No comments :

किचन टीप्स (Kithen Tips )

1) ओल्या नारळाची वाटी शिल्लक राहीली तर थोडे मीठ चोळून ठेवावे.

2) पिठ चाळताना,चाळणीत दोन-चार नाणी टाकावीत.पिठ लवकर चाळले जाते.

3) नारळाचे दूध काढल्यावर राहीलेला चव फेकून न देता ,त्यामधे कांदा व डाळीचे पिठ घालून भाजी करावी.खूप चवदार लागते.

4) भेंडी चिरताना हाताला थोडे तेल लावावे.म्हणजे बुळबूळीत पणाचा त्रास न होता काम सोपे होते.

5) पुलावसाठी तांदुळ शिजवताना एक चमचा साखर घालावी. म्हणजे भात मोकळा होतो.

6) जायफळ टीकवण्यासाठी ती रांगोळीमधे पूरून ठेवावीत.म्हणजे किडत नाहीत.

7) मूग,मटकी,हरभरे वगैरे कडधान्ये किडू नयेत म्हणून त्याना बोरिक पावडर चोळून ठेवावी.

8)पूर्यांची कणिक मळताना त्यात चिमूटभर साखर घालावि.पुर्या खुसखूषीत होतात.

8) कडीपत्ता पाने चांगली धुवून,कोरडी करून त्याना थोडे तेल चोळावे व ओव्हन मधे एक मिनीट भाजावीत.छान चूरचूरीत होतात.मग हाताने चूरून डबीत भरून ठेवावित.लागेल तेव्हा वापरता येते.व अखंड पाने काढून टाकली जातात ,तशी काढावी पण लागणार नाहीत.

9) पुरणपोळीची कणिक शक्य असेल तर दुधामधे भिजवावी.पोळ्या अतिशय मऊ होतात.

10) कोणत्याही प्रकारच्या पराठ्याची कणिक भिजवताना त्यात चमचाभर दही घालावे.पराठे मऊ होतात.

03 November 2014

वरी तांदळाचा भात व शेंगादाण्याची आमटी (Wari Tandalacha Bhat aani Shengadanyachi Aamati)

No comments :
साहित्य:-
* वरी तांदूळ १ वाटी
* गरम पाणी २ वाट्या
* तूप किंव्हा शेंगदाणा तेल १ टेबलस्पून
* जिरे १/२ टिस्पून
* हिरवी मिरची
* मीठ- चवीप्रमाणे 

कृती:-
प्रथम वरी तांदूळ धुवून ठेवावेत.नंतर
पातेल्यात तूप गरम करावे, त्यात मिरची, जिरे घालून थोडे परतावे. त्यात धुतलेले वरी तांदूळ घालून थोडावेळ परतावे.

नंतर त्यात गरम पाणी घालावे व चवीनुसार मिठ घालून ढवळावे आणि पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर वरी तांदूळ शिजू द्यावा.

हा भात नेहमीच्या भातापेक्षा फार लवकर शिजतो.पाच मिनीटात शिजतो.गॅस बंद करून वाफ मूरू द्यावी.भात तयार !.

शेंगदाण्याची आमटी :-
साहित्य :-
* भाजलेले शेंगदाणे १ वाटी
* बटाटे/काकडी तुकडे (ऐच्छिक )
* लाल मिरची पूड/ सुकया लाल मिरचीचे तुकडे (आवडीप्रमाणे)
* जीरे
* तूप /तेल १ टेबलस्पून
* पाणी- अंदाजे तीन-चार वाट्या
* गूळ किंवा साखर चवीनुसार (ऐच्छिक )
* मीठ- चवीप्रमाणे 
कृती:-
प्रथम दाणे , जिरे आणि पाणी एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.नंतर बटाटा/काकडी सोलून त्याचे छोटे तुकडे करावेत.

कढईत तूप गरम करून त्यात जिरे घालून फोडणी करावी. काकडी/बटाट्याच्या फोडी,मिरची पूड व जरासे मीठ घालून परतून घ्याव्यात व मऊ होऊ द्याव्यात.

बटाट्याच्या फोडी शिजत आल्या कि त्यामध्ये दाण्याचे वाटण घालावे.त्यात गरजेनूसार पाणी, मिठ आणि गूळ घालावे.एक उकळी काढून गरमागरम वरीच्या भाताबरोबर वाढावे. ही आमटी नुसतीसुध्दा प्यायलाा छान लागते.   

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.